आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक: गोटेंचे बंड, महाजनांची कसोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मुदत संपलेल्या धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक ९ डिसेंबरला होत आहे. या आधी झालेल्या जामनेर नगरपालिकेची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर भाजपने राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पालघर लोकसभेची पोटनिवडणूक आणि जळगाव महापालिकेची सूत्रे सोपवली होती. पालघरमध्ये जसे त्यांनी राजेंद्र गावित यांना दुसऱ्या पक्षातून आयात करत भाजपची उमेदवारी मिळवून दिली आणि सर्व प्रकारची प्रतिष्ठा पणाला लावत त्यांना निवडून आणले. त्यानंतर जळगाव महापालिकेतही त्यांनी तेच केले.

 

युती करण्याची आशा लावून माजी मंत्री सुरेश जैन यांना अंधारात ठेवले आणि जैनांच्या आघाडीसह अन्य पक्षातील निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना भाजपची उमेदवारी देऊन जळगाव महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा इतिहास घडवला. महाजनांची ही खेळी यशस्वी होत गेल्यामुळे धुळे महापालिकेची सूत्रेही पक्षाने त्यांच्याकडे सोपवली आहेत.

 

अन्य पक्षातील गब्बर लोकांना प्रवेश देत त्यांना उमेदवारी द्यायची आणि पक्षाला यश मिळवून देण्याची तयारी महाजन यांनी थेट धुळे येथे न जाता सुरू केली होती. दरम्यान, या सर्व घडामोडी मंत्री महाजन यांनी धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांना विश्वासात न घेताच सुरू केल्या होत्या. कारण भाजपला धुळे महापालिका जिंकायची आहे; पण गुंड, गुन्हेगार, चोर या लोकांना सोबत न घेता. अशा लोकांना पक्षात प्रवेश देण्यास गोटेंचा विरोध होता. मी धुळे शहराचा आमदार आहे. त्यामुळे मी ठरवेन त्यालाच प्रवेश आणि निवडणुकीचे तिकीट दिले पाहिजे, असा गोटेंचा आग्रह होता. तथापि, त्यांचा विरोध झुगारून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर, विद्यमान नगरसेवक, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भाजपत प्रवेश देणे सुरूच ठेवल्यामुळे आमदार गोटे यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे प्रसार माध्यमे आणि बॅनरबाजीतून स्थानिक राजकीय विरोधकांना सोडून देत मंत्री महाजन, डाॅ. भामरे आणि रावल यांना लक्ष्य करत टीका सुरू केली होती.

 

अर्थात, हे सर्वच संदेश पक्षश्रेष्ठी आणि नेत्यांपर्यंत पोहोचल्यामुळे गोटेंना आवर घालण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत धुळ्यात पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. विशेष म्हणजे पक्षाच्या बॅनरवर गोटेंचे नावही घेतले नाही आणि त्यांना मेळाव्याचे निमंत्रणही दिले नाही. तरीही पक्षाचे आमदार या नात्याने गोटे ते मेळाव्याच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी व्यासपीठाचा ताबा घेतला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते भाषणाला उभे राहिले, पण त्यांना बोलू दिले गेले नाही. याच ठिकाणी मंत्री महाजन आणि आमदार गोटेंमध्ये शाब्दिक चकमक उडाली. गोटेंना न बोलावता पक्षाने घेतलेला मेळावा म्हणजे आम्ही तुमच्याशिवायही धुळे महापालिकेची निवडणूक लढू आणि जिंकू शकतो, असा संदेश त्यांना द्यायचा होता. पण अशा संदेशाला गोटे भीक घालणाऱ्यांमधला राजकारणी नाही, हे खरे तर त्यांनी आधीच ओळखायला हवे होते.

 

गोटे आणि मंत्री महाजनांमध्ये पडलेल्या ठिणगीने आता भडका घेतला आहे. कारण गोटेंनी भाजप मेळाव्यानंतर स्वत: एक जाहीर सभा घेतली आणि आपणच महापौर बनण्यासाठी नगरसेवकपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पहिल्याच मेळाव्यात त्यांनी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना टीकेचे लक्ष्य केले. आपण आमदार असताना महापौरपदासाठी निवडणूक का लढत आहोत, हेही त्यांनी स्पष्ट केले. ते स्वत:ला आणि समर्थकांना भाजपचे निष्ठावान समजत आहेत. पक्षात येणाऱ्यांना त्यांनी ‘हायब्रीड’ म्हटले आहे. आपण देऊ तेच भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

पण पक्षाने त्यांना मेळाव्यालाच बोलावलेले नाही, मग ते गोटेंच्या उमेदवारांना एबी फाॅर्म तरी देतील का? असा प्रश्नही आहे. भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही तरी गोटे स्वत:च्या बॅनरखाली निवडणूक लढवू शकतात. अनेक दिग्गज विरोधात असताना त्यांनी आमदारकीची निवडणूक एकदा नाही तर तिसऱ्यांदा जिंकली आहे. दोन वेळा तर ते अपक्ष निवडून आले आहेत.  मंत्री महाजनांनी साम, दाम, दंड, भेदाने निवडणुका जिंकल्याचा इतिहास त्यांच्या नावाने रचला जात आहे. महाजनांची ही विजयी घोडदौड रोखण्यासाठी पक्षातीलच काही आमदार, मंत्र्यांनी गोटेंना बळ दिले आहे. कारण एकनाथ खडसेेेंसारखे पक्षावर नाराज नेते त्यांच्या मदतीला येऊ शकतात. याशिवाय आमदार गोटेंनी दोन पावले मागे जात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशी जुळवून घेण्याची तयारी दाखवली होती.

 

कदमबांडेंनीही त्यांच्या आवाहनाला तेवढाच प्रतिसाद दिला होता. महाजन, दानवे आणि रावल यांनीही निवडणूक अंगावर घेतली आहे. त्यामुळे त्यांचीही आता कसोटी लागणार आहे.  
 

-त्र्यंबक कापडे

निवासी संपादक, जळगाव  

बातम्या आणखी आहेत...