आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 साखर कारखान्यांवरील भाजप नियुक्त तज्ञ संचालकांची उचलबांगडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या सहकारी साखर कारखान्यांवर तत्कालीन भाजप सरकारने नियुक्त केलेले तज्ञ संचालक गुरुवारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने हटवले आहेत. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.

फडणवीस सरकारने सहकारी चळवळीत शिरकाव करण्यासाठी जे अनेक उपद्व्याप केले, त्यातील एक प्रकार म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी साखर कारखान्यावर तज्ञ संचालकांची नेमणूक होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाले. नव्या सरकारने पूर्वीच्या सरकारच्या नेमणुका रद्द करण्याचा सपाटा लावला आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी शासन निर्णय जारी करून नोव्हेंबर २०१४ ते ऑक्‍टोबर २०१९ या कालावधीत ज्या १९ सहकारी साखर कारखान्यांवर तज्ञ संचालक नियुक्त केले होते, त्या नियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे हे सर्व कारखाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वर्चस्वाखाली आहेत. त्यावरील फडणवीस सरकारने नियुक्त केलेले तज्ञ संचालक हटवण्यात आले आहेत.गेल्या आठवड्यात पणन विभागाने एक शासन निर्णय काढला होता व कृषी उत्पन्न बाजार समितीवर तत्कालीन फडणवीस सरकारने नियुक्त केलेले तज्ञ संचालक हटवले होते. आता सहकारी साखर कारखान्यातील भाजपच्या संचालकांना महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. फडणवीस सरकारने नेमलेले तज्ञ संचालक भाजपचे पदाधिकारी होते. अनेक ठिकाणी कारखान्याचे निवडून आलेले संचालक आणि तज्ञ संचालक यांच्यात भर सभांमध्ये वाद झाले होते. सरकारने नेमलेल्या तज्ञ संचालकांना अनेक वेळा सभांमधून हाकलून देण्यात आले होते.

बडे नेते होते टार्गेट

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज जो शासन निर्णय जारी केला आहे, त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे कारखाने आहेत. राज्यात खासगी व सहकारी २०० कारखाने आहेत. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या १९ निवडक कारखान्यांवर तज्ञ संचालक नेमले होते.
सरकारचा निर्णय, २०१४ ते २०१९ या कालावधीत झाल्या होत्या नियुक्त्या

रेणा, पूर्णा, आंबेडकर कारखान्यांचा समावेश

लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखाना, बारामतीचा माळेगाव, इंदापूरचा नीरा-भीमा, करमाळ्याचा आदिनाथ आणि मकाई, इंदापूरचा छत्रपती, परभणीचा पूर्णा, शिरूरचा घोडगंगा, उस्मानाबादचा आंबेडकर, जुन्नरचा विघ्नहर, कागलचा दूधगंगा, आजाराचा आजरा, हवेलीचा संत तुकाराम, बारामतीचा सोमेश्वर, मंगळवेढ्याचा संत दामाजी, माढाचा विठ्ठलराव शिंदे, दौंडचा भीमा, पाटणचा अजिंक्यतारा आणि सांगलीचा पतंगराव कदम असे १९ सहकारी साखर कारखाने आहेत. हे सर्व कारखाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...