आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराचे स्थित्यंतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सतीश चिखलीकर’च्या भ्रष्टाचाराची बातमी वाचून दोन जुन्या घटना आठवल्या. मी 1975 ला मुंबईत एअर इंडियात नोकरीस असताना दादर-सांताक्रुझ असा प्रवास करत असे. एके दिवशी संध्याकाळी सांताक्रुझ स्टेशन गर्दीने फुलले होते. सर्व लोकल्स भरून येत होत्या. अनेक गाड्या सोडल्यानंतर एका गाडीत ‘फक्त महिलांसाठी’ असलेल्या डब्यात चार-पाच मजूर पुरुष होते. त्यात मीही कसाबसा शिरलो. उभे राहण्यास जागा मिळाल्याने आनंद वाटला, पण तो बांद्रा येताच मावळला. आम्हाला टीसीने पकडून त्याच्या साहेबांकडे नेले.‘हे एअर इंडियात आहेत, बघा काय ते.’ साहेब म्हणाले, ‘महिलांच्या डब्यातून प्रवास केल्याने 240 रुपये दंड (माझा पगार 200 रुपये) किंवा सात दिवस कैद. काय करू सांगा?’ मी म्हणालो, ‘कैद केल्यास नोकरी जाईल. मी दंड भरतो!’ त्याने भरा म्हटल्यावर मी म्हणालो, ‘माझे ओळखपत्र ठेवा, पैसे भरल्यावर परत द्या’ त्याने विचारले,‘तुमच्याकडे किती आहेत?’ मी दहा आहेत म्हटल्यावर तो म्हणाला, काय ते एकदाच सांगून टाका. मला त्याच्या बोलण्याचा ‘अर्थ’ समजला तरीही न समजल्यासारखे करत होतो. सरतेशेवटी मी नाशिकचा आहे असे समजल्यावर, ‘तुम्ही तर गाववालेच निघालात’ असे म्हणून त्याने मला सोडले. म्हणजे तो भ्रष्टाचारच होता, पण आडमार्गाने! त्यानंतर एकदा मला विमानाने नागपूरला जाण्याचा योग आला. माझ्या पुढच्या आसनावरील प्रवासी शेजा-याला सांगत होता,‘तुम्हाला ‘एक कोटी’ खायचे असतील तर ते पचवण्यासाठी त्यातले दहा लाख ‘इतरांना द्यावे लागतात.’ विमानतळावर बंदोबस्त आणि हारतुरे घेणा-यांची गर्दी पाहून मंत्री येणार असल्याचे समजले. बघतो तर मघाशी एक कोटीची भाषा करणारे राज्याचे मंत्रीच निघाले. दुस-या दिवशी गरिबी हटाव वरील त्यांचे भाषण छापून आले होते. पुढे त्यांच्या चिरंजीवांना 154 कोटींच्या अपहारप्रकरणी अटकही झाली होती.‘भ्रष्टाचार’ हा आडमार्ग न राहता ‘राजमार्ग’ झाला होता.