आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातनंतर महाराष्ट्रातही ट्रायबल पार्टीची स्थापना; आदिवासी मतदारसंघातून उभे करणार स्वतंत्र उमेदवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गुजरात विधानसभा निवडणुकीत उदयास आलेल्या भारतीय ट्रायबल पार्टीने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही शिरकाव केला असून आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनी येत्या १५ नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील नांदूर येथे या पक्षाचा स्थापना मेळावा होत आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आदिवासी मतदारसंघांमधून ही पार्टी स्वतंत्र आदिवासी उमेदवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले.


२०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीआधी दक्षिण गुजरात परिसरातील आदिवासी बहुल पट्ट्यात भारतीय ट्रायबल पार्टीने पाच उमेदवार उभे केले होते. त्यापैकी पार्टीचे संस्थापक छोटूभाई वसावा आणि अध्यक्ष महेश वसावा हे निवडून गेले आहेत. झगडिया विधानसभा मतदारसंघातून छोटूभाई विजयी झाले तर डेडियापायातून महेशभाई निवडून आले. या मतदारसंघांना लागून महाराष्ट्र सीमेवरील गावांमध्येही या पक्षाने आदिवासी अस्मिता आणि अस्तित्वाच्या मुद्द्यांवर मोठे संघटन उभे केले आहे. आता महाराष्ट्रातही या पक्षाच्या माध्यमातून आदिवासींच्या प्रश्नांवर स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा या पक्षाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबरला नाशिकमध्ये होणाऱ्या या मेळाव्यात पक्षाची स्थापना आणि निवडणुकीतील सहभागाची घोषणा करण्यात येणार आहे. नाशिकसह धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील आदिवासी यात सहभागी होणार आहेत.


सगळ्यांनी वापरले, मात्र विकासात नाकारले
देश स्वतंत्र झाल्यापासून आदिवासींच्या मतांचा सर्वांनी वापर करून घेतला. मात्र, आदिवासींचा विकास झाला नाही. त्याची जमीन घेऊन त्यावर धरणे झाली, पण त्याचा फायदा आदिवासींना झाला नाही. भारतीय राज्यघटनेने पाचव्या सूचीच्या आधारे आदिवासींनी संरक्षण आणि विशेष दर्जा दिला. मात्र, त्याचीही अंमलबजावणी होत नाही. पेसा कायदा आला, त्याचाही अमल झाला नाही. त्यामुळे या निवडणुकीत अन्य कोणाला आपला वापर करू देण्याऐवजी आदिवासींच्या अस्तित्वाचे आणि अस्मितेचे प्रश्न घेऊन आमच्या ट्रायबल पार्टीच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवणार आहोत. प्रा. मेघनाथ गवळी, प्रदेेशाध्यक्ष, भारतीय ट्रायबल पार्टी

 

बातम्या आणखी आहेत...