ministry / राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला आज मुहूर्त! सावे, शेलार, विखेंना मंत्रिपद; रिपाइंच्या महातेकरांना लॉटरी!

सुरेश खाडे, अनिल बोंडे, परिणय फुके, संजय कुटेंचाही समावेश, सेनेची नावे गुलदस्त्यात

विशेष प्रतिनिधी

Jun 16,2019 08:53:00 AM IST

मुंबई - होणार-होणार म्हणत अखेर राज्य मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुहूर्त सापडला. रविवारी सकाळी ११ वाजता राजभवन येथे नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्रिपद देण्यात येणार असून मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, मावळचे संजय भेगडे आणि अमरावती मोर्शीचे अनिल बोंडे, रिपाइंचे अविनाश महातेकर यांची नावे राजभवनवर शपथविधीसाठी देण्यात आल्याचे समजते. शिवसेनेने मात्र त्यांच्या वाट्याला येणाऱ्या दोन मंत्रिपदांसाठी रात्री उशिरापर्यंत राजभवनावर नावे दिली नसल्याने या नावांबद्दलचा सस्पेन्स कायम राहिला.

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्धव यांच्याशी चर्चा झाल्याचे म्हटले होते. सध्या शिवसेनेकडे चार कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदे आहेत. एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम,आणि दिवाकर रावते हे कॅबिनेट मंत्री असून दीपक सावंत यांचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. अर्जुन खोतकर, रवींद्र वायकर, दादा भुसे, संजय राठोड आणि विजय शिवतारे हे पाच राज्यमंत्री आहेत.

उद्धव ठाकरे यांची शपथविधीला अनुपस्थिती : रविवारी सकाळी ११ वाजता शपथविधी असल्याने व उद्धव ठाकरे सहकुटुंब अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने ते उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिपदासाठी ही नावे चर्चेत
राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, आशिष शेलार, अनिल बोंडे, अतुल सावे, संजय भेगडे, सुरेश खाडे, जयदत्त क्षीरसागर (शिवसेना), तानाजी सावंत (शिवसेना), अनिल परब (शिवसेना), अविनाश महातेकर (रिपाइं) ही नावे शनिवारी चर्चेत होती.

या मंत्र्यांना डच्चू?
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे, राजकुमार बडोले, राजे अंबरीश अत्राम यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्रिपद नाही... शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळणार आहे. जयदत्त क्षीरसागर व तानाजी सावंत, अनिल परब यांची नावे आघाडीवर आहेत. सेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रिपद न घेण्याचा निर्णय घेतल्याने हे पद आता दिले जाणार नाही, असे सांगितले जात आहे.

X
COMMENT