आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद कारमध्ये मृतावस्थेत आढळली दोन भावंडे, सुदैवाने 4 वर्षीय बहिण बचावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - बुलडाणा शहरातील गवळीपुरा भागात सोमवारी ३ बालकांच्या अपहरणाच्या चर्चेने खळबळ उडाली होती. सर्वत्र शोधाशोध करूनही त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. मात्र, ही तिन्ही बालके त्याच भागातील एका बंद कारमध्ये १२ तासांनंतर आढळून आली. परंतु, त्यापैकी दोन बालके मृतावस्थेत तर एक बालिका बेशुद्धावस्थेत होती. बालिकेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बालकांचा मृत्यू गुदमरून झाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी बुलडाणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. 


गवळीपुरा भागात शेख हनीफ शेख हिरा यांचे वास्तव्य आहे. त्यांंना सहर शेख हमीद (४) ही नात तसेच शेख साहिल शेख जमील (५) आणि शेख अजीम शेख समीर (३) ही नातवंडे आहेत. तिघेही सोमवारी नेहमीप्रमाणेच जवळच्याच अंगणवाडी केंद्रात गेले होते. नेहमीप्रमाणे ते दुपारी १२ वाजेपर्यंत घरी परतणे अपेक्षित होते. मात्र, दुपारी १ वाजून गेला तरी त्यांचा येण्याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांनी अंगणवाडी केंद्रात जाऊन पाहणी केली. परंतु, तिथे तिघांपैकी कुणीच नव्हते. त्यानंतर कुटुंबीयांनी इतरत्र त्यांचा शोध सुरू केला. मात्र, कुठेच थांगपत्ता न लागल्याने अखेर त्यांनी शहर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.


पोलिसाने सहज कारच्या काचेतून पाहिले, आत मुलीची हालचाल दिसली
बालकांना शोधण्यासाठी पोलिसांनी गवळीपुरा परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले. परंतु, त्यात बालकांचा कुठेच थांगपत्ता नव्हता. पोलिसांनी लगतचा परिसरही पिंजून काढला. प्रत्येक घराची झडतीही घेतली. दरम्यान, मध्यरात्री १ वाजता टिपू सुलतान चौकात एका घरासमोर उभ्या असलेल्या कारच्या काचेतून आत बघितले असता त्यात हालचाल  दिसली. पोलिसांनी काचेला ठोठावताच सहर उठून बसली. पोलिसांनी तातडीने कारचे दरवाजे उघडले. त्यात दोन मुले बेशुद्धावस्थेत आढळून आली. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी साहिल आणि अजीम यांना मृत घोषित केले.


अनुत्तरित प्रश्न, बालके कारमध्ये कशी? : दिवसभर सर्वत्र शोधाशोध करूनही कुठेच थांगपत्ता नसलेली बालके परिसरातीलच कारमध्ये सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातही २ मुलांचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुलांचा गुदमरून मृत्यू झाला की त्यांची हत्या झाली, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. बचावलेली बालिका सहर ही अवघ्या ४ वर्षे वयाचीच असल्याने तिच्याकडून घटनाक्रम जाणून घेणे मोठे आव्हान असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...