आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज निकाल : लोकसभेच्या ५४२ जागांसाठी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्रात पुढील सरकार कोणाचे असेल हे आज स्पष्ट होईल. लोकसभेच्या ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सुरू होईल. दुपारपर्यंत कल स्पष्ट होतील, तर अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत लागतील. बुधवारी निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची मागणी फेटाळत मतमोजणीचे नियम बदलण्यास नकार दिला. व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या आणि ईव्हीएममधील मतांची पडताळणी मतमोजणीच्या शेवटी होईल. ही पडताळणी मतमोजणीच्या प्रारंभी व्हावी अशी २२ विरोधी पक्षांची मागणी होती. 


आयोगाच्या भूमिकेवर नाराज झालेल्या काँग्रेसने हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे सांगत दुबळ्या निवडणूक आयोगाचा दुबळा निर्णय असे म्हटले आहे. दरम्यान, गृह मंत्रालयाने मतमोजणीच्या काळात देशातील विविध भागांत हिंसाचाराची शक्यता व्यक्त केली आहे. मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना अलर्ट जारी करत कायदा सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी तसेच स्ट्राँग रूमभोवती कडक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यास सांगितले आहे.  मंत्रालयाने म्हटले की, मतमोजणीच्या काळात काही जणांनी हिंसाचाराची धमकी दिली आहे. 

 

व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या पडताळणीशी संबंधित दोन नियम; निकाल निश्चितीसाठी लागू शकतो पाच तासांचा अतिरिक्त वेळ

 

मतमोजणी कशी होते?  
मतांची मोजणी ८ वाजता सुरू होईल. सर्वप्रथम रिटर्निंग ऑफिसर, ऑब्झर्व्हर आणि उमेदवार किंवा त्यांचे एजंट यांच्यासमोर स्ट्राँग रूमचे सील उघडण्यात येईल. तेथून ईव्हीएम मोजणी टेबलावर आणण्यात येतील. सर्वप्रथम मतदान केंद्र क्रमांक १ ची मोजणी होते. टपाली मतपत्रिकांसाठी जास्तीत जास्त ४ टेबल असतील. एका फेरीत ५०० मतपत्रांची मोजणी होईल. ही प्रक्रिया ईव्हीएमच्या मोजणीसोबतच सुरू राहील. मात्र, ईव्हीएमची मोजणीच्या शेवटच्या दोन फेऱ्या टपाली मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतरच सुरू होईल.

 

या वेळी नवे नियम कोणते आहेत? यंदा दोन नियम नवे आहेत

१) टपाली मतदानात इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम (ईटीपीबीएस) देखील आहे. लष्कर आणि सुरक्षा दल कर्मचारी ईटीपीबीएसद्वारे  आणि निवडणूक ड्यूटी असलेले कर्मचारी टपाली मतदान करू शकतात. ईटीपीबीएसचे क्यूआर कोड स्कॅन करण्यात येतील. १८ लाख नोंदणीकृत सर्व्हिस मतदारांपैकी १६.४९ लाखांनी मतदान केले आहे.

 

२) या वेळी प्रथमच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांतील ईव्हीएमचा डेटा आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी होईल. देशभरात २०,६०० केंद्रांतील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी होईल. हे काम मतमोजणीच्या शेवटी होईल. 

 

निकाल लागण्यास उशीर होईल का? : अधिकाऱ्यांच्या मते, ईटीपीबीएसचे क्यूआर कोड स्कॅन करण्यात काही तास जास्त लागतील. प्रारंभी कल १० ते ११ वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता अाहे. दुसरीकडे मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक िवधानसभा मतदारसंघातील पाच -पाच केंद्रांतील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी होईल. एका केंद्रात ८०० ते १२०० पर्यंत मतदार अाहेत. विविध लोकसभा मतदारसंघांत पाच ते १७ पर्यंत विधानसभा मतदारसंघ अाहेत. निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांच्या मते निकाल निश्चित होण्यास चार ते पाच तास जास्त लागतील.

 

व्हीव्हीपॅट चिट्ठ्या अाणि ईव्हीएम डेटा यांची जुळणी झाली नाही तर काय?  
ईव्हीएम डेटा व व्हीव्हीपॅट चिट्ठ्या यांच्या तफावत अाढळल्यास चिठ्ठ्यांची संख्या अंतिम मानली जाईल. निकालपत्रात त्यानुसार बदल होईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिअो चित्रीकरण होईल.

 

महाराष्ट्रात मतमोजणीच्या जलद माहितीसाठी विविध सुविधा

मुंबई | राज्यातील जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळावी यासाठी विविध सुविधा दिल्या आहेत. सर्वांना https://ceo.maharashtra.gov.in  तसेच भारत निवडणूक आयोगाच्या  https://results.eci.gov.in या संकेतस्थळांवर निवडणूक निकाल पाहता येतील. Voter Helpline या आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या मोबाइल ॲपवरही निकाल पाहता येणार आहेत. 1950 या टोल फ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षातील 022-22040451 / 54 या क्रमांकावरदेखील निकालाची अद्ययावत माहिती २४ तास मिळणार आहे. मतमोजणीदरम्यान इव्हीएमशी संबंधित तक्रार असल्यास आयोगाच्या 011- 23052123 या क्रमांकावर ती दाखल करता येईल.