आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम पावसासाठी आज ट्रायल, पुढील 52 दिवस प्रयोग चालणार; मराठवाड्यात यंत्रणा सज्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या दोन महिन्यांपासून केवळ चर्चा सुरू असलेल्या कृत्रिम पावसाचा प्रयोग एकदाचा मराठवाड्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सर्व तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी कृत्रिम पाऊस पाडण्याचे ट्रायल केले जाणार आहे. त्यानंतर पुढे नियोजन करून पाऊस पाडला जाईल. सध्या मराठवाड्यात पाऊस सुरू आहे, तेव्हा या प्रयोगाची गरज काय? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु सध्या पडणारा पाऊस हा कमी आहे, विभागाची गरज लक्षात घेता आणखी पावसाची गरज आहे. त्यामुळे पुढील ५२ दिवस प्रयोग केले जातील असे यासाठी नियुक्त केलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष, शास्त्रज्ञ डॉ. जी. आर. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सुकाणु समितीचे सदस्य, शास्त्रज्ञ, हवामान विभागातील तज्ञ्ज, मिशन डायरेक्टर आणि कंपनीच्या प्रतिनिधीची विभागीय आयुक्तालयात दिवशभर कार्यशाळा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी ट्रायल केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सर्व साहित्य दाखल झाले आहे, सायंकाळी विमानही येथे आले आहे. राज्य तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या १५ परवानग्याही मिळाल्या आहेत. त्यामुळे ट्रायल यशस्वी होताच लगेच प्रयोगाला सुरुवात होईल. 

रोज सकाळी ११ वाजता होईल निर्णय : ढगांचा अंदाज घेऊन पाऊस पाडण्याबाबतचा निर्णय रोज सकाळी ११ वाजता होईल. तिघा तज्ज्ञांची समिती हा निर्णय घेईल. ढगांची परिस्थिती कशी आहे, कोणत्या ढगातून पाऊस पडू शकतो, याचा दररोज अभ्यास झाल्यानंतरच निर्णय होईल. 

५२ दिवस चालेल प्रयोग जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये आपल्याकडे पाऊस पडतो आणि पडला नाही तर पाणीदार ढगे आकाशात असतात. त्यामुळे आपण पुढील ५२ दिवस म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत हा प्रयोग करू शकतो आणि त्यानंतर ही यंत्रणा आपण परतीच्या पावसासाठी ठेवू असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

किती पाऊस पडला हे कळेल 
यापूर्वी कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले, तेव्हा किती पाऊस पडला यावरून मतभेद होते. कारण तेव्हा मोजमाप यंत्रे कमी होती. परंतु आता मराठवाड्यात प्रत्येक सर्कलमध्ये मोजणी केंद्र आहे. त्यामुळे प्रयोगामुळे किती पाऊस पडला हे समजू शकेल, असा दावाही डॉ. कुलकर्णी यांनी केला. 

सहा तास उडू शकते विमान
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी रसायन घेऊन विमान जेव्हा आकाशात उडेल तेव्हा ते ६ तास हवेत राहू शकते. रडारची क्षमता २०० किलोमीटरची आहे. परंतु यासाठी औरंगाबादबरोबरच सोलापूर, नागपूर, मुंबई व पुणे येथील रडारचीही मदत घेतली जाणार आहे. जेथे पुरेसा पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणच्या ढगांतून पाऊस पाडला जाणार नाही. जेथे सरासरीपेक्षा कमी ढगांत रसायनांची फवारणी केल्यानंतर साधारपणे १५ मिनिटे ते एक तासात त्यातून पाऊस पडतो. 
पोषक वातावरणाच्या अभावामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग फसण्याची तज्ज्ञांना भीती 
राज्यातील काही भागात पावसाने हाहाकार माजवला आहे, तर मराठवाड्यासह विदर्भातील काही भागाला आजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. या परिस्थितीवर उपाय म्हणून शासनाने कृत्रिम पावसाची तयारी सुरू केली आहे. पण सध्याच्या मान्सूनची प्रगती पाहता कृत्रिम पावसासाठी पूरक वातावरण नसल्यामुळे हा प्रयोग फसेल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. राज्य शासनाने कृत्रिम पाऊस पावसासाठी अर्थसंकल्पात ३० कोटी रूपये मंजूर केले आहेत. सोलापूर येथून ढगांचा अंदाज घेणे सुरू आहे. वरवर ही योजना चांंगली वाटत असली तरी ती अपयशी ठरण्याची शक्यता औरंगाबाद येथील एमजीएमच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनीवास औंधकर यांनी वर्तवली आहे. 

- २०१९ मध्ये सूर्यावरील हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे वैश्विक किरणांची संख्या वाढली आहे. दोन्ही ध्रुवीय भागात बर्फवृष्टी सुरू आहे. याचा परिणाम म्हणून छोट्या हिमयुगाची सुरूवात होऊ शकते. ही बाब मध्य भारताच्या वरील भागात जोरदार पाऊस पाडण्यासाठी पूरक आहे.

- पश्चिम विषुवृत्तीय ध्रुवीय वारे मार्च अखेरपर्यंत संपणे अपेक्षीत होते. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, आणि आजू बाजूच्या काही प्रदेशात पावसाचे ढग गोळा होण्याची शक्यता कमी आहे. 

- अल-निनोचा प्रभाव डिसेंबर अखेरपर्यंत कायम राहणार आहे. त्याचा परिणाम होईल. 

- बंगालच्या उपसागरातून दक्षिण पश्चिम मान्सून दाखल होतो. पण हे ढग मराठवाडा-विदर्भापर्यंत पाेहचतील याची खात्री नाही. ऑगस्ट-सप्टंेंबरमध्ये अरबी समुद्रातून मान्सून दाखल होऊ शकतो. पण हे ढग नाशिकपर्यंतच बरसतील. 

- मराठवाडा-विदर्भात ढग येतील. पण त्यात पाऊस पाडण्यासाठी आवश्यक आर्द्रता नसेल. यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग फसण्याची भिती आहे 

एका फेरीसाठी १० लाखांचा खर्च 
कृत्रिम पाऊस म्हणजेच क्लाऊड सिडींगसाठी मोठा खर्च लागतो. डॉपलर रडार यंत्रणेद्वारे पाऊस पाडणाऱ्या ढगांचा शोध घेतला जातो. या यंत्रणेतून पुढील अर्धा तासात कोणत्या भागात अल्को अॅक्युम्युलस क्लाऊड म्हणजेच पाऊस पाडणारे काळे ढग येतील हे समजू शकते. त्यानंतर विमानातून या ढगांवर सिल्वर आयोडाईडचा मारा केला जातो. एका फेरीसाठी १० लाख रूपयांचा खर्च येत 
 

सातत्याने फसलेले प्रयोग 
देशात सातत्याने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू आहेत. ते दरवेळी फसत आहेत. २००३ मध्ये कर्नाटक, २००३, २००४, २०१५ मध्ये महाराष्ट्रात, तर २००३ ते २००७ दरम्यान आंध्र प्रदेशात  हे प्रयोग करण्यात आले. २०१५ मध्ये २७ कोटी रुपये खर्चून औरंगाबादेत प्रयोग झाला. त्यामुळे २०० मिमी पाऊस झाल्याचा दावा हे काम करणाऱ्या वेदर मॉडिफिकेशन या कंपनीने केला होता. पण पाऊस आमच्यामुळेच झाला असा दावा कोणी करू शकत नाही. 

बातम्या आणखी आहेत...