आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात मध्यरात्री तीन माथेफिरुंनी पेट्राेल अाेतून चार दुचाकी जाळल्या; पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महिनाभरानंतर माथेफिरुंनी पुन्हा एकदा शहरात दोन वेगवेगळ्या परिसरांत चार दुचाकी जाळल्या. यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अाहे. या घटना रविवारी मध्यरात्री घडल्या. कांचननगरात दुचाकी जाळत असल्याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. शहर व शनिपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 
शहरात थंडीचा कडाखा वाढत असल्याने रात्री १० वाजेनंतर लोकांची वर्दळ कमी होत आहे. याच संधीचा फायदा घेत माथेफिरुंनी शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी चार दुचाकींवर पेट्रोल टाकून त्या जाळल्या. पहिल्या घटनेत शिवाजीनगर परिसरातील मुख्य चौकात असलेल्या 'वासु सपना' कॉम्प्लेक्सजवळ सलीम मजीद खान (वय ३३) यांच्या दुचाकी जाळल्या आहेत. खान कुटंुबीय रविवारी रात्री १०.३० वाजता झोपी गेले होते. यानंतर मध्यरात्री १२.१५ वाजता त्यांच्या घराबाहेर नागरिकांची अारडा-ओरड ऐकू आली. खान यांनी बाहेर निघून पाहिले असता त्यांच्या अंगणात उभ्या केलेल्या दोन दुचाकी (एमएच १९ डीसी ८९८६ आणि एमएच १९ सीके ६३८६) जळत असल्याचे दिसून आले. एक दुचाकी त्यांच्या भावाची होती. परिसरातील नागरिकांनी दुचाकीवर पाणी टाकून आग विझवली. आगीत ७१ हजारांचे नुकसान झाले अाहे. खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


पूर्वनियाेजित कट शक्य 
मध्यरात्री १.३० वाजता तीन माथेफिरुंनी कांचननगरात राहणारे ईश्वर नारायण राजपूत (वय ४८) यांच्या मालकीच्या दोन दुचाकी (एमएच १९ सीजी ००९६ व एमएच १९ डीएस ८२७५) जाळल्या. अंगात जॅकेट घालून आलेले तीन माथेफिरू सुरुवातीला दुचाकीच्या शेजारी उभे राहिले. यातील दोघांनी पहारा दिला तर एकाने बाटलीत आणलेले पेट्रोल दोन दुचाकींवर ओतले. नंतर दोघे निघून गेले. तर एकाने आगकाडी पेटवून दुचाकीवर फेकली. ही आगकाडी विझल्याने थोडे अंतर जवळ जावून त्याने पुन्हा एक आगकाडी पेटवून दुचाकीवर टाकली. पेट्रोलने भडका घेताच हा माथेफिरू तेथून पसार झाला. काही एक कारण नसताना केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी या माथेफिरुंनी दुचाकी पेटवल्याचे फुटेजमधून दिसून येत आहे. हा पूर्वनियाेजित कटही असू शकताेे. राजपूत यांच्या दोन्ही दुचाकींचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. 

कांचननगरात माथेफिरू सीसीटीव्हीत कैद : संशयित पेहरावारून तिशीतील असल्याची शक्यता 

 

संशयितांनी ताेंडावर कापड लावून घटनास्थळी प्रवेश केला. 
कांचनगनर भागातील ईश्वर नारायण राजपूत यांच्या मालकीच्या जाळण्यात अालेल्या दाेन माेटारसायकली. 


नागरिकांकडून विघ्नसंताेषींना अटक करण्याची मागणी 
शहरात यापूर्वीही दुचाकी पेटवून देण्याच्या घटना घडल्या अाहेत. मौज-मस्ती करण्याच्या उद्देशाने हे माथेफिरू नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान करीत आहेत. याची भरपाई मात्र होत नाही. या घटनांमुळे प्रचंड संताप व्यक्त हाेत आहे. दुचाकी जाळणाऱ्या माथेफिरुंना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी हाेत आहे. 


तिघांनी क्षणार्धात दुचाकीवर पेट्राेल टाकून अागकाडी अाेढली. 
दुचाकी जाळणारे सापडलेच नाहीत 
तीन वर्षांपूर्वी महाबळ, आदर्शनगर या भागात चारचाकींच्या काचा फोडण्याच्या घटना वाढल्या होत्या. नगरसेवक अनंत जोशी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन अल्पवयीन तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याच तरुणांनी लाकडी दांड्याच्या मदतीने चारचाकींच्या काचा फोडल्याची कबुली दिली होती. यानंतर या घटना बंद होऊन दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. परंतु, आतापर्यंत दुचाकी जाळणारे पोलिसांच्या हातीच लागलेले नाहीत. नवीपेठ, जोशी कॉलनी, अासोदा रोड अशा अनेक ठिकाणी दुचाकी जाळल्याचे प्रकार घडले आहेत. पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल होत आहेत. परंतु, माथेफिरू पकडले जात नसल्याने लाेकभावना तीव्र अाहेत. 


रात्रीच्या पाेलिस गस्तीवर उभे ठाकले प्रश्नचिन्ह 
शहरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या घटना ह्या प्रमुख चौकांमधील आहेत. शिवाजीनगरातील वासू-सपना कॉम्प्लेक्स प्रमुख चौकात आहे. तर कांचननगर भागात मजूरवर्ग जास्त प्रमाणात राहत असल्यामुळे उशिरापर्यंत वर्दळ असते. अशा परिसरांत घटना घडत असल्यामुळे येथील पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले अाहे. 
दुचाकींनी पेट घेताच संशयित घटनास्थळावरून पसार झाले. 
शिवाजीनगर भागातील 'वासुसपना' कॅाम्प्लेक्सजवळ माथेफिरूंनी मध्यरात्री जाळलेल्या दाेन माेटारसायकली. 

 

 

 


 

बातम्या आणखी आहेत...