आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाचवेळी ३ मित्रांची अंत्ययात्रा; बुलेटवरील रपेट ठरली अखेरची...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- मित्राच्या बुलेट गाडीची रपेट मारण्याची हौस तीन मित्रांच्या जीवावर बेतली. अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत तिघांचा अंत झाला. महामार्गावरील माळी भवनजवळ शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तिघांची अंत्ययात्रा रविवारी दुपारी २ वाजता एकाच वेळी काढण्यात आली. तिघांवर कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. 


शहरातील शेख वाजीद शेख रफीक(वय २३, रा. काझी प्लॉट, भुसावळ), शेख समीर शेख हमीद (वय २२, रा. काजीपूर ब्रिजजवळ, भुसावळ) व शेख जावीद शेख मोहिनोद्दीन (वय २२, रा. काजी प्लॉट, भुसावळ) अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी रात्री त्यांनी मित्र मेमन याची बुलेट (क्र.एमएच.१९-डी.ई.९१४६) रपेट मारण्यासाठी घेतली. माळी भवन परिसरात बुलेटला ट्रकने धडक दिली. 


फुटेजची पाहणी ठरली व्यर्थ 
पोलिसांनी अपघाताच्या वेळेतील नाहाटा चौफुली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, संबंधित वाहन आढळले नाही. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला आहे. याप्रकरणी शेख जाकीर हुसेन शेख अफजल्लोद्दीन (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी अपघातातील बुलेट ताब्यात घेतली. पोलिस निरीक्षक देवीदास पवार तपास करत आहेत. जाम मोहल्ला परिसरात तिघांची अंत्ययात्रा आल्यानंतर गर्दी झाली. घटनेमुळे तीव्र हळहळ व्यक्त झाली. 


 


शेख समीर, शेख वाजीद व जावेद शेख हे तिघे मित्र मजुरी करत होते. समीर वेल्डींगचे काम करत होता, त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आहे. तर शेख वाजीद हा भावासोबत रंगकाम करून उदरनिर्वाह करत होता. त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते. तर शेख जावेद हा मंडप लावण्याचे तसेच व्हीडिओशुटींगचे काम करत होता. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. जावेदच्या पश्चात पाच भाऊ आहेत. 


अपघातानंतर वाहतूक झाली ठप्प 
जाम मोहल्यात अपघाताचे वृत्त कळताच महामार्गावर नागरिकांनी गर्दी केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जळगावला रवाना केले. तसेच ठप्प झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. 


नगरसेवकाने चालवली शववाहिनी 
अपघातानंतर पालिका रुग्णालयातील शववाहिनी घटनास्थळावर पाठवण्यासाठी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पालिका रुग्णालयात फोन लावला. मात्र, चालकाकडून फोन रिसिव्ह केला जात नसल्याने कोठारी यांनी पालिका रुग्णालय गाठले. स्वत: चालवत कोठारी यांनी शववाहिनी घटनास्थळावर आणली. त्यानंतर दोन शववाहिन्यांद्वारे तिघांचे मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. 


शवविच्छेदनाला झाला विलंब 
शनिवारी रात्री मित्राच्या घरी लग्न असल्याने तिघे उशिरापर्यंत तेथेच होते. तिघांच्या घराबाहेर शनिवारी रात्रीपासून गर्दी कायम होती. शवविच्छेदनासाठी जळगावला पाठवलेले मृतदेह रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. 


 

 

बातम्या आणखी आहेत...