आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन औषध विक्री व ई-पोर्टलच्या निषेधार्थ बंद पाळून विक्रेत्यांचा कचेरीवर मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ऑनलाइन औषध विक्री व ई-पोर्टलच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यातील औषध विक्रेत्यांनी बंद पाळला. यात जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी सहभाग घेतला. ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ नगर जिल्हा, नगर तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून तेथे निषेध सभा घेतली. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले. दरम्यान, प्रशासनाने पूर्वकाळजी घेत नियोजन केल्यामुळे औषधावाचून रुग्णांचे हाल झाले नाहीत. 


केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष चेतन कर्डिले, सचिव राजेंद्र बलदोटा, तालुकाध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव विलास शिंदे, खजिनदार महेश रच्चा, आदिंसह मोठ्या संख्येने शहरातील व तालुक्यातील औषध विक्रेते व काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज, पाउलबुधे फार्मसी, डॉ. विखे पाटील फार्मसी, यशवंतराव चव्हाण फार्मसी, अरिहंत फार्मसी, इंडिका फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


राजेंद्र बलदोटा म्हणाले, ऑनलाइन औषध विक्रीचे घातक परिणाम होत आहे. गर्भपात, झोपेच्या गोळ्या व नशिले पदार्थ सर्रास उपलब्ध होत असल्याने समाजावर गंभीर परिणाम होत आहेत. गेल्या एक वर्षापासून ऑनलाइन विक्रीच्या निषेधार्थ सरकारला वारंवार जागे करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र अद्याप कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे संपूर्ण भारतात औषध विक्रेते संघटनेने बंद पुकारला आहे. या संपाची शासनाने दखल घेतली नाही, तर देशव्यापी आंदोलन उभे करू. विलास शिंदे म्हणाले, औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला असला, तरीही अत्यावश्यक सेवा असल्याने शहरातील प्रमुख भागात औषध विक्री सुरू ठेवली. यावेळी विशाल शेटिया, संकेत गुंदेचा, हेमंत गुगळे, नितीन गांधी, मनोज खेडकर, वसंत राठोड, नितीन बोठे, आदी उपस्थित होते. 


प्रशासनाची पूर्वकाळजी 
बंदच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने काळजी घेत नियोजन केले होते. नागरिकांना औषध पुरवठा सुरळीत रहावा, म्हणून सर्व सरकारी व निमसरकारी रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध करण्यात आली होती. रुग्णांच्या सोयीसाठी, खासगी रुग्णालयांनी पुरेसा औषधसाठा ठेवावा, अशा सूचना प्रशासनाने दिलेल्या होत्या. 

 

बातम्या आणखी आहेत...