आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिस्थितीवर मात करणे शिका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आमच्या वेरूळच्या घराची दुरुस्ती एक प्रौढ वयाचा मिस्त्री व त्याच्या हाताखाली चार तरुण मुले करत होती. त्यांच्या दुपारच्या जेवणाची वेळ झाली. जेवण झाल्यानंतर तीस मिनिटे ते आराम करत, कोणी तळहातावर तंबाखू मळत होता, तर कुणी गुटख्याची पुडी तोंडात ओतत होता. जेव्हा मी दुपारचा चहा देण्यास गेले, तेव्हा मला दिसले की, एक मुलगा पुस्तकाच्या रॅकमधून वेरूळ लेणीवरील पुस्तक घेऊन वाचण्यात गुंग होता. मी त्या मुलाला हसतच म्हटले, ‘अरे प्रत्यक्ष लेणी पाहण्याऐवजी पुस्तकात काय शिल्पे पाहतोस? ’ त्यावर त्याने जे उत्तर दिलं त्यावरून मला थेट म्हण आठवली, गरज ही शोधाची जननी आहे. तो म्हणाला, ‘मी येथील तांड्याच्या वस्तीत राहणारा आहे, सुट्यांत मिळेल ते काम करून पैसे साठवले आणि पदवीपर्यंतचे शिक्षण केले. नोकरीसाठी अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो. त्यांनी माझा बायोडाटा पाहिला. मी वेरूळचा रहिवासी आहे, हे त्यांना समजले असता त्यांनी मला वेरूळ लेणी, दौलताबाद, खुलताबाद याविषयी प्रश्न विचारले. यावर काहीच वाचन नसल्यामुळे मी समाधानकारक उत्तरे देऊ शकलो नाही आणि त्यामुळे रिजेक्ट झालो. आता तेच पुन्हा घडायला नको म्हणून हे वेरूळ लेणीचे पुस्तक दिसले आणि तुमची परवानगी न घेता पुस्तक वाचण्यास घेतले, मला क्षमा करा. त्याची ही विनयशीलता पाहून मला राहवलं नाही. मी त्याला म्हटलं , ‘ते पुस्तक घरी घेऊन जा. तुझ्याकडेच ठेव’. त्याला साहजिकच आनंद झाला. जी मुले म्हणतात की, गरिबीमुळे किंवा वडील वारल्यामुळे आम्ही शिकू शकलो नाही, त्यांनी ही मानसिकता बदलायला हवी.