आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेवासे - सध्याच्या राजकीय वातावरणात भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सारखा साम्यवादी विचारांचा सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेत्याची भारताला गरज आहे, असे विचार व्यक्त करीत सर्व पक्षीयांच्या उपस्थितीत स्व. वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पंचायत समिती सभागृहांत सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्व. वाजपेयी यांच्याबरोबर अनेक वेळा भेट घेतलेले भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव ताके यांनी आठवणींना उजाळा दिला.त्यांची साधी रहाणी कार्यकर्त्यांविषयीची आत्मीयता अनुभवल्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, भाजपचे भीष्माचार्य व कार्याकर्त्यांासाठीचा आदर्श नेता म्हणून ते नेहमीच आठवणीत राहतील. पंतप्रधान म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय देशाला वेगळी दिशा देणारे ठरले होते. माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले कि, संवेदनशील कवी मनाचा आदर्श राजकारणी असलेले वाचपेयी हे दूरदृष्टीचे पंतप्रधान म्हणून त्यांचे जागतिक वजन होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे म्हणाले, उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले वाचपेयी हे राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. ज्येष्ठ नेते तुकाराम नवले म्हणाले की आम्ही विरोधी पक्षात असलो तरी आमची लढाई विचाराची होती भाजपमध्ये अटलजी, अडवाणी असे अनेक चांगले विचारवंत नेते असल्याने त्यांचे विचार सर्वासाठी मार्गदर्शक आहेत.
समितीच्या उपसभापती राजनंदिनी मंडलिक, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष संजय सुखधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंतराव नळकांडे, यासिन शेख सर, विनायक नळकांडे, काकासाहेब गायके, सादिक शिलेदार, बालेंद्र पोतदार, रामचंद्र खंडाळे, अशोक गुगळे यांनी भाषणाद्वारे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन कार्याचा उल्लेख करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन महेश मापारी यांनी, तर आभार संदीप आलवणे यांनी मानले.
दरम्यान, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जिल्हाभरात विविध संघटना, संस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.