आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकरनगर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने वातावरण तापले, 'आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे' - अशोक चव्हाण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड : बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील साईबाबा प्राथमिक शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी संस्थाचालकावर कारवाई करावी या मागणीसाठी युवा पँथर संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या संस्थेचे अध्यक्ष भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर असून त्यांनी व इतरांनी हे प्रकरण दडपून टाकण्याचा आरोप युवा पँथरचे प्रमुख राहूल प्रधान यांनी केला. पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली नाही. शहरातील नांदेड क्रिटिकल केअर हाॅस्पिटलने पोलिसांना न कळविता अत्याचार पीडित मुलीवर उपचार केले. त्यामुळे मुलीवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना या प्रकरणी सहआरोपी करावे, अशी मागणी युवा पँथरने केली.

संस्थेची बाजू 

दरम्यान संस्थेच्या वतीने या प्रकरणी एक पत्रक प्रसिद्ध करून खंत व्यक्त करण्यात अाली अाहे. गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री साईबाबा प्राथमिक विद्यालयात शिकणाऱ्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. संस्थेच्या प्राथमिक शाळेत घडलेल्या एका अनुचित प्रकाराच्या निमित्ताने संस्थेबद्दल चाललेला अपप्रचार दुर्दैवी आहे. संस्थेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेत अत्याचार झाल्याबाबतची तक्रार रामतीर्थ पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संस्थेतील चार जणांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती संस्थेसमोर आल्यानंतर संस्थेने घडलेल्या प्रकाराबद्दल गंभीर नोंद घेतली. साईबाबा प्राथमिक विद्यालय, शंकरनगर येथील कर्मचारी पी.डी.पाटील, सय्यद रसूल एम व डी.आर.राजुळे तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एस.शेळके यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येऊन शिक्षण विभागाला त्याबाबतचा अहवाल पाठवण्यात आला आहे. संस्थेने आजपर्यंत कुठल्याही अनुचित प्रकारांना थारा दिला नाही किंवा पाठबळ दिले नाही. या प्रकरणातही संस्थेची तीच भूमिका आहे. पीडित विद्यार्थिनी व तिच्या नातेवाइकांना न्याय मिळाला पाहिजे, अशीच संस्थेची भूमिका असल्याचे म्हटले आहे.

अशोक चव्हाणांची उडी

या प्रकरणात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही उडी घेतली. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना संस्था कोणाचीही असो, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. चव्हाणांनी पीडित मुलीची भेट घेऊन दिलासा दिला. हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांनी तातडीने फरार शिक्षकांना शोधून काढावे, असे चव्हाण म्हणाले. चव्हाणांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणि राजकारण दोन्ही वाढले.

एक आरोपी अटकेत

अत्याचार प्रकरणातील आरोपी सय्यद रसूल याला बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही आरोपी शिक्षक फरार झाले. त्यातील सय्यद रसूल हा शिक्षक पोलिसांच्या हाती लागला. सय्यद रसूल याच्या मागावर पोलिस असताना तो बुधवारी शहरात आला. त्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी रामतीर्थ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.