आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाळ्यात वृद्ध शेतकऱ्याचा खून तर जानेफळनजीक पार्डीत दुहेरी हत्याकांड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जामोद/ जानेफळ- एकाच रात्री तीन खुनांच्या घटनांमुळे जिल्हा हादरला असून,मृतकांमध्ये तुरीच्या जागलीसाठी गेलेल्या आजोबासह एका नातवाचा समावेश आहे. खुनाची पहिली घटना जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मळ्यात एका ६५ वर्षीय शेतकऱ्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून संपवण्यात आले. ही घटना ९ जानेवारीच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. तर दुहेरी हत्याकांडाची घटना मेहकर तालुक्यातील पार्डी येथे बुधवारी रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे. या तीन खून प्रकरणातील एकाही आरोपीस अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देवून योग्य तपासाच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.

 

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मधुकर कापरे हे ६५ वर्षीय शेतकरी गावाशेजारी असलेल्या मळ्यात राहात होते. त्यांच्यासोबत त्यांचा मतीमंद मुलगा राहात होता. दरम्यान काल रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने मळ्यात जाऊन त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. रक्तस्त्राव अधिक झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याच्या मतीमंद मुलाने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. त्याच्या आवाज एकूण ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यत आरोपी पसार झाला होता. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव पंचनामा केला. दरम्यान आज गुरुवारी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर ठाणेदारास योग्य त्या तपासाच्या सूचना केल्या. यावेळी श्वान पथकाचे गजानन राजपूत व कुळकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये श्वान पथक अपयशी ठरले. तसेच भौतिक पुरावे शोधण्यासाठी फॉरेस्निक युनिटने पोलिस तपासात मदत करून मृतकाचे रक्त उडलेल्या वस्तू शोधून त्या तपास अधिकाऱ्याच्या सुपूर्द करण्यात आल्या. मृतक मुधकर कापरे यांना एक मतीमंद मुलगा असून, तो वडीलासोबतच राहात असे. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस त्या मुलाची मदत घेत आहेत. यावेळी पोलिसांनी संशयित म्हणून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. प्रकरणी पोलिस गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या खून प्रकरणातील आराेपीस लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचा पुढील तपास राजेश शिंदे, विठ्ठल खोडे, शरद दळवी व राजू आढाव हे करीत आहेत. 

 

दुहेरी हत्याकांडाची दुसरी घटना जानेफळ येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पार्डी शिवारात आज ११ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पार्डी येथील मृतक रामचंद्र तुळशीराम अंभोरे वय ६० व त्यांचा नातू रवी आनिल अंभोरे वय १७ हे दोघेजण नेहमी प्रमाणे ९ जानेवारीच्या रात्री गाव शिवारातील गट क्रमांक ५२ मधील शेतात तुरीच्या रखवालीसाठी जागलीवर गेले होते. दरम्यान आज सकाळी मृतकाचा मुलगा अनिल रामचंद्र अंभोरे यांनी फोन केला असता त्या फोनवरून त्यांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते सकाळी दहा वाजता स्वता बैलगाडी घेऊन शेतात गेले. यावेळी त्यांना शेतामधील असलेल्या झोपडीसमोर शेकोटी पेटवलेली दिसली. तर त्यांचे वडील मृतक रामचंद्र तुळशीराम अंभोरे हे त्या शेकोटी समोर पडलेले होते. यावेळी त्यांनी वडिलांना आवाज देण्याचा प्रयत्न केला. त्यांना हलवून सुध्दा पाहिले. परंतु त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यांनी पाहणी केली असता वडिलाच्या डोक्याला जबर जखम झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वडिलाच्या दोनशे ते अडीचशे फुट अंतरावर रवी अनिल अंभोरे हा एका झाडाला मृतावस्थेत लटकलेला दिसून आला. या घटनेची माहिती त्यांनी तत्काळ नातेवाईकासह ग्रामस्थांना दिली. माहिती मिळताच त्यांंचा भाऊ सुनील रामचंद्र अंभोरे यांच्यासह ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. ठाणेदार गौरीशंकर पाबळे, पीएसआय राजू राऊत यांच्यासह एसडीपीओ रामेश्वर व्यंजने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह मेहकर येथे हलवण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी अनमोड हे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान वृत्त लिहिस्तोवर पोलिसांची कारवाई सुरू होती. 

बातम्या आणखी आहेत...