आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडनावविरहित होण्याच्या दिशेनं...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आडनाव हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहे. आडनावे, कुळे ही आदिपुरुषाच्या नावाने सुरू झाली आहेत. ती एक सामाजिक सोय आहे. स्त्रिया माहेरचे आडनाव अभिमानाने लावत असल्या तरी त्या बापाचे म्हणजे पुरुषकुळाचेच आडनाव लावतात. व्यापक अर्थाने कुठलेही आडनाव पुरुषप्रधानताच जतन करते. शिवाय आडनावांना जात-धर्मही लगडलेला असतो. त्यामुळे आडनावविरहित समाज निर्माण झाला तर समतेचा प्रतीकात्मक का होईना स्वीकार केला, असे म्हणता येईल.

 

पूर्वी बाळांची पाळण्यातच लग्ने होत. बालविवाह, पौगंडावस्थेतले विवाह होत. आजही काही ठिकाणी ते घडवले जातात. लग्नासाठी मुलीचे वय १८ असावे, हा कायदा  एकाच वेळी ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्हीमध्ये कधी डावलला जातो, कधी पाळला जातो.

 
काळ बदललाय, बदलतोय. लग्नाचे वय बरेच पुढे ढकलले आहे. शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य यांमुळे स्त्रियांना आत्मभान आलेले आहे. विवाहित स्त्रियांमध्ये माहेरचेचे आडनाव न बदलता तसेच ठेवण्याची किंवा माहेर-सासरच्या आडनावांची जोडी वापरायची पद्धत हल्ली सर्वत्र दिसते. आपले लग्नापूर्वीचे अस्तित्त्व, आडेंटिटी, माहेरच्या घराचा अभिमान असे बरेच मुद्दे त्यात असतात. समजा एखाद्या स्त्रीचे ३५ व्या वर्षी लग्न झाले तर तिला समाजात, नोकरीच्या/व्यवसायाच्या ठिकाणी  एक अस्तित्त्व प्राप्त झालेले असते. ती तिच्या नावाने सर्वश्रुत असते. लग्नानंतर तिचे नाव, आडनाव बदलणे व्यावहारिक दृष्ट्याही नुकसानकारक असते आणि तिच्या स्त्री म्हणून अस्मितेच्या दृष्टीनेही. आपले आईवडिलांनी ठेवलेले नाव बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशी ठाम भूमिका घेतली जाते. त्यापुढे नवरेशाही झुकलेलीही दिसते. याशिवाय स्त्रीचे मूळ (माहेरचे) आडनाव न बदलणे किंवा सासर-माहेर-आडनाव-जोडी करणे असे नवे पर्याय दिसतात. पुरुषप्रधान संस्कृतीने कधी नाईलाजाने, कधी उदारतेने ते स्वीकारले आहे. खूपदा त्याची कुचेष्टाही केलेली आहे. सासर-माहेरचं आडनाव एकच असेल तर ‘सुंठेवाचून खोकला गेला’, अशी उभयतांची भावना होत असावी. माझ्या काही मैत्रिणींना त्यांनी अभिमानाने घेतलेली जोड-आडनावे डोकेदुखी ठरतात. लग्नाचे सर्टिफिकेट, बॅंक, शेअर्स, चेक्स, अपत्याचा जन्मदाखला वगैरे ठिकाणी ही जोड-आडनावे आडवी आलेली आहेत. प्रत्येक वेळी ‘ती मीच आहे’ हे पुराव्यानिशी सादर करताना त्या मेटाकुटीला येतात. काही मैत्रिणींनी आपले जोड-आडनाव कायदेशीर/नियमित करून घेतले आहे. याचा अर्थ कायदा लग्नानंतर बाईचे आडनाव बदलते, हे गृहीतच धरतो. जोड-आडनावे लावणे हे स्त्रीच्या विवाहपूर्व अस्मितेचे, अस्तित्त्वाचे प्रतिक आहे, हे मान्यच. पण मुळात आडनाव हेच पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहे. आडनावे, कुळे ही आदिपुरुषाच्या नावाने सुरू झाली आहेत. ती एक सामाजिक सोय आहे. स्त्रिया माहेरचे आडनाव अभिमानाने लावत असल्या तरी त्या बापाचे म्हणजे पुरुषकुळाचेच आडनाव लावतात. व्यापक अर्थाने कुठलेही आडनाव पुरुषप्रधानताच जतन करते. शिवाय आडनावांना जात-धर्मही लगडलेला असतो, हा स्वतंत्र विषय. त्यामुळे आडनावविरहित समाज निर्माण झाला तर समतेचा प्रतीकात्मक का होईना स्वीकार केला, असे म्हणता येईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...