आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारावर चालून जाणार आज रातरागिणी; राज्यभर प्रतिसाद, 22 पेक्षा जास्त शहरांत होणार महिलांचा 'नाइट वॉक'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : वर्षभरातील सगळ्यात मोठी रात्र असलेल्या रविवार, २२ डिसेंबर रोजी राज्यभरातील २२ पेक्षा जास्त शहरातील रातरागिणी अंधारावर चालून जाण्यासाठी 'नाइट वॉक'च्या माध्यमातून रस्त्यावर उतरत आहेत. 'दिव्य मराठी'च्या 'मौन सोडू, चला बोलू' या अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमाच्या आयोजनासाठी सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळाला. सर्व स्तरातील, क्षेत्रातील महिला विविध संघटना, गट, संस्थांनी पुढाकार घेत हा नाइट वॉक यशस्वी करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यभर महिला शक्ती रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवणार असून रात्रीच्या या भूकंपाने व्यवस्थेला हादरवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

कधी पोटच्या मुलीवर बलात्कार होतो, तर कधी नराधमांच्या तावडीतून आईही सुटत नाही. गर्भात ती असुरक्षित, रस्त्यावर एकाकी आणि घरातही अगतिक. एवढं होऊनही अशी श्वापदं मोकाट फिरत असतात आणि जेरबंद केलं जातं ते महिलेलाच. तुम्ही कपडे असे घालू नका, तुम्ही रात्री घराबाहेर पडू नका. सातच्या आत घरी पोहोचा. ही व्यवस्थाच लाथाडण्याची आणि असे सांगणाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची वेळ आली आहे. आता आक्रमकपणे या अंधारावर मात करावी लागणार आहे. 'ती' कोणासोबत बोलते, कोणासोबत चालते, एवढीच चर्चा करत जे तिला अग्निपरीक्षा घ्यायला सांगतात, त्यांना हे विचारलं पाहिजे की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? स्त्रीच्या इच्छेशिवाय तिला स्पर्श करण्याचा अधिकार यांना कसा मिळाला? आज महिला बोलू लागली आहे. त्यामुळे किमान नोंद तरी होते आहे या गुन्ह्यांची. अशी व्यवस्था झुगारण्यासाठी या महिला रस्त्यावर उतरताहेत. हा संदेश महाराष्ट्र पाठवेल देशभर .या रात्री रस्त्यावर उतरलेली प्रत्येक 'ती' पणती होत जाईल आणि हीच सामूहिक मशाल अंधाराला नामशेष करत नवी प्रकाश वाट दाखवेल. हा संकल्प घेउन दिव्य मराठी ने या उपक्रमासाठी रणरागिणींना साद घातली आणि राज्याच्या काना कोपऱ्यात या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महिलांनी अनेकविध उपक्रमांनी 'नाईट वॉक' यशस्वी करण्याचा विडा उचलला आहे. सर्व स्तरातील प्रचार प्रसाराने उपक्रम सर्वदूर पोचला आहे. या उपक्रमासाठी थीम साॅंगही तयार झाले असून तेही गाजत आहे.

सर्वत्र उस्फुर्त प्रतिसाद

२२ डिसेंबर म्हणजे वर्षातली सगळ्यात मोठी रात्र. महाराष्ट्रातील ओरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, नगर, पुणे, सातारा, सांगली, मुंबई, बीड, जालना, उस्मानाबाद, जालना, माजलगाव, चाळीसगाव, धुळे, भुसावळ, मालेगाव, सिन्नर, यवतमाळ, बुलडाणा, देऊळगाव राजा या शहरासह अनेक ठिकाणी महिलांनी नाईटवॉक साठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार २२ पेक्षा जास्त शहरांत एकाच दिवशी महिला घराबाहेर पडून, 'नाइट वॉक' करणार आहेत. हा नाइट वॉक म्हणजे जगण्याचा जल्लोष.


स्त्रीत्वासोबत माणूसपणाचे सेलिब्रेशन असेल. यात रंगारंग कार्यक्रम, धमाल मैफली, रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो महिलांचे एकवटण्याचे नियोजन झाले आहे.

महिलांचा कार्यक्रम

रात्री १० ते पहाटे १ पर्यंत हा नाइट वॉक चालावा अशी भुमिका घेतली. 'दिव्य मराठी'चा पुढाकार असला, तरी शहरातील सर्व महिलांचा हा 'नाइट वॉक' आहे. वॉकच्या शुभारंभापूर्वीच विविध सामाजिक, सांस्कृतीक, क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून स्त्री शक्तीने आपली ताकद दाखवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन प्रत्येक शहरात केले आहे. साधारण १० च्या सुमारास शहरात रात्री उशीरापर्यंत काम करून घरी परतणाऱ्या पाच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच प्रातिनिधीक रणरागिनी मशाल पेटवून या वॉक ला प्रारंभ करतील. ठरवलेल्या मार्गावर विविध संस्था, संघटनांच्या महिला पदाधिकारी वॉक करतील. त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद आणि समर्थन देण्यासाठी आलेले पुरूष त्यांच्या मागून चालतील असे नियोजन सगळ्या ठिकाणी झाले आहे.

सोशल मीडियासह सर्वत्र मोठा प्रचार

दिव्य मराठीच्या आवाहाना नंतर राज्यभरातील महिला, विविध संघटना तसेच अनेक पुरषांनीही या उपक्रमाच्या प्रतिसादात आपल्या सोशल मीडियाचे डीपी, स्टेट्स ठेवत तसेच या संदर्भातील उपक्रमाला सोशल मिडीया वर मोठ्या प्रमाणावर प्रसारीत केले आहे. त्यामुळे हा उपक्रम राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोचला आहे. विविध संस्था संघटना आणि व्यक्तींनी रातरागिणींच्या या उपक्रमाला संदेश देणारे मोठमोठे प्लेक्स स्वत:हून गावागावात उभारले आहेत.

उपक्रमात सहभागी होण्यासाठी नेते, अभिनेत्यांचे आवाहन

दिव्य मराठीच्या पुढाकाराने सर्वत्र आयोजित होत असलेल्या या उपक्रमाला विविध राजकीय नेते, अभिनेते यांनीही शुभेच्छा दिल्या असून त्यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले ते काही दिवसांपासून सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच निलम गोरे, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, मनिषा कायंदे, नमिता मुंदडा, श्वेता महाले, देवयानी फरांदे या राजकीय क्षेत्रातील दिग्गजांसह अभिनय क्षेत्रातील रमेश परदेशी, राधा सागर, पुजा पवार- साळुंके, मयूरी देशमुख, आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर तन्वीर हक कवयत्री संजीवनी तडेगावकर यांच्यासह प्रत्येक शहरातील नगराध्यक्ष, प्राचार्य, विविध संस्थांचे प्रमुख, अधिकारी यांनी त्या त्या भागात आपले व्हीडीओ तयार करून महिलांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

अबालवृद्ध महिलांचा सहभाग


दिव्य मराठीच्या आवाहनाला अबाल वृध्द महिलांनी मोठा प्रतिसाद देत हा आपला उपक्रम आहे आणि तो यशस्वी करायचाच याचे नियोजन प्रत्येक ठिकाणी केले आहे. अनेक गावांत अनेक तरुणींनी पथनाट्य, फ्लॅश मॉब, गाणे, ढोल पथकां सह विविध गुण दर्शनाची तयारी केली आहे. काही ठिकाणी अनेक लहान मुली वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिथयश महिलांच्या पेहरावात उपस्थित राहून आपली भुमीका ही मांडणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...