दिव्य मराठी विशेष / रेल्वे प्रवाशांना अवघ्या दहा मिनिटांत मिळणार रक्तदाब, बॉडी मास इंडेक्ससह 16 चाचण्यांचा अहवाल फक्त 50 रुपयांत

सर्व मोठ्या रेल्वेस्थानकांवर बसवण्यात येत आहेत संपूर्ण आरोग्य तपासणी यंत्रे

विशेष प्रतिनिधी

Oct 09,2019 09:32:00 AM IST

शेखर घोष | नवी दिल्ली


दिवाळीपूर्वी रेल्वेकडून १२ लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची व कोट्यवधी प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व मोठ्या रेल्वेस्थानकांवर संपूर्ण आरोग्य तपासणी अहवाल यंत्र बसवण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे सर्वसामान्य प्रवाशांना वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी फक्त ५० रुपये तर रेल्वे कर्मचाऱ्यांना फक्त १० रुपये द्यावे लागतील. फक्त दहा मिनिटांत विविध १६ प्रकारच्या चाचण्या करता येणार आहेत. या चाचण्यांत हाडे, बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, हाइट मसल मास, शरीराचे तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण व वजन आदींचा समावेश आहे. चाचणी करवून घेणाऱ्यांना या परीक्षणाचे अहवालही अवघ्या १० मिनिटांत मिळणार आहेत. स्थानकावर यंत्राची देखभाल करणाऱ्या कंपनीने सांगितले, या सर्व चाचण्यांसाठी प्रवाशांना रक्ताचे नमुने देण्याची गरज नाही. या यंत्राचे उद््घाटन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद यादव यांनी लखनऊ रेल्वेस्थानकावर दोन दिवसांपूर्वी केले.


सोमवारी दिल्लीतही यंत्र बसवण्यात येणार आहे. इतर सर्व मोठ्या रेल्वेस्थानकांवर लवकरच ही यंत्रे बसवण्याचे काम सुरू आहे. ते एक महिन्यात पूर्ण होईल. कंपनीने सांगितले, लवकरच या आरोग्य तपासणीच्या बूथवर मधुमेहाचीही तपासणी करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी वेगळे शुल्क आकारण्यात येईल. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपककुमार यांनी सांगितले, प्रवाशांना स्थानकांवर आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. ही यंत्रे देशातील सर्व मोठ्या स्थानकांवर व मंडळ कार्यालयात बसवण्यात येतील. प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

  • चाचणीनंतर दहा मिनिटे प्रतीक्षा न करणाऱ्या प्रवाशांना ई-मेलवर अहवाल पाठवणार

यंत्राच्या बूथवर असलेले आरोग्य कार्यकर्ता चाचणी करवून घेणाऱ्याच्या दंडावर यंत्राचे सेन्सर लावेल. त्याद्वारे सर्व १६ प्रकारच्या चाचणी त्यांच्या सर्व्हरवर अपलोड होतील. सर्व्हरवरुन वरील माहिती तज्ञांकडे पाठविण्यात येईल. ते दहा मिनिटांत याचा अहवाल पाठवून देतील. ज्यांना दहा मिनिटेही प्रतीक्षा करणे शक्य नसते, अशांना ई-मेलवर अहवाल मिळेल.

X
COMMENT