आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आज लातुरात; सर्व क्षेत्रांतील प्रतिष्ठितांशी साधणार संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- सत्ताधारी भाजपच्या लातूर, हिंगोली, उस्मानाबाद आणि नांदेड या चार जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूरमध्ये होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पक्षाच्या संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच अशा पद्धतीची बैठक होणार असल्यामुळे लातूर भाजपमय झाले आहे. शहरात भाजपने एक लाख झेंडे लावले आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा हे दीव-दमण येथून विमानाने नांदेडला येणार आहेत. 

 

तेथे मुंबईहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचतील. तेथून हे दोघे हेलिकॉप्टरने लातूरला येतील. दुपारी बारा वाजता भाजपचे निमंत्रित पदाधिकारी औसा रस्त्यावरील थोरमोटे लान्स या बैठकस्थळी पोहोचतील. तेथे तासाभरात नोंदणी होऊन एक वाजता बैठक होईल. कामाचा आढावा घेणे, पुढील कामकाजाची दिशा ठरवणे असे या बैठकीचे स्वरूप असून तेथे इतर कुणालाही प्रवेश असणार नाही. पदाधिकाऱ्यांना मोबाइल सोबत नेणे, छायाचित्रण करणे, व्हाॅइस रेकॉर्ड करणे याला प्रतिबंध असणार आहे. सहा वाजता बैठक संपल्यानंतर अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस तासभर शासकीय विश्रामगृहावर विश्रांती घेतील. 

 

सर्व क्षेत्रांतील प्रतिष्ठितांशी साधणार संवाद 
सायंकाळी सात वाजता दयानंद सभागृहात जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांतील प्रतिष्ठितांशी अमित शहा आणि मुख्यमंत्री थेट संवाद साधणार आहेत, असे सांगण्यात आले. एक ते दीड तास हा कार्यक्रम चालणार आहे. या संवादानंतर ते शासकीय विश्रामगृहावरच मुक्कामी असतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी ते नांदेडला जातील आणि तेथून विमानाने रवाना होतील.