आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समकालीन पॉप कल्चरचा मागोवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समकालीन पॉप कल्चरमध्ये ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील (एमसीयू) ‘अॅव्हेंजर्स’ चित्रपट मालिका आणि ‘एचबीओ’ची ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दोन्ही सिनेमॅटिक विश्वांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अवाढव्य पसारा मांडलेला आहे. हा पसारा पलायनवादी भूमिकेपुरता मर्यादित न राहता चाहत्यांना खुश करणाऱ्या घटकांपलीकडे जात, वेळोवेळी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा भूमिका घेणारा आहे. त्यामुळे या विश्वाला राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, स्त्रीवाद आणि लिंगभेद, वर्णद्वेष अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारे कंगोरे प्राप्त झालेले आहेत. मार्व्हल आणि एचबीओने हे यश कसं साध्य केलं याचा आढावा घेणारा हा लेख...


स मकालीन पॉप कल्चरमध्ये ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’मधील (एमसीयू) ‘अॅव्हेंजर्स’ चित्रपट मालिका आणि ‘एचबीओ’ची ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका या दोन्ही गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शिवाय, त्यांच्याशी निगडित असलेले अनुक्रमे ‘अॅव्हेंजर्स असेम्बल’ आणि ‘विंटर इज कमिंग’ हे वाक्प्रचारदेखील जगभरात प्रसिद्धीस पावले आहेत. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘अॅव्हेंजर्स : एंड गेम’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेचा शेवटचा सीझन यामुळे ही दोन्ही विश्वं एका पर्वाच्या शेवटाकडे वाटचाल करत आहेत. अनुक्रमे मार्व्हल कॉमिक बुक्स आणि जॉर्ज आर. आर. मार्टिन लिखित ‘अ सॉँग ऑफ आइस अँड फायर’ ही पुस्तक मालिका यावर आधारित असलेल्या या दोन्ही सिनेमॅटिक विश्वांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अवाढव्य पसारा मांडलेला आहे. हा पसारा पलायनवादी भूमिकेपुरता मर्यादित न राहता चाहत्यांना खुश करणाऱ्या घटकांपलीकडे जात, वेळोवेळी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा भूमिका घेणारा आहे. त्यामुळे या विश्वाला राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, स्त्रीवाद आणि लिंगभेद, वर्णद्वेष अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करणारे कंगोरे प्राप्त झालेले आहेत. मार्व्हलशी थेट स्पर्धा करणाऱ्या ‘डीसी’ या चित्रपटनिर्मिती संस्थेने निर्मिलेले चित्रपट आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’सोबतच सुरु झालेली ‘एएमसी’ची ‘द वॉकिंग डेड’ ही मालिका या दोन्ही गोष्टी आशय, दर्जा आणि लोकप्रियतेच्या दृष्टीने (अपवाद वगळता) उत्तरोत्तर ढासळत असताना मार्व्हल आणि एचबीओने हे यश कसं साध्य केलं याचा आढावा घेणं गरजेचं बनतं. 

 

या दोन्हींनी मिळवलेल्या यशामागे त्यांचं लेखन-दिग्दर्शन आणि अवाढव्य निर्मितीमूल्यं, बिझनेस मॉडेल या गोष्टींसोबतच इंटरनेटचा उदय आणि त्यातून जगभरात निर्माण झालेला चाहतावर्ग यासारखे बाह्य घटकही कारणीभूत आहेत. २००५-०६ मध्ये जेव्हा केविन फायजी आणि इतर लोकांनी मार्व्हलच्या कॉमिक बुक्समधील पात्रांवर आधारित चित्रपट विश्वाचा विचार केला, तेव्हा ही मंडळी चित्रपट या माध्यमाच्या तेव्हा ज्ञात असलेल्या मर्यादा आणि व्याप्तीच्या पलीकडे जाऊ पाहणारं काहीतरी साध्य करू पाहत होते हे निश्चित आहे. कारण त्याआधी पॉप कल्चरमध्ये असाधारण महत्त्व बाळगून असलेली ‘स्टार वॉर्स’ चित्रपट मालिका संभाव्य नऊ चित्रपटांपुरती मर्यादित होती आणि तिची दुसरी चित्रत्रयी तेव्हा कुठे संपत आली होती. अशा वेळी वर्षाकाठी दोनेक चित्रपट या हिशेबाने ‘इन्फिनिटी सागा’मधील एकूण बावीस चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस हा अतिमहत्त्वाकांक्षी होता. स्वतः मार्व्हलचा मोठा चाहता असलेला फायजी सर्व योजना आखत होता. हे सगळं इतक परफेक्ट घडत होतं की २०१५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘अँट मॅन’ या चित्रपटाच्या निर्मितीची चर्चा २००६ मध्ये घडून येत होती. परिणामी तीनेक वर्षांच्या पूर्वतयारीनंतर २००८ मध्ये रॉबर्ट डाऊनी ज्यु. अभिनीत ‘आयर्न मॅन’ प्रदर्शित झाला तेव्हा एमसीयूच्या दणकेबाज सुरुवातीसोबतच रॉबर्टच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. 

 

दरम्यान, याच काळानंतर इंटरनेटच्या वापरात उत्तरोत्तर वाढ होत जाणं अनपेक्षितपणे मार्व्हलसाठी फायदेशीर ठरलं. कारण पुढे जाऊन अधिक विस्तारत गेलेल्या मार्व्हलच्या विश्वाला ‘स्टार वॉर’सारख्या चित्रपट-मालिकांना मिळालेल्या प्रतिसादापेक्षा कैकपटीने अधिक प्रतिसाद मिळून त्यातून जगभरात त्याचा चाहतावर्ग निर्माण होण्यास मदत झाली. लवकरच मार्व्हलची ‘आयर्न मॅन’, ‘कॅप्टन मार्व्हल’, ‘ब्लॅक विडो’ ही पात्रं डीसीच्या ‘सुपरमॅन’, ‘बॅटमॅन’, ‘वंडर वुमन’सारख्या प्रेक्षकांना अधिक परिचयाच्या असलेल्या सुपरहिरोंपेक्षा अधिक लोकप्रिय ठरली. अर्थात हे काही केवळ बिझनेस मॉडेलचे यश नाही. मार्व्हलचा आपल्या चित्रपटांप्रती असलेला अप्रोच, चाहत्यांचा आणि समीक्षकांचा कल लक्षात घेत चित्रपटांच्या मांडणीमध्ये केलेले बदलदेखील इथे महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे या सर्व बाबींच्या एकत्रित परिणामामुळे जेव्हा ‘अॅव्हेंजर्स : एंड गेम’च्या रूपात हा ‘इन्फिनिटी सागा’ पूर्णत्वास येतो तोवर या चित्रपटांवर जिवापाड प्रेम करणारा आणि चित्रपटाचा शेवट उघड करणाऱ्या व्यक्तीस मारहाण करण्याइतका समर्पित असा चाहतावर्ग निर्माण झालेला असतो. 

 

‘गेम ऑफ थ्रोन्स’ (जीओटी) हे या भन्नाट अशा समकालीन पॉप आणि फॅन कल्चरमधील आणखी एक अग्रगण्य नाव. २०१३ नंतर ‘नेटफ्लिक्स’ ही ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस आणि तिच्या स्पर्धकांचा स्फोट होण्याच्या आधीपासूनच ‘एएमसी’, ‘एचबीओ’ कथाकथनाच्या माध्यमात ‘द सोप्रानोज’, ‘ब्रेकिंग बॅड’सारखे प्रयोग करत होते. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ हे कदाचित या प्रयोगातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी असं पाऊल होतं. इतकं की त्याच्या सर्वेसर्वा जोडी असलेल्या डेव्हिड बेनिऑफ आणि डी. बी. वाईस यांनी एचबीओला ‘ही मालिका कधीच काही पुरस्कार जिंकणारी मालिका होऊ शकणार नाही’ असं बजावलं होतं. मात्र कथनाचे रूढ नियम मोडणारा हा प्रकार मूळ कथानक ते त्याची मांडणी आणि अंमलबजावणी अशा सर्वच स्तरांवर इतका प्रभावी आणि लोकप्रिय ठरला की आज तो समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि सर्वाधिक पायरेटेड मालिकांमध्ये अग्रगण्य आहे. शिवाय, त्याने आपल्या निर्मात्यांच्या अपेक्षा सकारात्मकरित्या उलटवत कित्येक गोल्डन ग्लोब, एमी पुरस्कार मिळवलेले आहेत. 

 

जेव्हा दोन वेगळ्या माध्यमांमध्ये अनन्यसाधारण कामगिरी करणाऱ्या या दोन स्वतंत्र बाबींचा एकत्रित विचार करायची वेळ येते, तेव्हा त्यांनी एवढी मोठी विश्वनिर्मिती करत असताना मुळातच आपल्या आशय-विषय आणि कथानकाच्या व्याप्तीसोबतच त्याच्या मांडणीच्या पातळीवर अपारंपरिकदृष्ट्या केलेला विचार लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे एकीकडे मार्व्हलने इतक्या सर्व पात्रांचा आणि त्यांच्यावरील स्वतंत्र ते ‘अॅव्हेंजर्स’सारख्या एकत्रित चित्रपटांचा समावेश असलेल्या एकाच संयुक्त चित्रपटविश्वाची कल्पना केली, तर दुसरीकडे ‘एचबीओ’ने मालिकेचा प्रत्येक भाग जणू स्वतंत्र चित्रपट आहे अशा दृष्टीने विचार केला. तेव्हा या दोन्हींनी चित्रपट आणि मालिकांनी कथानक ते मांडणी सर्वच स्तरांवर वेगवेगळ्या माध्यमांच्या मूलभूत नियमांनाच छेद दिला. ‘एमसीयू’मधील बावीस चित्रपट हे एकसंध मालिकेहून, तर सध्या प्रदर्शित होत असलेल्या ‘जीओटी’च्या शेवटच्या सीझनमधील एक ते सव्वा तास लांबीचे एपिसोड हे कथा ते निर्मितीमूल्यं अशा कुठल्याच पातळीवर एखाद्या ‘समर ब्लॉकबस्टर’पेक्षा कमी ठरत नाहीत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ने पहिल्या सीझनमध्ये कथानक शब्दशः अर्धवट सोडलेलं असणं आणि ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’मध्येही कमी-अधिक फरकाने हेच घडलेलं असणं खचितच योगायोग नसावा. 

 

मार्व्हलच्या बहुतांशी सुपरहीरोंच्या निर्मितीमागे असलेले तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीचे संदर्भ लक्षात घेत त्यांचं सध्याच्या काळाच्या अनुषंगाने उपयोजन करणारे ‘एमसीयू’मधील चित्रपट पलायनवादी भूमिकेचा (एस्केपिस्ट सिनेमा) त्याग करत सामाजिक-राजकीयदृष्ट्या सजग राहताना दिसतात. त्यांच्यात फँटसीचे अस्तित्त्व आणि जाणीव असली तरी त्याला असलेली वास्तविकतेची जोडही तितक्याच प्रगल्भरीत्या प्रतिबिंबित होते. उदाहरणार्थ, ‘कॅप्टन अमेरिका’ या दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन राष्ट्रवादाचं प्रतीक बनलेल्या नायकाच्या निमित्ताने केवळ राष्ट्रवाद ही संकल्पना लक्षात घेतली जात नाही, तर तिच्या तीव्रतेत निरनिराळ्या कालखंडात घडत असलेले बदलही टिपले जातात. तर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर वर्णद्वेषी भूमिकेचा आरोप होत असताना ‘डिस्ने’सारख्या बड्या निर्मात्या संस्थेची एक शाखा असलेल्या ‘मार्व्हल’कडून ‘ब्लॅक पँथर’ या पहिल्या कृष्णवर्णीय सुपरहिरो चित्रपटाची निर्मिती केली जाते, आणि हा चित्रपट त्या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यातील महत्त्वाच्या पुरस्कारांचा दावेदार ठरतो. सदर चित्रपटातील स्त्रीपात्रांना असलेले महत्त्व मार्व्हलच्या ‘ब्लॅक विडो’ या फिमेल सुपरहिरोचं आणि पर्यायाने स्त्रीवादाचंच एक रूप आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’देखील यात मागे नाही. महाभारत, रामायणासारख्या महागाथांच्या धर्तीवर कार्य करणारं तिचं फँटसी कथानक स्त्री पात्रांना असणाऱ्या महत्त्वाच्या निमित्ताने स्टिरीओटाइप्स छाटून पाडतं. या बाबीचं महत्त्व जाणून घ्यायचं असल्यास या मालिकेशी परिचित असणाऱ्या कुणालाजवळही आर्या स्टार्क आणि लियाना मॉरमाँटचा उल्लेख करून पाहावा. 

 

या दोन्हींच्या अतिलोकप्रियतेमुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं सर्वार्थाने सोयीस्कर असलं तरी आपण जर जागतिक स्तरावरील कंटेंटचे उपभोक्ते असू तर असं करणं मला तरी अतर्क्य वाटतं. आपल्या विश्वाची निर्मिती आणि मांडणी ते प्रत्यक्ष कथेची मांडणी अशा दुहेरी पातळीवर पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देणाऱ्या या प्रयोगशील अवाढव्य निर्मितींच्या लोकप्रियतेमागील कारणं इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. या दोन्ही विश्वांनी ‘एंडगेम’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या शेवटच्या सीझनच्या निमित्ताने एका पर्वाच्या समाप्तीच्या दिशेने पाऊल टाकलं असलं तरी ‘एमसीयू’चा ‘इन्फिनिटी सागा’च्या पुढील प्रवास आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या प्रीक्वेल मालिकेची तयारी एव्हाना झालेली आहे. गेल्याच आठवड्यात सोलो ‘ब्लॅक विडो’ चित्रपटाच्या संभाव्यतेच्या निमित्ताने स्कार्लेट जोहान्सन मार्व्हल चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारी आणि कार्यकारी निर्माती ठरणारी पहिली स्त्री अभिनेत्री ठरणार आहे. एका गाथेचा शेवट होत असला तरी मार्व्हल अजूनही नवीन, क्रांतिकारी शक्यतांचा मागोवा घेत आहे.
(लेखकाचा संपर्क - ८६६९१६३५४२)
 

बातम्या आणखी आहेत...