आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भुसावळ - रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी लोकोपायलट व गार्डच्या माणुसकीमुळे त्याच रुळावरून गाडी तब्बल एक ते दीड किमी उलट दिशेने धावली. जखमी प्रवाशाला गाडीत घेत ही गाडी पुन्हा नियोजित मार्गावर पुढे गेली. त्यामुळे जखमी प्रवाशाला वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परधाडे ते माहेजी स्थानकादरम्यान देवळाली-भुसावळ पॅसेंजरबाबत घडली.
पाचोरा येथील चिंतामणी कॉलनीतील रहिवासी राहुल संजय पाटील (२२) जळगावच्या आयएमआर कॉलेजमध्ये बीसीएचे शिक्षण घेत आहे. तो रोज रेल्वेने जा-ये करतो. गुरुवारी सकाळी तो देवळाली-भुसावळ पॅसेंजरने निघाला होता. पॅसेंजरमध्ये गर्दी असल्याने तो दरवाजाजवळ उभा होता. वाटेत माहेजी स्थानकाजवळील रेल्वे खांब क्र. ३८३ जवळ तो धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झाला. गाडीतील प्रवाशांसमोर ही घटना घडल्याने ट्रेन लाइव्ह प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांना घटनेची माहिती दिली. पाचोरा स्टेशन प्रबंधक एस. टी. जाधव व परधाडे येथील सहायक स्टेशन मास्टर के. जे. बर्डे व माहेजीचे स्टेशन मास्टर ए. एस. पाल यांना कळवण्यातआले. त्यानंतर प्रवाशांनी साखळी ओढून परधाडे ते माहेजीदरम्यान गाडी थांबवली. पॅसेंजरचे गार्ड व लोकोपायलट यांनी चर्चा करून जखमीचे प्राण वाचवण्यासाठी पॅसेंजर त्याच रुळांवरून दीड किमी उलट दिशेने नेली. जखमी राहुल यास गाडीत घेऊन पॅसेंजर पुन्हा जळगावकडे मार्गस्थ झाली.
साखळी ओढल्यानंतरही गाडी दीड-दोन किमी धावली
पॅसेंजरमधील प्रवाशांसमोर ही घटना घडल्याने त्यांनी तत्काळ धोक्याची साखळी ओढून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, साखळी ओढूनही गाडी दीड ते दोन किमी पुढे गेली होती. गाडी थांबल्यावर अप-डाऊन करणाऱ्या तरुणांनी धावपळ करत जखमीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जखमी न आढळल्याने पॅसेंजर पुन्हा उलट दिशेने नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
म्हसावदला केले प्रथमोपचार
माहेजी स्थानकावर जखमी राहुलला उतरवण्यात आले. तेथून रुग्णवाहिकेद्वारे त्याला म्हसावद रेल्वेस्थानकावर आणून प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पॅसेंजर गाडी परधाडे ते माहेजीदरम्यान ३५ मिनिटे थांबली होती.
वाढीव डबा जोडावा
पॅसेंजर गाडीचे लोकोपायलट व गार्ड यांनी समन्वय साधून माणुसकीचे दर्शन घडवल्याने जखमीला वेळीच उपचार मिळाले. जखमीला मदत करण्यासाठी प्रवाशांनीदेखील पुढाकार घेतला. रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे चाकरमाने व प्रवाशांना धावपळ करावी लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अप-डाऊन करणाऱ्यांसाठी एमएसटी बोगी अथवा वाढीव बोगी जोडणे गरजेचे आहे.
- दिलीप पाटील, सदस्य, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.