व्यापारी खून प्रकरण / बुलेट मिळाले; हॅण्डब्रेकवरच गाडी उभी असल्याने तपासाला कलाटणी

  • हल्लेखोराने वाहनात बसून की बाहेरून गोळीबार केला?
  • एसपींकडून घटनास्थळाची पाहणी; मौजपुरी पोलिसांना तपासाच्या सूचना

प्रतिनिधी

Jan 14,2020 08:09:00 AM IST

परतूर/रामनगर - मंठा रोडवरील पोखरी फाट्याजवळ गोळीबार करून व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. यात राजेश नहार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून, नहार हे नेहमी ड्रायव्हरला सोबत घेऊनच असतात. घटनास्थळी एकटेच कसे आले, घटनास्थळी गाडी हॅण्डब्रेकवरच उभी कशी काय होती, आरोपींनी आतून की बाहेरुन गोळ्या झाडल्या, या विविध प्रश्नांतून पोलिसांच्या तपासाला वेगळी कलाटणी येऊ लागली आहे. मृताच्या शरीरातून व वाहनातून दोन गोळ्या जप्त केल्याचे, पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.


परतूर येथील व्यापारी राजेश नहार यांची गोळीबार करून हत्या केल्याच्या जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरातील प्रसिद्ध व्यापारी विमलराज सिंघवी यांच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल नहार यांना अटक झाली होती. याशिवाय जालना येथील उद्योजक गौतम मुनोत यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी नहार यांनीच सुपारी दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या दोन्ही प्रकरणात नहार जामिनावर होते. परंतु, अशातच त्यांची गोळीबार करून हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अगोदरच जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी पिस्टलचा वापर वाढल्यामुळे जिल्हा अग्रस्थानी आला आहे. दरम्यान, मौजपुरी पोलीस ठाण्याच्या ठिकाणी पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जाऊन या प्रकरणाचा तपास आढावा घेतला आहे. तसेच या प्रकरणात तपास करण्याचे मार्गदर्शन एसपी चैतन्य यांनी मौजपुरी पोलिसांना केले आहे. प्रसिद्ध व्यापाऱ्यांच्या हत्येची सुपारीतील व्यापाऱ्याचा खून झाल्याने यात पोलिसांचा तपास कसा होतो, याकडे जिल्ह्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

सर्व बाजूने तपास


नहार प्रकरणात गोळीबार प्रकरणाचा विविध पथकांमार्फत तपास चालू आहे. लवकरच हा गुन्हा उघड करुन, आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गोपनीय पध्दतीने तपास चालू आहे.
एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.

X
COMMENT