Inspirational / हात-पाय नाहीत, तरी देतात फुटबाॅल खेळाडूंना प्रशिक्षण; खेळातील याेगदानासाठी ईएसपीएनच्या जिम्मी-V पुरस्काराने (ईएसपीवाय) सम्मानित

नकली हात-पाय पसंत नाहीत, विशेष संबाेधलेले अावडत नाही

दिव्य मराठी नेटवर्क

Jul 13,2019 08:56:00 AM IST

३१ वर्षांचे राॅब मँडेज आपल्या व्हीलचेअरवर बसल्या बसल्या खेळाडूंना आदेश देतात, गेम प्लॅन समजावून सांगतात. काेणत्या खेळाडूने काेणत्या ठिकाणी थांबावे, काेणत्या खेळाडूला खेळवायचे, काेणाला बाहेर ठेवायचे हे सर्व तेच ठरवतात. मैदानावर प्रत्येक खेळाडू जसा आनंद व्यक्त करताे त्याचप्रमाणे प्रत्येक गाेलनंतर ते जल्लाेष करतात. राॅबच्या खेळापासून ते नियाेजनापर्यंत प्रत्येक जण त्यांचा प्रशंसक आहे. त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रत्येकाला प्रेरणा देते. ज्या बुद्धिमत्तेने (व्हीलचेअरचे नियंत्रण) व्हीलचेअर चालवतात तीच बुद्धिमत्ता वापरून ते खेळावरही उत्कृष्ट पकड मिळवतात. राॅब यांना जन्माअधी टेट्रा एमेलिया सिंड्राेम विकार हाेता. यामुळे गर्भात असतानाच त्यांच्या हातापायांचा विकास झाला नाही. आठ महिन्यांची गर्भवती असताना त्यांची आई जाेसीने अल्ट्रासाउंड केले त्या वेळी राॅबच्या या विकाराबद्दल कळाले. परंतु गर्भपातासाठी खूप उशीर झाला हाेता. राॅबच्या जन्माबद्दल त्याचे पालकही फारसे उत्साहित नव्हते. जन्मानंतर अनेक आठवडे त्याच्या वडिलांनी राॅबकडे लक्षही दिले नाही. आई शालीत गुंडाळून त्याला बाहेर फिरवण्यासाठी न्यायची. मुलाच्या या अवस्थेने दु:खी हाेऊन त्याचे वडील मद्यपी झाले. राॅबला विशेष वाहन मिळाल्यानंतर वडिलांचा आत्मविश्वास दुणावला त्यांनी मुलाला प्राेत्साहन देण्यास सुरुवात केली. राॅबच्या फुटबाॅल प्रेमामागे त्यांची बहीण आणि एक घटना आहे. त्याची बहीण त्याला प्रत्येकवेळी नवीन काहीतरी करण्यास सांगायची. एक दिवस तिने राॅबच्या दाढीच्या खाली प्ले स्टेशनच्या रिमाेटची कळ दाबली. आपले गळ्याचे हाड आणि दाढीच्या मदतीने ताे खेळ खेळू लागला. त्याच्या बहिणीनेही नकळतपणे एखाद्या हाणामारीच्या खेळाएेवजी मेडन व्हिडिआे गेम (अमेरिकन फुटबाॅल व्हिडिआे गेम सिरीज) सुरू केला. हाणामारीचे खेळ खेळतानाही ताे अधूनमधून मेडन खेळ खेळायचा. राॅबच्या शाळेतही ३२ संघांबराेबर मेडन गेमची एक स्पर्धा झाली. या स्पर्धेत राॅबने द्वितीय क्रमांक पटकावला. सहकारी जेव्हा मैदानावर फुटबाॅल खेळायला जायचे तेव्हा ते संघ व्यवस्थापकाची भूमिका बजावायचे. मॅडन व्हिडिआे गेमवरच प्रत्यक्ष खेळाची व्यूहरचना आखायचे व मैदानावर त्याची अंमलबजावणी करायचे. काही काळातच ते सहखेळाडूंचे प्रशिक्षक झाले. नंतर ते प्राॅस्पेक्ट हायस्कूलचे प्रमुख फुटबाॅल प्रशिक्षक झाले.

नकली हात-पाय पसंत नाहीत, विशेष संबाेधलेले आवडत नाही
रॉब नकारात्मक विचार करत नाही. काेणी विशेष म्हणून संबाेधलेलेही त्यांना आवडत नाही. त्यांचे वडील राॅबला म्हणत, सहानुभूतीचा विचार केला तर जीवनात काहीही करू शकणार नाही. तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. तुझ्यातला वेगळेपणा हीच ताकद बनव, रॉब भलेही स्वत:हून काही करू शकत नाहीत, पण त्यांना दुसऱ्यांकडे मदत मागायला व स्वत:बद्दल सहानुभूती व्यक्त केलेलीही आवडत नाही. रॉब म्हणतात,नकली हातपाय बसवण्याचा पर्याय त्यांच्यासमाेर आहे. परंतु सध्या आपण जसे आहाेत तसेच राहणे त्यांना पसंत आहे. ‘हू सेज आय कांट’ नावाने स्वयंसेवी संस्थाही चालवतात.

X
COMMENT