आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैवच बलवत्तर ठरले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाच्या जीवनात अनेक कडू-गोड प्रसंग येत असतात. त्यात जिवावर येणारे संकट वाईट असते. आपण नेहमी दुस-याचे अपघात व त्यांच्या बातम्या वाचत असतो; पण स्वत:वर वेळ आल्यानंतर खरे कळते. काळ आणि वेळ एकत्र आली, तरच वाईट घटना घडत असाव्यात. मानवी जीवन किती क्षणभंगुर असते, हे समजण्यासाठीच असा प्रसंग माझ्यावर दैवाने आणला असावा. रेल्वेस्टेशनवर रोज असंख्य गाड्या येत-जात असतात. तेथे वावरताना अनेकदा काळजीपूर्वक वागावे लागते. मी 1956 मध्ये अक्कलकोट येथे सहायक स्टेशनमास्तर म्हणून काम करत होतो. त्या वेळी लाकडी डबे असायचे.
अक्कलकोटवरून पुणे-रायचूर पॅसेंजरने दुधनीला जायचे होते. रेल्वेतच काम करत असल्याने चालती गाडी धरायची सवय होती. त्या काळातील बांधकामानुसार एनएसआर बोगी असल्याने प्लॅटफॉर्म आणि डब्याचे फुटलेट यामध्ये अंतर असायचे. एकदा मी गाडीने दुधनीस जावयास निघालो. गाडी चालू झाली. मी प्लॅटफॉर्मवरून डबा धरण्यासाठी डब्याचे हँडल धरले; पण हँडलवरून माझा हात निसटला आणि मी डबा आणि प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये अडकलो. मी डब्यासच चिकटून होतो म्हणून डब्यात चढता आले नाही. डब्यातील लोक ओरडायला लागले, त्यांना वाटले मी गाडीखालीच गेलो की काय? ते पाहून डब्यातील माणसाने साखळी ओढली. तेव्हा गाडी प्लॅटफॉर्म संपतो त्याच्या पुढे जाऊन थांबली. तोपर्यंत गार्ड आले, स्टेशनवरील पोर्टरही आले. सगळ्यांनी मला धरून खाली उतरवून घेतले. मी घाबरून गेलो होतो. तोंडातून शब्द फुटत नव्हते. सर्वांनी मला उचलून स्टेशनवर आणले. खोलीत नेऊन अंगावरचे कपडे काढून गोडेतेलाने सर्वांगाला मालिश केले. दोन-तीन कप चहाही पाजला. हा उपचार केल्यानंतर मला एका तासाने बरे वाटू लागले. मी मरणाच्या दारातून परत आलो होतो. आज माझे वय 87 आहे; पण तो प्रसंग आठवला की, माझ्या अंगावर अजूनही काटा येतो.