आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तुम्हीच न्यायाधीश, तुम्हीच सत्ताधीश!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिय वाचक,

आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आज मतदान आहे. आज तुम्ही नायक आहात, निर्णायक आहात.  तुम्ही सत्ताधीश आहात. तुम्हीच न्यायाधीश आहात. लोकशाही आज ज्या टप्प्यावर आहे, त्याचे एकमेव कारण तुम्ही आहात. 

सोपा नव्हता हा रस्ता. किती खडतर आव्हानं होती! संकटांचे डोंगर उभे होते. तरीही आपण चालत राहिलो. गेल्या सात दशकांमध्ये आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. याचं श्रेय कुणाचं असेल तर ते तुमचं आहे. लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे, तोच सत्ताधीश आहे, हे सिद्ध करण्याची वेळ पुन्हा आली आहे. 

तुम्ही ‘न्यूटन’ सिनेमा पाहिलाय? आजही अशी अनेक गावं आहेत की जिथं मतदान होणं, हेच यंत्रणेसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. कल्पना करा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा ही प्रक्रिया किती कठीण असेल! असा महाकाय देश, एवढी प्रचंड लोकसंख्या. दुर्गमता, दळवळणाची साधनं नाहीत. तरीही सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला. आपण तो बजावत राहिलो आणि आज आपण या वळणावर आहोत. मतदारांच्या शहाणपणामुळेच असा प्रवास आपण करू शकलो. आता ते शहाणपण आपल्याला अधोरेखित करायचे आहे. 

‘Bandwagon Effect’ ही संकल्पना राज्यशास्त्रात वापरली जाते. म्हणजे काय? लोक विशिष्ट प्रकारे मतदान करत आहेत, म्हणून व्यक्तीचे मत वेगळे असले तरी ती इतरांप्रमाणेच मतदान करते. मतदारसंघात अशी ‘हवा’ आहे, या प्रकारचं ‘वातावरण’ आहे, असं मतदाराला वाटण्यामध्ये माध्यमांची भूमिका मोठी असते. वारं कुठं वाहतंय, याचा विचार न करता, योग्य उमेदवाराला मतदान करायला हवं.  दाखवलं जातं, तेच वास्तव नसतं.

भारताच्या लोकशाहीचा, निवडणुकांचा प्रवास पाहिला की, स्तिमित व्हायला होतं. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये एक संदर्भ आहे. स्वातंत्र्यापूर्वी ज्या प्रांतिक निवडणुका झाल्या, त्यासंदर्भात पं. नेहरूंनी लिहिलेलं आहे ः त्या निवडणुकांमध्ये नेहरूंनी जो प्रचार केला, तो कधी घोड्यावरून, कधी उंटावरून. कधी बोटीतून केला, कधी होडीतून. एवढ्या महाकाय देशात प्रचार करणं, तेही तेव्हा की, जेव्हा फारशी माध्यमं नव्हती! तेव्हाच्या प्रचारसभांचा तो काळ आणि आता व्हॉट्सॲप प्रचंड व्हायरल झाल्यानंतरची ही निवडणूक. प्रचार सुरू असतानाच आपण तो फेसबुकवर लाइव्ह बघत असतो. माध्यमांनी सगळं जग बदलून टाकलेलं आहे. माध्यमांनी बदलून टाकलेली प्रचाराची पद्धत, बदलत चाललेल्या निवडणुका. गेल्या सात दशकांमध्ये असे खूप बदल होत गेले. तरीसुद्धा लोकशाहीचा मुख्य केंद्रबिंदू आहे, तो कायम राहिलेला आहे.  

प्रत्येक प्रौढाला मताधिकार, ही भारतीय राज्यघटनेनं घेतलेली मोठी झेप आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना एक पुस्तक भेट म्हणून दिले. त्यावर ओबामांनी लिहिलं, ‘फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रसी, टू द लार्जेस्ट डेमोक्रसी.’ म्हणजे, अमेरिकेसारख्या सर्वात जुन्या लोकशाहीकडून भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. कॉम्रेड सीताराम येचुरी या वेळी तिथे होते. ते हसत हसत ओबामांना म्हणाले, ‘मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट, नॉर लार्जेस्ट.’ ओबामा एकदम चमकलेच! त्यांना या विधानाचा अर्थ समजेना. त्यावर येचुरी म्हणाले, ‘४ जुलै १७७६ रोजी तुम्ही स्वतंत्र झालात हे खरे, पण १९६५ पर्यंत तुमच्या देशात सर्वांना मताधिकार नव्हता. गोरे नसलेल्यांना आणि महिलांनाही दीर्घकाळ मताधिकार नव्हता. त्यासाठी त्यांना मोठा झगडा उभा करावा लागला. म्हणजे, १९६५ ला तुम्ही खऱ्या अर्थाने लोकशाहीत आलात. याउलट आम्ही एका झटक्यात १९५० मध्ये सर्व प्रौढांना मताधिकार दिला.’

अमेरिकेसारख्या देशाला सर्वांना मताधिकार देण्यासाठी एवढी वर्षे लागावीत आणि भारताने मात्र तो एका झटक्यात द्यावा, याला कारण आहे. अन्य देशांमध्ये आधी स्वातंत्र्य चळवळ झाली आणि मग देशबांधणी झाली. भारतात मात्र स्वातंत्र्य चळवळीनेच देशाची बांधणी केली. 

या निवडणुकीचं आणखी एक वेगळेपण आहे. २१ व्या शतकात जन्माला आलेली पिढी पहिल्यांदाच या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करते आहे. त्यांनी ते केलं पाहिजे. कारण मतदार म्हणून त्यांचं एक राजकारण आहे. आपल्याकडे एक अडचण आहे. ‘राजकारण हा बदमाशांचा खेळ आहे’ असं म्हटलं जातं. ‘आपण कशाला पडायचं राजकारणात!’ याच्याइतकं मूर्ख विधान कुठलं नाही. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात उतरायला पाहिजे किंवा एखाद्या पक्षाचा सदस्य व्हायलाच पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की, तुमची ‘भूमिका’ असली पाहिजे. मतदार म्हणून तुमचं राजकारण असलं पाहिजे. ‘राजकारण’ हा शब्द अत्यंत व्यापक अर्थानं आहे. गांधी-नेहरूंनी, शाहू-फुले-आंबेडकरांनी, टिळक-आगरकरांनी, गोखल्यांनी राजकारण केलं नसतं तर आज तुम्ही असे दिमाखात वावरले असता? त्यांनीच नव्हे, तर त्यांच्यासोबत असलेल्या सर्वसामान्य माणसाने राजकीय भूमिका घेतली. राजकीय भूमिका घेणं हे फार महत्त्वाचं आहे. मतदार म्हणून तुमचं हे ‘राजकारण’ आहे. 

महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे. ते कसं असावं, कसं असू नये, हे ठरवणार कोण? ते आपल्यालाच तर ठरवावं लागणार आहे. लोकशाही प्रक्रियेचा केंद्रबिंदू आपण असू, तर महाराष्ट्राचं भवितव्यसुद्धा आपणाला निश्चित करावं लागणार आहे. आज महाराष्ट्राच्या समोर किती आव्हानं आहेत, हे आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्राची उद्याची दिशा कशी असावी, या अनुषंगानं निश्चितपणे आपल्या काही धारणा आहेत, आपली काही स्वप्नं आहेत. प्रत्येक निवडणूक येते तेव्हा स्वप्नं पेरण्याची संधी आपल्याला असते. कारण नवा महाराष्ट्र कसा असावा, या अनुषंगानं आपण काही कौल देऊ शकतो. मतदान करणं, ही त्यासाठीची मूलभूत गोष्ट. ‘मला काय त्याचं?’ असं म्हणाल, तर उद्या महाराष्ट्राचं जे काही होईल, त्याबाबत बोलण्याचा अधिकारही गमावून बसाल.

महाराष्ट्र हे काही छोटं राज्य नाही. लोकसंख्येचा विचार केल्यास, जगात केवळ दहाच देशांची लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. चीन, खुद्द भारत, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान, नायजेरिया, बांगलादेश, रशिया, जपान आणि कदाचित मेक्सिको या देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. एवढ्या लोकसंख्येचं हे राज्य. आणि, इतर देशांपेक्षा वेगळेपण असं की, या राज्यात अनेक भाषा, सर्व धर्म, वैविध्य आहे. तरीही गेल्या सहा दशकांमध्ये आपण केलेली वाटचाल देदीप्यमान आहे. अवघ्या देशाला, जगाला महाराष्ट्राविषयी कौतुक वाटतं, कुतूहल वाटतं. एवढ्या वैविध्यासह महाराष्ट्र ज्या गतीनं झेपावतो आहे, पुढे जातो आहे, याचं अनेकांना आश्चर्य वाटतं. अर्थात, हा आपला वारसा आहे. पण म्हणून आपल्यासमोरची आव्हानं मात्र कमी नाहीत. किंबहुना आपला वारसा जेवढा मोठा आहे, तेवढीच आव्हानंही खूप आहेत.

दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक म्हणजे हीच ती संधी असते. तुम्हाला पाच वर्षांचा हिशेब करता येतो. गेल्या पाच वर्षांत कुठं चुकलो, काय चुकलो, पुढची दिशा काय असावी, याचा विचार करता येतो. कुठला पक्ष, कुठला नेता हे महत्त्वाचं नाही. महाराष्ट्राचा विकास हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राची आणि देशाची मूल्यं जिवंत असणं, लोकशाही अबाधित असणं हे महत्त्वाचं आहे. आजवर तुम्ही अनेकदा अशा प्रकारचा पराक्रम केला आहे. इंदिरा गांधींपासून अनेक बलशाली नेत्यांचे पराभव देशाने पाहिलेले आहेत. भल्या भल्यांचा तोरा उतरवणारे मतदार काय करू शकतात, हेे राजकीय पक्षांनाही नीट माहिती आहे आणि राजकीय नेत्यांनाही ठाऊक आहे. कुणाला धडा शिकवणं वा अद्दल घडवणं, एवढंच ‘पॅसिव्ह’ काम मतदारांचं नाही. महाराष्ट्राचा उद्याचा चेहरा कसा असला पाहिजे, यासंदर्भात सारासार विचार केला गेला पाहिजे. ही निवडणूक महाराष्ट्राची तर आहेच, पण त्याचबरोबर स्थानिक मतदारसंघाचीही आहे. कुठला उमेदवार, कुठला पक्ष तुम्हाला न्याय देऊ शकतो, आर्थिक प्रगतीच्या दिशेने नेऊ शकतो, याचा डोळसपणे विचार केला पाहिजे. उन्मादी अस्मितांपेक्षा हा विवेक अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. 

तुम्ही मतदार आहात. आज तुम्हीच नायक आहात. कुठल्याही आमिषाला बळी पडायचं कारण नाही. तुमचं मत जे असेल ते असेल; पण ते तुमचंच आहे का, एवढं मात्र तपासून पाहिलं पाहिजे. नाहीतर कुणीतरी व्हॉट्सॲपवर, सोशल मीडियावर काहीतरी मजकूर पाठवला, तुम्ही खातरजमा केली नाही आणि तुम्हाला तो खरा वाटला, असं होता कामा नये. ज्याप्रमाणे मत तुमचं आहे, त्याप्रमाणे मेंदूपण तुमचा असला पाहिजे. कोणीतरी तो मेंदू काबीज करून तुमच्याकडून मत घेतलं, असं घडता कामा नये. जे वाटतं, ते तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला जो पक्ष, उमेदवार योग्य वाटतो, त्यालाच मत दिलं पाहिजे. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मत दिलंच पाहिजे. मतदान करायचं की नाही, हा पर्याय असू शकत नाही. आपल्याकडे मतदानाची सक्ती त्या अर्थानं नाही. कायद्यानुसार, मतदान सक्तीचं करावं, अशीही एक कल्पना पुढे आलेली आहे. पण आपली लोकशाही एवढी प्रगत, प्रगल्भ आहे आणि सामान्य माणसाच्या शहाणपणावर तिचा एवढा विश्वास आहे की, कायद्यात अशी तरतूद करणं, हे लोकशाहीविरोधी आहे, असं बहुतेकांचं मत आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की, सक्ती करण्याची आवश्यकता नाही. मतदान केलंच पाहिजे. आणि, केलं नाही तर नागरिक म्हणून तुम्ही तुमची भूूमिका योग्य प्रकारे बजावत नाही, याचाच तो पुरावा आहे.  दिवाळीच्या पूर्वसंध्येला यंदा आपण मतदान करतो आहोत. भारताच्या गौरवशाली परंपरेचा, महाराष्ट्राच्या प्रकाशमान पर्वाचा उल्लेख केला तरी, अंधकार किती दाटून आला आहे, हेही आपल्याला माहिती आहे. अंधार असतोच, पण त्या अंधाराच्या विरोधात तुम्ही किती ठामपणे उभे राहता, यावर तुमचं यशापयश अवलंबून असतं. लोकशाहीत सर्वसामान्य माणसाचा सद्सद््विवेक, सजगता हाच प्रकाशाचा एकमेव किरण आहे. 

‘माना की अंधेरा घना है.. 
पर दिया जलाना कहां मना है?’ 
आपण सारे एकत्रितपणे उभे ठाकलो तर अंधाराची सेना नेस्तनाबूत करणं फार कठीण नसतं. मात्र, त्यासाठी सर्वसामान्य माणसांचा सामूहिक विवेक महत्त्वाचा. म्हणून आज मतदान केलंच पाहिजे. विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे. कारण, मतदान ही केवळ एक कृती नाही. तुमचं ते ‘राजकारण’ आहे. हे राजकारणच उद्याच्या महाराष्ट्राचा चेहरा ठरवणार आहे. 

आज तुम्ही काही चूक केली तर ती चूक महाराष्ट्राला आणखी पाच वर्षे भोगावी लागणार आहे. तुमच्या एका चुकीमुळे कदाचित महाराष्ट्र अनेक पावलं मागे जाऊ शकतो. आणि, तुमचा बरोबर निर्णय महाराष्ट्राला काही पावलं पुढं घेऊन जाणारा ठरू शकतो. त्यामुळे निर्णय तुमचा आहे, तुम्हीच तो घ्यायचा आहे. तुम्ही या प्रक्रियेचे नायक आहात. निर्णायक आहात. नायक म्हणून आज तुम्ही या प्रक्रियेत सहभागी झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.