आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डा चुकवताना ट्रकची बसला धडक, बसचालकासह ३ जखमी ; बस चक्काचूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रावेर : रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकने संगमनेर-रावेर बसला समोरून धडक दिली. १ फेब्रुवारीच्या पहाटे ३.३० वाजता रावेर-विवरे दरम्यान झालेल्या या अपघातामध्ये बसचालक राजू अवसाजी आशिरवाड, प्रवासी मुजाहीद शेख नूर मोहंमद (रा.रावेर) हे दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जो खड्डा चुकवताना हा अपघात झाला त्याबाबत 'दिव्य मराठी'ने १० जानेवारीला वृत्त प्रकाशित करून अपघात होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. 

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर रावेर ते विवरे दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे खड्डे बुजवले होते. मात्र, पुन्हा जैसे थे चित्र निर्माण झाल्याने वाहनचालकांचा त्रास कायम होता. या खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो, असे चित्र असूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता रावेर ते विवरे दरम्यान असलेला जीवघेणा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकने (क्रमांक एचआर.३८-टी.००४२) पंजाबशाहबाबा दर्गाहजवळ संगमनेर-रावेर बसला धडक दिली. त्यात बसचालक राजू आशिरवाड व प्रवासी मुजाहीद शेख नूर मोहंमद (वय २२, रा.मन्यारवाडा, रावेर) हे दोन्ही गंभीर जखमी झाले. वाहक राठोड हे देखील किरकोळ जखमी झाले. बसमध्ये वाहक व दोन प्रवासी एवढेच लोक होते. दरम्यान, संगमनेर-रावेर ही बस औरंगाबाद-पहूर मार्गे रावेरला रात्री १ वाजता येते. रस्त्यांची कामे सुरू असल्याने ही बस तब्बल अडीच तास उशिराने धावत होती. १० तासांचे प्रवासात मुक्कामाचे ठिकाण असलेले रावेर ५ मिनिटांच्या अंतरावर होते. मात्र, पंजाबशहाबाबा दर्गाजवळ दोन महिन्यांपासून पडलेल्या ३ बाय ४ फूट आकाराच्या खड्ड्याने घात केला. हा खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक थेट बसवर आदळला. बसचालक व जखमी प्रवासी अशा दोघांवर डॉ.योगेश महाजन यांनी उपचार करून जळगावला रवाना केले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. रावेरात गुन्हा दाखल झाला. 


वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे दोन्ही बाजूने वाहनांना ये-जा करण्यासाठी जागाच नव्हती. यामुळे पहाटे ३.३० ते सकाळी ७ वाजेपर्यंत म्हणजेच साडेतीन तास दोन्ही बाजूने अडीच ते तीन किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. रावेर आगाराच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या मेहनतीने ही बस रस्त्यातून बाजूला केली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. रावेर पोलिसांनी देखील या कामासाठी मदत केली. 

 

फोन लावण्यासाठी पोलिसांनी मागितले पैसे 
सकाळी साडेतीन वाजता झालेल्या अपघातापूर्वी विवरे येथून बसचालक राजू आशिरवाड यांनी १० मिनिटात रावेर बस स्थानकाला पोहचतो. मला घ्यायला ये, असे त्यांच्या भावाला भ्रमणध्वनीवरून सांगितले. यानंतर त्यांचा भाऊ शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आला. मात्र, अर्धा-पाऊण तास होऊनही राजू आशिरवाड न आल्याने त्यांनी चौकात उभ्या असलेल्या पोलिसांना फोनवरून विचारणा करावी, अशी विनंती केली. यावेळी सहकार्य करण्याऐवजी पोलिसांनी २० रुपयांची मागणी केली, असा आरोप रावेर आगारातील नितीन महाजन यांनी केला. रावेर आगारातील इतरही कर्मचाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. गत आठवड्यातही गुटखा तडजोडीचे प्रकरण गाजले होते. 
 

बातम्या आणखी आहेत...