आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना खासदारांचा युतीचा आग्रह कायम,  'मातोश्री'वर आज बैठक, तोडग्यासाठी प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडे घालणार पुन्हा साकडे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीची वेळ जवळ येत असल्याने युतीचा निर्णय लवकर व्हावा, असा आग्रह शिवसेनेचे खासदार पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली असून यात युतीबाबत निर्णय पक्का होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

 

उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी काही खासदारांना मात्र भाजपशी युती व्हावी, असे वाटत आहे. शिवसेनेच्या एका खासदाराने "दिव्य मराठी'ला शी सांगितले, शिवसेना स्वबळावर २० ते २२ खासदार निवडून आणू शकणार नाही. विधानसभेची निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक यात फरक आहे. भाजपची सत्ता असल्याने निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद वापरून जिंकण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. त्यामुळे आमच्यापैकी अनेकांची भाजपशी युती करून निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. युती झाल्यास शिवसेनेचे मागील वेळेपेक्षा जास्त खासदार निवडून येतील. निवडणुका जवळ आल्याने लवकर निर्णय घेतला तर तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळेल. तरीसुद्धा, युतीबाबत उद्धव ठाकरे यांचा निर्णयच आम्हाला मान्य असेल, असेही या खासदाराने सांगितले. 

 

बैठकीत खासदारांच्या कामांचा आढावा घेणार : मागच्या आठवड्यातही उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली होती. त्यातही युतीबाबत चर्चा झाली. मंगळवारी पुन्हा खासदारांची बैठक बोलावली आहे. यात प्रत्येक खासदार केलेल्या कामांची माहिती उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. स्वबळावर लढल्यास काय स्थिती असेल, किती मते मिळू शकतात, शिवसेनेची ताकद ५ वर्षांत आणखी किती वाढली आहे, मतदारांसाठी आपण काय केले, याची माहितीही उद्धव ठाकरे घेणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. 

 

युतीसाठी भाजप आग्रही असून त्यांनी मागील वेळेपेक्षा एक जागा जास्त देण्याचा प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेने मागील वेळेस २२ जागा लढवल्या होत्या आणि त्यांना १८ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, भाजपकडून असा काही प्रस्ताव आला नसल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. 

 

शिवसेनेचे खासदार फोडणार नाही : भाजप नेता 
युती झाली नाही तर काही शिवसेना खासदार भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते. भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. युती न झाल्यास भाजपकडून लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, आम्ही युती करण्यावरच भर देत आहोत. शिवसेना आमचा मित्र पक्ष असल्याने आम्ही शिवसेना फोडू इच्छित नाही, असेही या नेत्याने स्पष्ट केले. 
 

बातम्या आणखी आहेत...