Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | To facilitate the arrangement of the passengers to the railway collector, 40 people give 300 meals daily

रोजेधारक रेल्वे प्रवाशांना सहेरीची सोय, ४० जण रोज देतात ३०० जणांना जेवण

म. युसूफ शेख | Update - May 20, 2019, 09:59 AM IST

यंदाचे हे दुसरे वर्ष असून रमजानचा पूर्ण महिना ही सेवा वाखाणण्याजोगी

 • To facilitate the arrangement of the passengers to the railway collector, 40 people give 300 meals daily

  सोलापूर - वाडी रेल्वे स्टेशनवर दिवसभर मोठ्या प्रमाणात रेल्वे धावत असतात. रात्री साडेअकरा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत जेवढ्या रेल्वेगाड्या येथून ये-जा करतात, त्यातील रमजानचा रोजा करणाऱ्या मुस्लिम प्रवाशांना जेवण पोहोचवण्याचे काम भाई भाई ग्रुपच्या वतीने केले जात आहे. वाडी रेल्वे स्टेशनवर साधारण चाळीस तरुण सुमारे अडीचशे त तीनशे रेल्वे प्रवाशांना सहेरीचे जेवण देत आहेत. यंदाचे हे दुसरे वर्ष असून रमजानचा पूर्ण महिना ही सेवा वाखाणण्याजोगी होत आहे. महाराष्ट्रातील हे उपक्रम इतर राज्यात रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून पोहोचत आहे.


  राेजेधारकांना इफ्तार आणि सहेरीच्या वेळी जेवणाची सोय करणे इस्लाम धर्मात खूप पुण्याचे मानले जाते. त्यासाठी अनेक जण मशिदीमध्ये जेवणाची सोय करतात. मात्र, प्रवासादरम्यान सायंकाळी इफ्तारच्या वेळी कुठेही जेवण मिळते. पण पहाटे सहेरीच्या वेळी प्रवासादरम्यान जेवण मिळणे कठीण असते. रात्री घेतलेले जेवण पहाटेपर्यंत खराब होते. त्यामुळे सहेरी करताना अडचणी येतात. वाडी स्टेशनवरून असंख्य रेल्वे ये-जा करत असतात. त्यामुळे येथे उभे राहून रोजेधारक रेल्वे प्रवाशांना जेवण देण्याचा संकल्प करण्यात आला. भाई भाई ग्रुपने हा संकल्प केला आणि गेल्या वर्षीपासून हा संकल्प अमलात आणला. या ग्रुपमध्ये सुमारे ४० ते ५० तरुणांचा सहभाग आहे. सर्वजण स्वेच्छेने वर्गणी जमा करतात. आणि याच पैशातून हा उपक्रम राबवतात. या उपक्रमासाठी रेल्वे प्रशासनाची रीतसर परवानगी घेण्यात आली. यानंतर व्हाट्सअप, फेसबुक द्वारे प्रसार करण्यात आला. संपर्क नंबर देण्यात आले. रेल्वे प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाल्याने तरुणांचा उत्साह वाढला. गेल्या वर्षी प्रथम दीडशे ते पावणे दोनशे प्रवाशांना सहेरीला जेवण दिले जात हाेते.

  सकाळी साडेचारपर्यंत जेवण देतो
  रेल्वे प्रवाशांना सहेरीला खूप अडचण येते, हे जाणून गेल्या वर्षीपासून आम्ही वाडी रेल्वे स्टेशनवर पहाटे साडेचारपर्यंत जेवढ्या रेल्वेगाड्या येतात त्यातील रमजानचा रोजा करणाऱ्या व्यक्तींना आम्ही जेवण पुरवतो.
  मो. इरफान,भाई भाई ग्रुप

Trending