आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामे महिन्यातील 2005 या वर्षीची गोष्ट आहे. आम्ही नवीन मोटारसायकल घेतली होती. त्या गाडीवरूनच माझ्या नांदेड जिल्ह्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या गाडीवरून मी, माझी पत्नी-दोन मुली व मुलगा असे अख्खे कुटुंबच निघालो होतो. सोबत सामानाच्या दोन बॅगा व प्रवासात लागणारी कॅरीबॅग असा सगळा जामानिमा होता. सकाळी अकरा-साडेअकराच्या सुमारास आम्ही गाव सोडले. आमचे गाव ते उस्मानाबादपर्यंतचे अंतर सुमारे 250 किमी इतके होते. वाटेत थांबत-थांबत तसेच सोबत आणलेली शिदोरी शेतातील एका झाडाखाली बसून सोडून जेवणही केले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे पोहोचण्यास आम्हाला रात्रीचे सव्वाआठ वाजले होते. पुढील रस्त्याबाबत मित्रांना आलेला अनुभव चांगला नसल्याने त्यांनीही धोक्याची सूचना दिली होती. शिवाय मुलाबाळांसह रात्रीचा प्रवास करू नये, असा सर्वानुमते निर्णय घेतला. त्या गावात लॉज मिळेल काय? याची चौकशी करत होतो, पण ते गाव लहान असल्याने तेथे लॉजची सोय नव्हती. एक जण म्हणाला, एखाद्या वाहनाच्या मागून येडशीपर्यंत जा. तेथून औरंगाबाद-सोलापूर महामार्ग आहे. उस्मानाबादला जाण्यास थोडे दूर अंतर पडेल, पण मार्ग सुरक्षित आहे. अशी चर्चा करण्यातच सुमारे 15 ते 20 मिनिटांचा कालावधी गेला. काय करावे अशा चिंतेत असतानाच आमचे संभाषण एका व्यक्तीने ऐकले होते. त्यांच्याकडेही मोटारसायकल होती. त्यांनी सांगितले, काही काळजी करू नका. मलाही त्याच रस्त्याने जायचे आहे. माझ्यासोबत चला. त्यांची मोटारसायकल पुढे आणि आम्ही मागे, असा प्रवास सुरू झाला. ज्या मार्गावर भीती वाटत होती, तो मार्ग संपला. त्या व्यक्तीने आमचा निरोप घेत असताना, त्या देवदूताचे मनापासून आभार मानले. त्याचे उपकार आमच्या कायम स्मरणात राहतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.