आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी आषाढी यात्रेची : पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी टोकन सुविधा, मंदिर देवस्थान समितीच्या बैठकीत निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ते पत्राशेडपर्यंत स्कायवॉक ६५० मीटरच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. तसेच दर्शन हॉलच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळेल. ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना श्री विठुरायांचे सोयीस्कर दर्शन मिळावे यासाठी राबवण्यात येणारी टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. 


आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर समितीची गुरुवारी बैठक घेण्यात आली, त्यात हा निर्णय घेण्यात अाला. या वेळी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार रामचंद्र कदम, अ‍ॅड. माधवी निगडे, शिवाजी महाराज मोरे, शंकुतला नडगिरे, नगराध्यक्षा साधना भोसले आदी उपस्थित होते.


भोसले म्हणाले, ‘आषाढी यात्रेत येणाऱ्या भाविकांना गतवर्षीपेक्षाही चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. यात्रेच्या चार दिवसांच्या कालावधीत भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, खिचडी, नाष्टा, चहाची सोय करण्यात येणार आहे. भाविकांना मोफत आरोग्याच्या सुविधा पुरवणाऱ्या संस्थांशी संपर्क करून भाविकांना यात्रेत मोफत औषधोपचार देण्याची सोय करण्यात येईल. यात्रा कालावधीत भाविकांची सेवा करण्यासाठी राज्यभरातील १६०० स्वयंसेवकांनी नाव नोंदणी केली आहे. तसेच यात्रा कालावधीत स्वच्छतेचे काम नगरपालिकेचे १३०० कर्मचारी करणार आहेत.’

 

भक्त निवासात एसी
शहरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी व आपत्कालीन व्यवस्थेसाठी एलईडी स्क्रीन बसवणे, आस्थापना व लेखा विभागाकडील विषयांवर चर्चा करणे, मंदिर कर्मचाऱ्यांना मंजूर आकृतिबंधानुसार सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी लागू करणे, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासामध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवणे, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथील तळमजला व पहिला मजला येथील शौचालय नूतनीकरणाचे काम सुलभ इंटरनॅशनल यांना देणे, हरित वारी अभियान राबवणे अादी समितीच्या बैठकीत चर्चा झाली.

 

काशीच्या धर्तीवर विकास 
तीर्थक्षेत्र काशीच्या धर्तीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसराच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येणार असून सुमारे दोन हजार कोटींच्या निधीची गरज आहे. या कामी शासनाबरोबरच उद्योगपती, समाजातील दानशूर मंडळींची मदत घेणार असल्याची माहिती समितीचे सदस्य व मुंबईचे आमदार राम कदम यांनी दिली.


सशुल्क दर्शन नाहीच
मंदिरात येणारे व्हीआयपी पाहुणे व सरकारी बाबूंना रोखण्यासाठी सशुल्क दर्शनासाठी वेगळी सुविधा निर्माण करून मंदिराचे उत्पन्न वाढवण्याचा समितीचा विचार होता. परंतु राज्यभरातून त्याला विरोध झाल्याने समितीने व्हीआयपी दर्शनास शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेतला आहे, अशी माहिती डाॅ. अतुल भाेसले यांनी दिली.

 

सेवेकऱ्यांनी नावे नोंदवावीत
पंढरपुरातील गजानन महाराज मठामध्ये अनेक जण मोठ्या श्रद्धेने सेवा करतात. त्याच पद्धतीने श्री विठ्ठल मंदिरात सेवा करायची असेल तर मंदिर समितीकडे नावनोंदणी करावी. त्या भाविकांना सेवांचा दिवस ठरवून दिला जाईल, असे आमदार रामचंद्र कदम यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...