आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जोधपुर : राजस्थानच्या बिकानेर येथील कथित जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वढेरा आणि त्यांची आई मौरीन हे जयपूरमध्ये मंगळवारी सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) होणाऱ्या चौकशीसाठी हजर झाले आहेत. हे दोघेही कार्यालयाच्या बाहेर पोहोचताच, तेथे उपस्थिती असलेल्या त्यांच्या समर्थकांनी 'चौकीदार चोर है' च्या घोषणा दिल्या.
बिकानेरमधील जमीन घोटाळा प्रकरणात आपल्याविरोधात कठोर कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका रॉबर्ट वढेरा आणि त्यांच्या आईने राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर या दोघांंनी चौकशीत ईडीला सहकार्य करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार हे दोघे ईडीसमोर हजर झाले आहेत. ईडीने या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी वढेरा यांना तीन वेळा समन्स बजावले होते, पण ते तिन्ही वेळा गैरहजर राहिले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बिकानेर येथील हे जमिनीचे खरेदी प्रकरण जेथील आहे ते भारत-पाकिस्तान सीमेजवळील आहे. ही जमीन देताना कथित घोटाळा झाल्याची तक्रार बिकानेरच्या तहसीलदारांनी केेली होती. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या एफआयआरची व आरोपपत्रांची दखल घेत ईडीने २०१५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. ही जमीन मेसर्स स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. या संस्थेने खरेदी केली होती. या संस्थेशी वढेरांच्या कथित संबंधांचा आरोप आहे.
ईडीसमोर हजेरीची वढेरांची चौथी वेळ
वढेरा हे ईडीसमोर हजर राहण्याची ही चौथी वेळ असेल. याआधी परदेशात अवैधरीत्या मालमत्ता जमा केल्याच्या प्रकरणात ते तीन वेळा हजर झाले होते. तीन सत्रांत एकूण २४ तास त्यांची चौकशी झाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.