आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर गर्दीमध्ये आपलं गाणं ऐकण्यासाठी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुणी ‘वेगळं’ म्हणून त्याचा जीव घेण्यापेक्षा प्रत्येकाचं स्वतंत्र गाणं आहे, हे शिकणं किती अवघड आहे? ‘नॉर्मल’पणाचा भुसभुशीत ठोकळा नुसत्या फुंकरीने कोसळू शकतो, म्हणून तर आपण पुन्हा पुन्हा त्याच्या भिंती लिंपत राहतो. चढाओढीने दुसऱ्याचं ‘वेगळं’, ‘ॲबनॉर्मल’ असणं सांगत राहून स्वतःच्या नॉर्मलपणाला बळकट करू पाहतो.‘नॉर्मल’- ‘ॲबनॉर्मल’पणाच्या द्वैतापलिकडे सर्वांना त्यांचं गाणं शोधू देऊ आपण?
 
 
आफ्रिकेतल्या हिंबा जमातीमध्ये माणसाचं वय त्याच्या जन्मापासून मोजलं जात नाही. होणारी आई आपल्याला मूल व्हावं, असं ठरवते, त्या दिवसापासून त्या मुलाचं वय मोजलं जातं. आपल्या मनात बाळाच्या कल्पनेला जन्म देऊन मग ही स्त्री वस्तीपासून दूर जाते. एखाद्या झाडाखाली बसते. आपल्या होणाऱ्या बाळाचं गाणं ऐकू येण्याची ती वाट पाहते. हे गाणं सापडलं की, पुन्हा पुन्हा म्हणून ती ते स्वतःजवळ पक्कं करून घेते. मग हे गाणं घेऊन ती परत येते आणि बाळाच्या होणाऱ्या  बाबाला ते गाणं शिकवते. दोघं मिळून हे गाणं गाऊन बाळाला बोलावतात. पुढे ही बाई गरोदर झाली की मग ती तिच्या कुटुंबाला, गावातल्या बायकांना हे गाणं शिकवते. बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या दाया आणि घरातल्या बायका बाळाला हे गाणं म्हणून दाखवतात. हे मूल मोठं होत जातं, तसं सगळं गावच त्याचं गाणं शिकतं. त्या मुलाला खेळवताना, झोपवताना, त्याचं कौतुक करताना, त्याचं काही दुखलं खुपल्यावर त्याला समजावताना सारं गाव त्याच्यापाशी त्याचं गाणं गातं. पुढे या मुलाच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या महत्वाच्या प्रसंगी हे गाणं गायलं जातं. लग्नात नवरा नवरीची गाणी गायली जातात. जन्मापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत आपलं हे गाणं हिंबा मुलामुलींची सोबत करत राहतं. आणखी एका विशेष प्रसंगी हे गाणं गायलं जातं. जर एखाद्याने काही अपराध केला, कुणाला खूप दुःख होईल, असं काही केलं, तर या आरोपीला गावाच्या मध्यभागी बोलावलं जातं. सगळे गावकरी त्याच्याभोवती कोंडाळं करून उभे राहतात आणि त्याचं गाणं गातात. 
 
 
हिंबा जमातीमध्ये असं मानलं जातं, की कोणत्याही गुन्ह्याचं उत्तर शिक्षा नाही, तर प्रेम आहे. आपल्या गाण्याची आठवण करून देणं हे त्याचं उत्तर आहे. जेव्हा आपण आपलं गाणं ओळखतो, ते आपल्या मनात जपत राहतो, तेव्हा आपल्याला दुसऱ्याला दुखवायची किंवा कुणाला त्रास होईल असं काही वागायची इच्छाच उरत नाही, असं हा समाज मानतो. समाजाला जे वागणं चुकीचं वाटतं, त्याची माणसाला जाणीव करून देताना, त्या माणसाच्याच गाण्याची आठवण हा उपाय ते मानतात. आपलं गाणं, आपल्यावरचं आपल्या समाजाचं प्रेम ओळखून मग त्या माणसानं पुढे जावं, हेच हा समाज शिकवतो. 

काही वर्षांपूर्वी कुठेतरी वाचलेली ही गोष्ट आठवली की आपणही हिंबा मुलगी का नाही, असं मला वाटत राहतं. आपल्या आईचं, बापाचं, गावाचं प्रेम असं रोजच्या सुखदुःखात पांघरायला मिळणारी ही माणसं किती श्रीमंत असणार! मग वाटतं की आपल्या गाण्याची आठवण होण्यासाठी आपण आफ्रिकेतच जन्माला यायला हवं, असं थोडंच आहे? आपलं गाणं ऐकू येण्यासाठी गावाबाहेरच्या रानातल्या एकांड्या झाडाखालीच बसायला हवं असं काही नाही. नीट कान देऊन ऐकलं, तर लोकलच्या कलकलाटात किंवा भाजी मंडईतल्या गर्दीतही हे गाणं भेटू शकतं. हिंबा स्त्रियांसारखी वाट पाहण्याची चिकाटी आणि शांततेत सुख मानण्याची तयारी हवी फक्त. आपलं हे गाणं, आपला सूर सापडावा, म्हणून तर बुद्ध, तुकाराम आणि कबिरासारख्या सगळ्यांनी भर बाजारात स्वतःशी भांडण काढलं होतं. दर वर्षी वारी येते आणि आपलं दुःख आणि आनंद यांना एकत्र पकडणारं गाणं शोधण्याच्या प्रयत्नात हजारो वारकरी तोच रस्ता ओलांडत राहतात. माझ्या आत लपलेलं ‘माझं गाणं’ हेच तेव्हा ठेका पकडून जगाच्या दुःखाशी आणि आनंदाच्या सुरावटीशी एकरूप होऊ पाहतं. इथे मात्र एरवी आपल्याला शिकवलं गेलं आहे, की स्वतःला नाकारूनच पुढे जाता येतं. एका अजस्त्र यंत्रातले एकसारखे खिळे झाल्यानंतर कसं टिकणार आपलं स्वतंत्र गाणं? हातमागावरच्या कापडावरच्या एकसलग विणकामावर अवचित मिसळणारा रंगीत धागाच गायब करून टाकला या अजस्त्र यंत्राने आणि मग कापडाचे मागसुद्धा एकसलग इस्त्री केलेले करकरीत झाले. आपल्यावरची प्रत्येक घडी इस्त्रीने सरळ करून टाकायची, वर आलेला प्रत्येक धागा कापून सरळ करायचा, तेव्हा कुठे आपण विकण्यायोग्य ‘स्टॅन्डर्डाइज्ड माल’ होतो. आपल्या गाण्याला असा निरोप देताना आपण स्वतःवरच्या प्रेमालाही सोडचिठ्ठी देतो. आपल्यात अमुक नाही, आपल्याला तमुक जमत नाही, म्हणून सतत स्वतःला कोसत राहतो. मग जिंकण्यासाठी सारखी बक्षीसं लागतात. उंचावलेली प्रत्येक नजर, टिंडरवरचा प्रत्येक स्वाईप प्रचंड मोलाचा होऊन जातो. स्वतःला एकदा असं ठोकळ्यासारखं मापात बसवलं की मग आपल्याला ‘स्वाईप राईट’ करण्याचे हक्क आपण कायमचे जनतेच्या हातातल्या स्मार्टफोनमध्ये देऊन टाकतो.
 
 
खरंतर आपण सगळेच चुकत असतो, अपुरे पडत असतो. जाणता अजाणता जवळच्या माणसांना दुखावत असतो. पण असं सगळं असताना, आपल्या गाण्याच्या गैरहजेरीत आपल्याला स्वतःला माफही करता येत नाही आणि चूक सुधारून मोठंही होता येत नाही. स्वतंत्र गाणी नाकारणाऱ्या या प्रदेशात ‘व्यवस्थे’साठी कायम चूक आणि बरोबरचे ठळक कप्पे करावे लागतात. काही लोक ‘गुन्हेगार’ असल्याचा निवाडा देऊन आपण त्यांना तुरुंगात टाकतो. काही लोक ‘वेडे’ म्हणून घोषित करून त्यांना दवाखान्यात भरती करतो. काही लोकांना आपल्या एनआरसी यादीतून वगळून, निर्वासित म्हणून घोषित करतो, हद्दपार करू पाहतो. असं सगळं केलं की आपण ‘नॉर्मल’ नागरिक म्हणून सुटकेचा निश्वास टाकतो आणि रात्रीची शांत झोप घेतो. आम्ही सगळे ‘नॉर्मल’ आणि ते सगळे ‘ॲबनॉर्मल’, समाजात राहायला अयोग्य, अशी वाटणी करून आपण स्वतःला सुरक्षित तर करून घेतो, पण आपली गुन्हेगारी, आपलं वेडेपण हे कितीही पांघरुणं घातली तरी लपता लपत नाही. 
 
 
‘नॉर्मल’पणाचा भुसभुशीत ठोकळा नुसत्या फुंकरीने कोसळू शकतो, हे आपल्याला माहीत असतं, म्हणून तर आपण पुन्हा पुन्हा त्याच्या भिंती लिंपत राहतो. चढाओढीने, आणखी आक्रमकपणे दुसऱ्याचं ‘वेगळं’, ‘ॲबनॉर्मल’ असणं सांगत राहून स्वतःच्या नॉर्मलपणाला बळकट करू पाहतो. पूर्वीच्या काळी गुन्हेगारांना भर चौकात फाशी दिलं जायचं. ‘वेडं’ समजल्या गेलेल्यांवर उपचारांच्या नावाखाली भयंकर अत्याचार व्हायचे. चार बायकांसारख्या मान खाली घालून राहू न शकणाऱ्या बायकांना ‘डाकिण’ ठरवून त्यांचे जीव घेतले जायचे. आपल्याला वाटतं, आता काळ फार बदलला. पण खरंतर सभ्यपणाच्या नावाखाली आपण फक्त मधे एक पडदा टाकला. पडद्याच्या अलिकडे आपण सारे ‘नॉर्मल’ आणि पलिकडे ते सगळे ‘वेगळे’ एवढाच काय तो फरक. या नॉर्मलपणाच्या नावाखाली विकृतपणे कत्तली करणं काही आपण थांबवलं नाही. या नॉर्मल- ॲबनॉर्मलच्या खुनी द्वैतालाच नाकारायचं, तर प्रत्येकालाच त्याच्या, तिच्या गाण्याची आठवण करून द्यावी लागेल. एकमेकाचं प्रेम पांघरण्यासाठी कोंडाळं करायचं तर आपल्या गावातली हवा आधी स्वच्छ करावी लागेल. 
 
कुणी ‘वेगळं’ म्हणून त्याचा जीव घेण्यापेक्षा प्रत्येकाचं स्वतंत्र गाणं आहे, हे शिकणं किती अवघड आहे? दुसऱ्याला दुखवायचं नाही, एवढीच जर आपल्या गाण्याच्या आठवणीची पूर्वअट असेल, तर आपणच होऊ आपली आई. आपणच आपलं मूल आहोत, असं प्रेम करता येईल का आपल्याला आपल्यावर? ‘नॉर्मल’- ‘ॲबनॉर्मल’पणाच्या द्वैतापलिकडे सर्वांना त्यांचं गाणं शोधू देऊ आपण? भर गर्दीतून वाट काढताना मी कान देऊन ऐकू पाहतेय...
 

लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२

बातम्या आणखी आहेत...