आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी, उद्धव आणि प्रियंका!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणचे उमेदवारही कामाला लागले आहेत. ज्या काही मतदारसंघांत भाजप खासदारांचे तळ्यात-मळ्यात आहे त्यांच्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आयारामांसाठी जागा बदलण्याची तयारी ठेवली आहे. दुसरीकडे भाजप-सेनेच्या युतीची अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. नको, नको म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या आग्रहाखातर युतीची तयारी दाखवली, पण जागावाटपाचा तिढा कायम आहे. त्याआधीच ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ पाचोरा मतदारसंघातून करण्याचे जाहीर केले. पाचोऱ्यात त्यांची १५ फेब्रुवारीला सभा आहे. या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे किशोर पाटील असले तरी जळगावचे खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पाचोरा येथे होत असलेली सभा अौत्सुक्याचा विषय आहे. कारण जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेने माजी आमदार आर. अो. पाटील यांना कामाला लागण्याची सूचना केली आहे. आणि त्यांनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघ पिंजून काढला आहे.


युती नाही झाली तर आर. ओ. पाटलांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पण युती झाली तर जागावाटपात भाजप जळगाव मतदारसंघ सोडेल काय? या मतदारसंघातून ए. टी. पाटील हे तीन लाखांपेक्षा अधिकचे मताधिक्य घेऊन निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ सेनेला सोडताना किंवा उमेदवार बदलताना भाजपला अनेकदा विचार करावा लागेल. राजकारणात ऐनवेळेस काहीही तडजोड केली जाते. 


उद्धव ठाकरे यांच्या सभेची पाचोऱ्यात जशी तयारी सुरू आहे तशीच तयारी धुळे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लावण्यासाठी सुरू आहे. १६ फेब्रुवारीला ही सभा असेल. मोदी यांच्या सभेची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण प्रशासकीय पातळीवर यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणुकीपूर्वी मोदी यांची ही सभा खान्देशातील प्रचाराचा शुभारंभच असेल. मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाच्या एखाद्या टप्प्याचे भूमिपूजन करून पुन्हा खान्देशात मोदी लाट आणण्याचा प्रयत्न या सभेतून हाेईल. देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मतदारसंघात काय कामे केली हे जर ठळकपणे सांगायचे झाल्यास मोदींना मनमाड- इंदूर रेल्वेमार्गाचे उदाहरण सांगता येईल. २०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या सभेने खान्देशातील वातावरण चांगलेच बदलले होते. एव्हाना  पिढ्यान््पिढ्या काँग्रेसच्या मागे राहिलेले आदिवासीदेखील मोदी लाटेवर स्वार झाले होते. 


मोदींची ही लाट मोडून काढण्यासाठी काँग्रेसनेही नंदुरबार येथे प्रियंका गांधी यांची सभा घेण्याचा आग्रह धरला आहे. प्रियंका जरी उत्तर प्रदेशाच्या प्रभारी असल्या तरी नंदुरबार आणि गांधी घराण्याचे जे प्रेम आहे ते परत मिळवण्यासाठी प्रियंका गांधींची सभा घेऊन काँग्रेसने महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ करण्याचे ठरवले आहे. सोनिया गांधी यांनीदेखील आपली पहिली प्रचारसभा नंदुरबारातून सुरू केली होती. त्या वेळेस माणिकराव गावित यांनी सलग आठ वेळा निवडून येण्याचा विक्रम केला होता. नंदुरबारात इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी यांच्याही सभा झाल्या. प्रियंका तर हुबेहुब इंदिरा गांधी दिसतात. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठीच नंदुरबारची जनता आसुसलेली आहे. 


नंदुरबारचा बालेकिल्ला जर पुन्हा काँग्रेसला मिळवायचा असेल तर प्रियंका गांधींच्या सभेशिवाय दुसरा पर्याय नाही. काँग्रेसतर्फे अॅड. के. सी. पाडवी यांचे नाव चर्चेत असले तरी नाईक, गावित परिवारातूनही अन्य नाव पुढे येऊ शकते. उमेदवार कोण असेल, यापेक्षा नंदुरबारात काँग्रेस कशी जिंकेल यासाठी सर्वच ज्येष्ठ आणि तरुणांनी चंग बांधला आहे. खान्देशात जळगाव, रावेर, धुळे आणि नंदुरबार हे चार लोकसभेचे मतदारसंघ आहेत. या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. धुळे येथे माजी मंत्री रोहिदास पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी झाली आहे. जातीय समीकरणे आणि संपर्काचा विचार केला तर रोहिदास पाटलांना पर्याय नाहीच. नंदुरबारात काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच होऊ घातलेल्या उद्धव, मोदी आणि प्रियंका गांधींच्या सभेची उत्सुकता आहे. मोदी आणि उद्धवपेक्षा प्रियंका गांधी यांची सभा म्हणजे त्या काय बोलतात हे जेवढे औत्सुक्याचे असेल तेवढेच औत्सुक्य त्यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीचे असेल.

 त्र्यंबक कापडे 
- निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...