आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; मुलगी मृत, हेल्मेटमुळे वडील बचावले: अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई -  गोदावरीच्या पात्रात अवैध वाळू भरून गेवराईकडे जाणाऱ्या भरधाव  ट्रॅक्टरने धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जमादारणीच्या पुलाजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अकरावीची विद्यार्थिनी  ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ठार झाली तर हेल्मेटमुळे  वडिलांचे प्राण वाचले.  

 
  जखमी अवस्थेत त्यांना औरंगाबादला हलवण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी अकरा वाजता हा अपघात घडला. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर जागेवर सोडून फरार झाला अाहे. निकिता रामदास जाधव  (१६, रा. कोमलवाडी ता.गेवराई) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे.  दुपारी एक वाजता  निकितावर कोमलवाडी  येथे गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु वडील औरंगाबादला उपचार घेत असल्याने मुलींच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नाहीत. 


गेवराई तालुक्यातील कोमलवाडी येथील रामदास जाधव यांची मुलगी निकिता (१६)  ही गढी येथील जय भवानी महाविद्यालयात  अकरावी  विज्ञान शाखेत  शिक्षण घेत होती. तिने बीडमध्ये शिकवणी लावली होती.  गुरुवारी (दि. १५) सकाळी   वडील रामदास जाधव हे तिला सोबत घेऊन दुचाकीने (क्र. एम. एच.२३ आर.७५७७) बीडकडे निघाले होते. दरम्यान धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवराईपासून अर्धा कि. मी.वरील जमादारणीच्या पुलाजवळ वडील  जाधव हे  दुचाकी बाजूला घेऊन गाडीवरच बसून फोनवर बोलत असताना अचानक पाठीमागून आलेल्या वाळूच्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली.

 

यात जाधव बाजूला फेकले गेले तर  मुलगी निकिताच्या डोक्यावरून ट्रॅक्टरचे  चाक गेल्याने ती  ठार झाली. जाधव यांनी हेल्मेट घातल्याने ते बचावले. मात्र  त्यांच्या छातीला मोठा मार लागला असून  त्यांना  गेवराईत उपचार करून  औरंगाबाद येथे  दाखल केले. घटनास्थळी गेवराई पोलिस एस.आर.आईटवार, पोलिस नाईक गणेश तळेकर, नांगरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. उशिरापर्यंत गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  दरम्यान गेवराई तालुक्यातील कोमलवाडी येथे दुपारी  एक वाजता निकितावर अंत्यसंस्कार केले.  

 

असा घडला अपघात  
दुचाकीला पाठीमागून धडकेनंतर   ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टरचा  वेग कमी करता आला नाही. एक टायर निकिताच्या डोक्यावरून गेले. पुढे हे ट्रॅक्टर  रस्त्याच्या बाजूला शनीनाथ  इंजिनिअरिंग वर्कशॉपकडे गेले. त्या ठिकाणी  दोन  रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर जाऊन  धडकले व बंद पडले. त्यामुळे वर्कशॉपमध्ये काम करत असलेल्या तिघांचे प्राण वाचले.

 

गोदाकाठी पथक पाहणी करते  

नियंत्रणासाठी, या वाहनांना पकडण्यासाठी संध्याकाळी ८ ते सकाळी ६ नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली  ६ तलाठी व मंडल अधिकारी यांचे पथक रात्रभर गोदाकाठची पाहणी  करते.  
सखाराम मांडवगडे, तहसीलदार    

बातम्या आणखी आहेत...