Home »Mukt Vyaspith» Toy Drug Away

खेळणी हिसकावली जाते तेव्हा...

अभिषेक कदम, उस्मानाबाद | Feb 23, 2013, 02:00 AM IST

  • खेळणी हिसकावली जाते तेव्हा...

खेड्यापाड्यात उत्सवाच्या निमित्ताने जत्रा भरते. तेथे विविध खेळणीची, मिठाईची दुकाने तसेच रहाटपाळणे, फिरते सिनेमागृहे आक र्षण ठरत. डोळ्याला रंगीत चष्मे लावून, पिपाण्या वाजवत जत्रेत फिरत असू. मला आठवते, सकाळी 10 च्या सुमारास बैलांना सजवून बैलगाडीतून आई-वडील, बहीण-भावांसोबत जत्रेला जात होतो. विठोबाच्या माळावर जत्रा भरायची. पण अंगात नवे कपडे, खाऊची चंगळ आणि जत्रेत सायंकाळपर्यंत मनसोक्त भटकणे, असा दिनक्रम असायचा.

शेव-चिवड्याची कोरडी भेळ हा तेथील खास मेनू, शिवाय गारेगार बर्फाचा गोळा... लिंबू शरबत यांची लज्जत औरच असायची. अशा जत्रेत एकदा आई-वडील झाडाखाली बसलेले असताना थोडे फिरून येतो, असे सांगून भटकत होतो. इयत्ता चौथीत असेन. जत्रेत फिरत असताना एका फेरीवाल्याकडून बासरी विकत घेतली आणि तारेवर खाली-वर नाचणारे माकड अशा दोन वस्तू घेतल्या. त्या घेऊन फिरत असताना, माझ्या मागून एक थोराड मुलगा आला. दिसायला कसातरीच होता. ‘तुला बाबांनी बोलावले...’ असे म्हणत मला गर्दीत लोटले आणि सावरायच्या आत हातातून खेळणी हिसकावून पळून गेला. माझी नवीकोरी बासरी आणि माकडाची खेळणी हरवल्याचे खूप दु:ख झाले. मोठ्याने रडत त्याला शोधत फिरत होतो. गर्दीत तो सापडणार नव्हताच. आजूबाजूला माणसेच माणसे दिसत होती. दु:खवेगात मला ज्या झाडाखाली आई-बाबा- बहीण बसले होते, ती जागाही आठवेना. तसेच त्याचा चेहराही लक्षात राहिला नाही. रडत फिरत असलेला पाहून गावातील ओळखीच्या सद्गृहस्थांनी मला आई-वडिलांकडे आणून सोडले. त्यांना माझी खेळणी हिसकावून नेल्याचे सांगितले. बाबांनी पुन्हा तशीच दुसरी खेळणी घेऊन दिली अन् माझे रडणे थांबले!

Next Article

Recommended