खरीपपूर्व आढावा / खरीपपूर्व आढावा : प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; अधिकाऱ्यांना धरले धारेवर, बँकांनाही दिल्या सूचना

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता, दुबार पेरणीचे संकट नाही
 

विशेष प्रतिनिधी

Jun 08,2019 08:49:46 AM IST

मुंबई - हवामान खात्याने यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरा कराव्यात, असा सल्लाही देण्यात आला असल्याने दुबार पेरणीचे संकट या वेळी उद्भवणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खते, बी-बियाणे, बँकांचे कर्ज आणि सरकारच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, गाव, तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून जुन्या माहितीवर आधारित अहवाल तयार न करता प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती संकलित करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.


अधिकारी कार्यालयात बसतात आणि अहवाल तयार करतात. त्याचा शेतकऱ्यांना आणि पर्यायाने राज्य सरकारला फटका बसतो. राज्य सरकार सर्व त्या उपाययोजना करत असतानाही शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले...
> खरीप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा असून त्याचा तुटवडा भासणार नाही.
> कीटकनाशक फवारणीच्या बाबतीतही योग्य दक्षता घेतली असून या वेळी कीटकनाशकांची फवारणी करताना मृत्यू होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.
> यंदा मक्यावर लष्करी अळीचे संकट घोंगावत आहे. यावर कारवाईसाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असून त्याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.

दुबार पेरणीचे संकट नाही
यंदा कोकण, गोव्यात ९२ ते १६०%, मध्य महाराष्ट्रात ९३ ते १६० , मराठवाड्यात ८९ ते १११ आणि विदर्भात ९२ ते १०८ % पाऊस होईल, असा अंदाज आहे. जून, जुलैमध्ये कमी पाऊस असून ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मात्र चांगला पाऊस पडणार असल्याने दुबार पेरणीचे संकट या वेळी शक्यतो उद्भवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्यावे...
गेल्या वर्षी दुष्काळामुळे पीक कर्जाला कमी मागणी होती. यंदा मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा तसेच सरकारी बँकांना शेतकऱ्यांना ताबडतोब पीक कर्ज द्यावे, असे सूचित करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतीशाळांच्या मदतीने गेल्या वर्षी फायदा...
शेतीसाठी मार्गदर्शन व्हावे, कोणते पीक घ्यावे, कोणते कीटकनाशक फवारावे, पेरणी कधी -कशी करावी याची माहिती देण्यासाठी १२ हजार ठिकाणी शेतीशाळा आयोजित करण्यात आल्या असून गेल्या वर्षी याचा चांगला फायदा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात खरिपाचे १५१ लाख हेक्टर क्षेत्र : राज्यात खरिपाचे १५१ लाख हेक्टर क्षेत्र असून सरासरी ५५ ते ६० टक्के क्षेत्रावर कापूस व सोयाबीन लागवड होते. भात १० टक्के, ऊस ८ टक्के, मका ११ टक्के व उर्वरित क्षेत्रावर इतर पिके घेतली जातात. राज्यात कापूस, सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे.

X
COMMENT