आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाेस आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी ठाेस आश्वासन दिल्यानुसार मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.


जळगाव शहरातील आदिवासी मुला-मुलींचे शासकीय आदिवासी वसतिगृह आदिवासी विकास विभागाकडून चालवण्यात येते. या विभागाकडून सन २०१६-१७ या वर्षी ६०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता; परंतु सन २०१८-१९ या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रमुख अधिकारी आर. बी. हिवाळे यांना निवेदन देण्यात आले होते. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आदिवासी वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा. शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात वाढीव जागा उपलब्ध करून द्याव्या, या मागण्या पूर्ण न झाल्यास तीन दिवसांमध्ये आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे गुरुवारी उपोषणाला बसले आहेत. या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना निवेदन दिले. या वेळी त्यांनी प्रकल्प अधिकारी हिवाळे यांच्यासोबत चर्चा करतो, असे सांगितले.


अांदाेलनादरम्यान या करण्यात अाल्या मागण्या
शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात येथे वाढीव जागा उपलब्ध करून द्याव्या. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा. खास बाब म्हणून अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी.


समस्या लवकर साेडविणार : सुळे
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. याठिकाणी गुरुवारी दुपारी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी त्यांच्या मागण्याविषयी सविस्तर चर्चा केली. यात त्यांनी विद्यार्थ्यांना मी तुमच्या समस्या लवकरच साेडवेल, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चादेखील केली.

 

वसतिगृहासमोरही विद्यार्थ्यांनी केले होते आंदाेलन
शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी योगेश पावरा याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्या वेळी विद्यार्थ्यांनी त्याच्या मृतदेहाजवळ बसून ठिय्या आंदोलन केले होते. वसतिगृहातील असुविधाबाबत प्रकल्प अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले होते.

 

बातम्या आणखी आहेत...