आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात आलेला अन् गेलेलाही...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तोष्णा मोकडे

मनानं आपलं मानावी अशी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात. अशी माणसं आयुष्यात यायला नशीब लागतं. मात्र अशी अचानक आयुष्यात आलेली माणसं आयुष्यातून अचानक निघूनही जातात. चुटपूट लावून गेलेल्या एकाच एका भावाच्या यामागे उरलेल्या आठ‌वणी... 
 

आमच्या वेळी शालेय जीवनातलं वातावरण आजच्याइतकं जागृत (मला सगळं कळलंच पाहिजे असं) नव्हतं. निरागसतेनं  भरभरून जगलेली मुलं-मुली एकमेकांशी मारापिटीपर्यंत भांडण करायची. त्या  स्पर्शाला लैंगिकतेचा दर्प नव्हता. नात्यांमध्ये संशय नव्हता.  

मी सातवीत असताना रमेश राठोड नावाचा मुलगा माझ्या वर्गात होता.  तो रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या घरी आला, “तोष्णाताई, मला बहीण नाही, मला राखी बांधशील का गं?” आईनेही पोरगा स्वतःहून घरी आल्यामुळे मला राखी बांधायला लावली. त्याला माझ्याविषयी खूप आस्था होती. माझ्यापेक्षा तो दोन वर्षांनी तो मोठा असावा. पुढे तोच शाळेत माझा रक्षणकर्ता झाला. रमेश शरीराने दणकट, इतर मुलांपेक्षा मोठा दिसत असल्याने माझ्या आणि माझ्या मैत्रिणीच्या वाट्याला कुणी जात नसे. त्याच्या मोकळेपणाने त्याचा माझ्या घरी नियमित वावर असल्याने माझे नातेवाईकही त्याला ‘तोष्णाचा भाऊ’ म्हणून ओळखत. मी त्याच्या घरी जायचे तेव्हा त्याच्या आईकडून कळलं त्याला बहीण होती, माझ्यासारखी दिसणारी, पण पाच-सहा वर्षांची असतानाच ती वारली. त्यानंतर त्याने कुणाला बहीण म्हटलं नाही माझ्याशिवाय ! तो अभ्यासात फार हुशार नव्हता, पण त्याचे  व्यवहारज्ञान चांगले होते. मला तो दिवस आजही आठवतो, आमचा त्या दिवशी दहावीचा शेवटचा पेपर होता. भाऊ रविवारी घरी येऊन मला भेटून गेला. मी पेपर सोडवून घरी आल्यावर रमेशला सेंटरवर चक्कर येऊन तब्येत खराब झाल्याचं कळलं. आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या अकस्मात मृत्यूची वार्ताही. माझा विश्वासच बसेना. हादरून गेले मी. बेचैन वाटत होतं. अंत्यात्रेला वगैरे जायचं ते वय नव्हतं. समजही नव्हती. आयुष्यात अचानक भाऊ म्हणून आलेला तेजस्वी तारा अचानकच आयुष्यातून निखळून गेला. त्याच्या विचारानं मन आजही कासावीस होतं. त्याच्या मृत्यूमागचं गूढ मला कधी कळलंच नाही. एका गोष्टीची कबुली द्यावी वाटते. रमेशच्या स्नेहपावलाने मानलेले अनेक भाऊ माझं आयुष्य समृद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या चेहऱ्यांनी मला भेटत गेले. तो असताना जे-जे तो करू शकत होता ते करण्यासाठी त्यांनी माझ्यासाठी वेगळी भावंडं पाठवली असतील, पण ‘रमेश’ नावाचा माझ्या कोवळ्या वयात मला जपणारा माझा ‘भाऊ’ देहरूपाने माझ्यासोबत नसला तरी त्याची अनुभूती मी आजही घेते. 

लेखिकेचा संपर्क :  ९३७००४४४७

बातम्या आणखी आहेत...