आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजनाथजवळ पहाटे वाळू चाेरीच्या प्रयत्नात ट्रॅक्टर गिरणा नदीत काेसळले; शिरसाेलीचा चालक ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव - सूर्याेदयापूर्वी अवैध वाळू उपसा करण्यासाठी नदीपात्रात जात असलेले भरधाव ट्रॅक्टर चालकासह नदी काठाजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात काेसळले. त्यात ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने चालक जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास वैजनाथ गावातील गिरणा नदीपात्राजवळ घडला. काशिराम रामकृष्ण बारी (वय ३७, रा.हरिविठ्ठलनगर मूळ रा.शिरसोली) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. ही घटना घडल्यानंतर सकाळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. 

 

वाळूतस्करीने घेतला बळी :

सूर्याेदयापूर्वी अवैध मार्गाने वाळूतस्करी हाेत असल्याचे या घटनेमुळे उघड झाले. घटना घडल्यानंतरही महसूल विभागा ढिम्म असल्याचे गुरुवारी दिसून आले. मात्र, दुसरीकडे पाेलिस प्रशासनाने लाेकभावना लक्षात घेऊन दुपारनंतर याच भागात विशेष माेहीम राबवून अवैध वाळू तस्करी करणारी वाहने पकडली हे विशेष. 

 

ट्रॅक्टर मालकाचा शाेध 

वैजनाथ वाळू गट हा एरंडोल तालुक्याच्या हद्दीत येतो. परंतु, ही घटना गिरणा नदी पात्राच्या काठाजवळ झालेली असल्याने जळगाव हद्दीत आहे. बारी यांच्या मृत्यूप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकांच्या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणात तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी मगन पाटील यांनी जबाब घेतले. ट्रॅक्टर मालकाचे नाव स्पष्ट झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. वैजनाथ हे एरंडोलच्या हद्दीत असले तरी गिरणापात्रात जळगाव तालुक्यातून वाळूची तस्करी करण्यात येते. 

 

सावखेडा शिवारात तस्करीच्या विराेधात कारवाई 
वैजनाथ येथील गिरणा काठावर हा अपघात झाला. वैजनाथ येथे रात्रभर वाळू उपसा हाेत असल्याचे समाेर आल्यानंतर पोलिस दलातर्फे गुरुवारी दिवसभर अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. सावखेडा शिवारात अवैधरित्या वाहतूक करणारे एम.एच.१९ सी.व्ही.०५१०, एम.एच.१९ ए.एन.३७४४ यासह एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात अाले. तिनही ट्रॅक्टर महसूल प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत. 

 

कर्मचारी मॅनेज होत असल्याने सर्रास वाळू उपसा 
वैजनाथच्या नदीपात्रातून रात्रभर वाळूची चोरी हाेते. गुरुवारी रात्रीही वाळू उपसा सुरूच होता. अावाज उठवल्याने वाळूचोरांनी भ्याड हल्ला केला होता. त्यात जखमी झालो होतो. अंधारात रस्त्याच्या कडेला दहा ते पंधरा फूट खाेल खड्ड्यामध्ये ट्रॅक्टर पडून चालकाचा मृत्यू झाला. अवैध वाळू वाहतुकीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येते; परंतु त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी पैसे घेऊन मॅनेज होतात. -भाऊसाहेब पाटील, पोलिस पाटील वैजनाथ, ता.एरंडाेल 

 

पथक पाठलाग करीत असल्याने अपघाताची चर्चा 
अवैध वाळू वाहतूक विराेेधी पथक वैजनाथ येथे ट्रॅक्टरचा पाठलाग करीत होते. पथकाला घाबरून बारी यांनी ट्रॅक्टर वेगात पळवले. त्यामुळे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याबाबत चर्चा होती. याबाबत तहसीलदार अमोल निकम यांना विचारले. परंतु, पथक कारवाई करण्यासाठी गेलेले नसल्याचे त्यांनी नमूद केले. 

बातम्या आणखी आहेत...