आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाने रघुनाथपूरजवळ केली शिकार; एका रात्रीत 25 किमीचा पल्ला गाठत वाघ तिवसा तालुक्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 तिवसा - चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा येथून निघालेल्या वाघाने धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथील दोघांसह काही जनावरांचा बळी घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री तो तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर परीसरात दाखल झाला असून या वाघाने शेतात बांधलेल्या गाईच्या एका वासराची शिकार केल्याची बाब गुरुवारी (दि. २५) सकाळी उघडकीस आली.

 

गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हा वाघ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा ओलांडून तळेगाव ठाकूरकडे कूच केल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. तळेगाव ठाकूरमध्ये दवंडी देऊन ग्रामस्थांना सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री १० वाजता तिवस्यालगतच्या आनंदवाडी,विद्युत काॅलनी परिसरात वाघ आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी लाठ्या काठ्यांसह मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 

मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात दाखल झालेल्या या वाघाने मागील आठवड्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील ४५ वर्षीय शेतकरी राजेंद्र निमकर, तर अलीकडेच अंजनसिंगी येथील मजूर मोरेश्वर वाळके या दोघांचा बळी घेतला. वाघाला पकडण्यासाठी वनविभागने ड्रोन कॅमेरे, पिंजरे, बेधुद्ध करणारी बंदूक यांच्यासह कर्मचाऱ्यांची चमूही तयार केली. मात्र हा वाघ प्रत्येक वेळी वनविभागाच्या चमूला चकमा देत राहिला. त्याचा उच्छाद अद्यापही संपलेला नाही.

 

विशेष म्हणजे बुधवारी अंजनसिंगी परिसर सोडून एका रात्रीतून २५ किमीचा मोठा पल्ला गाठत हा वाघ आता तिवसा तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील शेंदुरजना बाजार ते रघुनाथपूर दरम्यान असलेल्या भांबोरा पांदण रस्त्यादरम्यान प्रभाकर वानखडे यांच्या शेतात बांधलेल्या एका वासराची त्याने शिकार केल्याची बाब गुरुवारी सकाळी उघडकीस आली. वाघ ज्या मार्गान्े शिकार करून गेला, त्या मार्गावर त्याच्या पायाचे ठसे उमटलेले वनविभागाला आढलल्याने तोच नरभक्षक वाघ असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या वाघाला जेरबंद करण्यासाठी, ज्या ठिकाणी त्याने वासराचा बळी घेतला, त्याच ठिकाण वनविभागाने सापळा लावण्यात आला आहे. 


बिबट अन् वाघाची ग्रामस्थांमध्ये दशहत : रघुनाथपूर येथे वाघाने वासराचा बळी घेतला, तर दुसऱ्या बाजूने बिबट्याने आपले अस्तित्व दाखवून दिले. दोन्ही हिंस्त्र श्वापदांच्या परिसरातील अस्तित्वामुळे नागरिकांमध्ये दशहत निर्माण झाली आहे. परिसरातील गावात प्रशासनाच्या वतीने मुनादी देण्यात आली आहे. वाघाच्या मागावर वनविभागाचे कर्मचारी, पोलिस प्रशासन, महसूल विभागाही आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वनविभागाद्वारे करण्यात आले आहे. 


ड्रोन कॅमेऱ्याद्वारे वाघावर लक्ष : परिसरातच हा वाघ असल्याने ड्रोन कॅमेराचे माध्यमातून त्याच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे, तर ज्या ठिकाणी गाईच्या वासराची शिकार केली तिथेसुद्धा कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाघ आल्यास त्याला बंदुकीतून इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून पकडले जाणार असल्याची माहिती वनविभागाचे सहाय्यक वनरक्षक राजेंद्र बोंडे यांनी दिली. 
 
धामणगाव रेल्वे तालुक्यात दोघांचा बळी घेतल्यानंतर तिवसा तालुक्यात दाखल झालेल्या वाघाच्या बंदोबस्तासाठी ट्रॅप कॅमेरा लावताना कर्मचारी. 


वाघ गेला अन बिबट्या आला रे आला! 
धामणगाव रेल्वे एकीकडे तालुक्यातील उत्तर व पूर्व दिशेला वाघाने तीन दिवसात दोन बळी घेतले असतांना आता देवगाव नागापूर, सावळा, जळका पटाचे, सरूळ फाटा, ममदापूर, सलनापूर, निंबोली, धामणगाव बाय पास या परिसरात बिबट्या धुमाकूळ घालत असल्याच्या घटना घडल्या आहेत. धामणगाव तालुक्यातील देवगाव येथे एका म्हशीची शिकार करून बिबट्या याच भागात वावरत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. सोमवार २२ ओक्टोबरच्या रात्री दक्षिण दिशेस असलेल्या देवगाव नागापुर भागात बिबट्याने धुमाकूळ घालून एका बकरीला फस्त केले होते. ठार केलेली बकरी ही बिबट्याने मारली असल्याचा दुजोरा वन विभागाने दिला होता. 


वीरगव्हाण येथे बिबट्याने केली जनावराची शिकार 
या वाघाची दहशत कायम असताना तिवसा तालुक्यातील विरगव्हाण येथील एका शेतात बिबट्याने एका जनावराची शिकार केली. या घटनमुळेदेखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...