आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमाजी, तुम्ही भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यास सक्षम नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मूळ भारतवंशीय परंतु आता अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका नागरिकास पर्यटननगरी औरंगाबादमध्ये नुकतेच अत्यंत वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. मुलाची नोंदणी करण्यासाठी पोलिसांकडून मिळालेली वागणूक आणि त्यासाठी करावी लागत असल्याची कसरत त्यांनी हताशपणे थेट केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना ट्विटरद्वारे कळवली आहे. 'तुम्ही ही व्यवस्था बदलण्यास व भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यास सक्षम नाही, अशी माझी खात्री आहे,' अशा भावना त्यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या. दीपक बिडवई असे या भारतवंशीयांचे नाव आहे. ते मूळचे नाशिक जिल्ह्यातील लासलगावचे रहिवासी असून औरंगाबादचे जावई आहेत. 


दीपक बिडवई यांनी संपूर्ण आपबिती 'दिव्य मराठी'कडे कथन केली. ते म्हणाले, जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचारमुक्त भारताबद्दल भरभरून बोलतात. भारतातील आयटी क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी मी ४ वर्षांनंतर मोठी रजा टाकून आलो आहे. माझा मुलगा भारतवंशीय असला तरी त्याचा जन्म अमेरिकेतील असल्याने तो तिथलाच नागरिक ठरतो. भारतात आल्यानंतर त्याची नोंद करणे गरजेचे आहे. औरंगाबादमध्ये आल्यानंतर पोलिस आयुक्तालयात गेलो, तेथून पोलिस ठाण्यात पाठवले, पोलिस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा अायुक्तालय, तेथून पुन्हा पोलिस ठाणे असे फिरवले. पोलिस ठाण्यात तेथील कर्मचाऱ्यांनी तर 'तुम्हाला पगार किती आहे, तिकडे निग्रो लोक फार बेकार आहेत', असे असंबद्ध संभाषण केले. काम तर झाले नाही, उलट मनस्ताप. शेवटी वैतागून परराष्ट्रमंत्र्यांना ट्विट केले. 
दीपक बिडवई हे २०१२ मध्ये आयटी क्षेत्रात नोकरीसाठी अमेरिकेत गेले. तिथे एकाचवेळी ३-३ ठिकाणी काम करून त्यांनी यश मिळवले. अलीकडेच ते कॅनडाच्या आयटी क्षेत्रात गेले आहेत. आयटी कंपन्यांतील संधी, तंत्रज्ञान आदींच्या अभ्यासासाठी ते भारतात आले आहेत. 


अशी अव्यवस्था कुठेच नाही 
एक तर मुलाच्या नोंदणीबद्दल योग्य मार्गदर्शन करणारे कुणीही कर्मचारी भेटले नाहीत. ज्यांना भेटलो, त्या सर्वांनाच वाटत होते, हा विदेशातून आलाय म्हणजे याच्याकडे खूप पैसे असतील. शिवाय, असंबद्ध प्रश्नही विचारले. मी बरेच देश फिरलो, पण अशी किचकट व्यवस्था कुठेही नाही. हे बदलले पाहिजे. दीपक बिडवई 


तक्रार अाल्यावर आम्ही पडताळून कारवाई करू 
संबंधित व्यक्तीने अद्याप अामच्याकडे अशी कुठलीही तक्रार केलेली नाही. तक्रार आल्यास शहानिशा करून घडलेला प्रकार सत्य आढळला तर लगेच कारवाई करेन. डॉ. दीपाली धाटे -घाडगे, पोलिस उपायुक्त, औरंगाबाद. 

बातम्या आणखी आहेत...