तत्काळ पैशाची गरज / तत्काळ पैशाची गरज नसेल तर बाजारात घसरण होत असताना शांत बसा

Dec 14,2018 10:27:00 AM IST

शेअरमधील गुंतवणुकीत अस्थिरतेचे वातावरण कायम येतच राहते. अनेकदा अस्थिरता इतकी जास्त असते की, जुन्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांचा विश्वासदेखील कमी होतो. मात्र, समजदार गुंतवणूकदारांना गडबडीत शेअर बाजारातून बाहेर पडण्याचा परिणाम माहिती आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याजवळील शेअरची विक्री केल्यास बाजाराची परिस्थिती चांगली असताना नुकसान भरपाई मिळत नाही हे त्यांना माहिती असते. बाजारातील ही घसरण काही कालावधीसाठीच असते कालांतराने शेअर बाजार पुन्हा तेजीने वर जातोच हे या गुंतवणूकदारांना माहिती असते. जेव्हा बाजार व्होलाटाइल होतो आणि त्यामध्ये तेजीने घसरण होत असते, त्या वेळी तुमची आर्थिक स्थिती, गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि तुमच्या रिस्क प्रोफाइलवर त्याचा काही परिणाम झाला आहे काय ? असे प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत. केवळ इतकेच नाही, तर तुम्हाला पैशाची जास्त आवश्यकता नसतानाही तुमच्याकडील शेअरची विक्री करण्यासारखा मनोवैज्ञानिक दबाव तर तुमच्यावर नाही ना? तुम्हाला लगेच पैशाची आवश्यकता नाही आणि तुमचे दीर्घकालीन उद्दिष्ट बदललेले नसेल तर शांत बसा.

उद्दिष्ट दीर्घ कालावधीचे असेल तरच गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण होईल : जर तुम्ही एकत्र गुंतवणूक केलेली असेल तर बाजारात अखेर सुधारणा होईलच आणि दीर्घ मुदतीमध्ये इक्विटीच्या गुंतवणुकीचा फायदा मिळेलच. जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)च्या माध्यमातून गुंतवणूक केली तर घसरणीच्या काळात तुमच्या गुंतवणुकीच्या बदल्यात जास्त युनिट मिळतील. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमधील एकत्रित गुंतवणूक कमी होईल. परिस्थिती कशीही असली तरी तुमचा दृष्टिकोन दीर्घ मुदतीचा असेल तरच तुमचे आर्थिक उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल.

अल्प मुदतीमध्ये बाजारातील अडचणीकडे दुर्लक्ष करणे चांगले : शेअर बाजारात वारंवार चढ-उताराचे वातावरण कायम बदलत राहते. ज्यामुळे तुम्ही त्रस्त होत असता. तुमच्या पैशाच्या सुरक्षेबाबत तुम्हाला चिंता वाटेल. मात्र, अखेरीस अल्प कालावधीमधील ही अडचण तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यामधील अडथळा ठरतो की नाही, हे तुमच्यावरच अवलंबून असते. त्यामुळेच गुंतवणुकीचे मोठे निर्णय तुमच्या आर्थिक उद्दिष्टावर अवलंबून असतात, बाजाराच्या परिस्थितीवर नाही, असे म्हटले जाते.

स्मार्ट असणे महत्त्वाचे नाही, शिस्तप्रिय असणे महत्त्वाचे : इतिहास पाहिल्यास तर शेअरमध्ये गुंतवणुकीचे चांगले निर्णय घसरणीत असलेल्या बाजारातच घेण्यात आलेले आहेत, तेजीच्या बाजारात नाही. सुप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी सांगितले की, "तुम्ही बाकी लोकांपेक्षा जास्त स्मार्ट असण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला इतरांच्या तुलनेमध्ये जास्त शिस्तप्रिय असायला हवे.' तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओबाबत तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. तो तुमचे आर्थिक उद्दिष्ट, तुमचे उत्पन्न आणि धोका पत्करण्याची क्षमता पाहून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आवश्यक ते बदल करेल.

- हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. या आधारावरील गुंतवणुकीतून नुकसान झाल्यास दैनिक 'दिव्य मराठी' नेटवर्क जबाबदार राहणार नाही.

ताहेर बादशाह, सीआयओ, इक्विटीज, इन्व्हेस्को म्युच्युअल फंड

X