आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता संपादनाच्या दिशेने....

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक मंदिर प्रवेश सत्याग्रहाची पार्श्वभूमी असलेल्या नाशिकच्या भूमीत भारिप बहुजन महासंघाच्या पुढाकाराने सत्ता संपादनासाठी वंचितांच्या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. काेरेगाव भीमा येथील एल्गार परिषद अन्् पाठोपाठ उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा दलित-शोषित अन्् वंचितांचा तारणहार म्हणून राष्ट्रीय सामाजिक व राजकीय पटलावर सामोरा आलेला चेहरा लक्षात घेता एकूणच आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होऊ लागली आहे. आंबेडकरांनी एमआयएमचे नेते ओवेसी यांच्याशी युती करून वाटचाल करण्याची घेतलेली भूमिकाही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली.

 

आंबेडकर अन्् ओवेसी यांची युती म्हणजे ‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोज उठाना’ अशी झाली आहे. प्रकाश आंबेडकर गेल्या काही दशकांपासून एकतर्फी अन्् एकांगी लढत होते. विदर्भातील दोन-तीन जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्राचा अपवाद वगळला तर त्यांना सत्तेच्या दिशेने जाणारा मार्ग गवसत नव्हता. खरे तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असे थेट रक्ताचे नाते अन्् नाव अशा दोन्हीही त्यांच्या प्रचंड जमेच्या बाजू राहिल्या आहेत. त्याउपरही दलित-शोषितांच्या पटलावर आजपावेतो ते प्रकाशमान होऊ शकले नव्हते. परंतु त्यांचा तो अडसर आता दूर होताना दिसतो आहे. याउलट एकेकाळचे लढवय्ये पँथर रामदास आठवले दारी आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करून घेत केंद्रात असो की राज्यामध्ये... मंत्रिपदावर आरूढ होत राहिले. भले घाटकोपरात लोकांनी भाईंचे कपडे फाडले, त्यांना धक्काबुक्की केली, विरोधकांनी अवमान होईल अशी भाषा वापरली. पण भाई कोणालाच बधले नाहीत. मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात आजतागायत आठवलेंचे स्थान अढळ राहिले. दलितांच्या संघटना अन्् त्यांचे नेते प्रत्येकाची तोंडे वेगवेगळ्या दिशांना राहिल्यामुळे अन्् हाच कित्ता मागील पानावरून पुढे चालू राहिल्याने ऐक्याची बातच शिल्लक राहिली नाही. प्रकाश आंबेडकरांनी ओवेसींच्या हातात हात घालून यापुढचे राजकारण करण्याचा निर्धार केल्यामुळे तर सर्वच विषय संपुष्टात आला आहे. ‘नवा भिडू नवा डाव’ या न्यायाने सध्या भारिप बहुजन महासंघाच्या पुढाकाराने राज्यभर शक्तिप्रदर्शन मेळावे आयोजित केले जात आहेत. नाशिक मुक्कामी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील समर्थकांचे एक महाअधिवेशन पार पडले. वंचितांची सत्ता संपादनाच्या दिशेने पावले पडावीत हा त्या आयोजनामागचा हेतू होता.

 

भव्य दिव्य व्यासपीठ, समाजसुधारकांच्या मोठ्या आकाराच्या तसबिरी, कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी वाहन व्यवस्था, व्यासपीठावरील एलएडी वॉल असे सगळे काही मैदानावर सज्ज होते. महाअधिवेशनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या संख्येचा आकडा पोलिसांच्या अन्् प्रत्यक्ष आयोजकांच्या नजरेतून भिन्न असला तरी मैदानावरील एकूण माहोल, कार्यकर्त्यांमधील उत्साह, वक्त्यांच्या शब्दफेकीला टाळ्यांच्या कडकडाटात मिळणारा प्रतिसाद हे सर्व काही बोलके होते. एकुणात काय तर हे महाअधिवेशन आगामी निवडणुकीची रंगीत तालीम ठरावी. गोल्फ क्लबवरील आजवरच्या सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीर सभांनी इतिहास घडवला आहे. महाराष्ट्रात १९९५ च्या सुमारास सत्तांत्तर होऊन युतीचे राज्य आरूढ झाले होते. त्या सत्तांतराची मुहूर्तमेढ याच मैदानातून झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आई जगदंबेला साकडे घालत ‘दार उघड बये दार उघड’ अशी विनवणी केली. त्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या कर्मधर्मसंयोगाने झालेही तसेच. महाराष्ट्राच्या सत्तेचे दार उघडले गेले.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचेही महाअधिवेशन याच मैदानावर झाले अन्् हा पक्षही सत्तेत आला. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे युतीची वाटचाल पुन्हा सत्तारूढ होण्याच्या दिशेने सुरू झाली तीही याच मैदानावरून. भारतीय जनता पार्टीने राज्यात अन्् नाशिक महापालिकेतही एकहाती सत्ता घेत बाजी मारली, त्याचीही नांदी याच मैदानावर झाली. अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनीही एमआयएमला सोबत घेऊन राज्यातील वंचितांना सत्तेची कवाडे उघडण्याचा संकल्प केला, त्याची सुरुवात महाअधिवेशनाच्या माध्यमातून गाेल्फ क्लबवरच झाली. लोकसभेसाठी होऊ घातलेल्या २०१९ च्या निवडणूक रणसंग्रामात भारिप बहुजन महासंघाची भूमिका किमान महाराष्ट्राच्या पातळीवर कळीची ठरू शकते. हेच नेमके या महाअधिवेशनाच्या अनुषंगाने तसेच त्याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अधोरेखित केले आहे. शोषितांनी-पीडितांनी सत्ताधारी व्हायला हवे, असे डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित होते. त्या दिशेने एक एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर करीत आहेत. 
- जयप्रकाश पवार निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...