आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम आरोग्याची चतुःसूत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपलं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं. उत्तम आरोग्य राखणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती आहे. शारीरिक व मानसिक निरोगीपणा म्हणजे उत्तम आरोग्य. हे दोन्ही प्रकारातील आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहे. उत्तम आरोग्याच्या चतुःसूत्री प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. या चतुःसूत्रीत समावेश होतो सुनिश्चित दिनचर्या, उत्तम आहार, व्यायाम आणि मानसिक संतुलनाचा. यातील सुनिश्चित दिनचर्या हा उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाची दिनचर्या सकाळी लवकर सुरू झाली तर आरोग्य उत्तम राहील. यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे उत्तम आहार. आहार सर्वसमावेशक असावा. यात सर्व प्रकारच्या भाज्या-पालेभाज्यांचा समावेश असावा. फळांचा अंतर्भाव असावा. दूध, अंडी, सर्व प्रकारच्या डाळीदेखील आहारात सामील करणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार तेल आणि तुपाचा वापर करावा. त्याने शरीरातील अनावश्यक घटक वाढत नाहीत.

व्यायाम गरजेचा
धकाधकीच्या युगात व्यायामाकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. परंतु अनेक आजारांना दूर ठेवण्याची शक्ती व्यायामात आहे. नियमितपणे वेगाने चालणे, धावणे, योगीक व्यायाम, प्राणायाम, ध्यान, चिंतन अनेक आजारांना दूर पळवितात. मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे समाधान. लोभ आणि अहंकार यापासून दूर राहिल्याने मानसिक समाधान प्राप्त होते. त्यातून उत्तम मानसिक संतुलन मिळते. व्यक्तीशः मानसिक संतुलनातून उत्तम सामाजिक आरोग्यही मिळते. सामाजिक दातृत्व भावनेतूनही उत्तम मानसिक आरोग्य प्राप्त होते.

आहार हवा उतरत्या क्रमात
बरेचदा लोकांना एकाच वेळी भरपूर जेवण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे. त्याऐवजी दिवसातून चार वेळा खाल्ले पाहिजे. आपला हा आहार उतरत्या क्रमात असला पाहिजे. म्हणजे सकाळची न्याहारी बऱ्यापैकी असावी. त्यानंतर जेवणाचे प्रमाण थोडे थोडे कमी करावे. रात्री कमी जेवावे. प्रत्येक जेवणाच्या वेळी सकस आहार जाईल, याकडे कटाक्ष असावे. आहारात अत्यंत तेलकट, तूपकट पदार्थांचा समावेश टाळावा. असे केल्याने हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबासारखे आजार दूर राहतात.

नियमित तपासणी
भरपूर पाणी प्यावे. त्याने शरीरातील पाण्याचे संतुलन कायम राहते. शरीरातील मीठ आणि साखरेचे प्रमाणही कायम राखणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी ही चतुःसूत्री पाळत असताना नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वयानुरूप तपासण्या करणे क्रमप्राप्त ठरते. अशा तपासण्यांतून वेळीच रक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार आदी आजारांना आळा घालता येतो.

बातम्या आणखी आहेत...