आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-दुचाकीचा अपघात; मुलाला भेटण्यास निघालेल्या बापाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वाळूज - वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथून बोकूड जळगाव येथील आश्रमशाळेत शिकायला असलेल्या मुलाला भेटण्यासाठी दुचाकीने जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात सुभाष छगन पवार (४१, रा. गुदमा तांडा, ता. कन्नड ह.मु. वडगाव कोल्हाटी-बजाजनगर) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास पाटोदा-वाल्मी रस्त्यावर असलेल्या गंगापूर नेहरी गावाजवळील पुलाजवळ घडली. 

 

याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष गेल्या काही दिवसांपासून वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे राहत होते. तसेच वाळूज एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये कामगार होते. त्यांचा मुलगा बोकूड जळगाव येथील एका आश्रम शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी सुटी असल्याने सुभाष आपल्या मुलाला भेटण्यासाठी दुचाकीने (एमएच २० एएक्स ६५४१) बोकूड जळगावला निघाले होते. 

 

दरम्यान, औरंगाबाद-नगर महामार्गावरील बजाज गेटजवळील पाटोदा-वाल्मी रस्त्यावरून जात असताना गंगापूर नेहरीजवळ पुलानजीक असलेल्या वळणावर भरधाव ट्रकने (एमएच ०४ सीजी ४९०८) सुभाष यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. 

 

या अपघातात सुभाष यांना जोराचा मार लागल्याने बेशुद्ध पडले. घटनेची माहिती पोलिसाना मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार निसार शेख, पाेलिस कॉन्स्टेबल मरकड यांनी घटनास्थळी धाव घेत सुभाष यांना बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सुभाष यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेड काॅन्स्टेबल अर्जुन ढोले करत आहेत. बोकूड जळगाव येथे आश्रमशाळेत मुलगा शिकत आहे 

 

बापलेकाची भेट ठरली अधुरी 
सुभाष हे एमआयडीसीमध्ये एका कंपनीत कामगार म्हणून कामावर असल्याने त्यांना रविवारी साप्ताहिक सुटी होती. त्यांचा मुलगा बोकूड जळगाव येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असून तो सातवीच्या वर्गात आहे. त्यामुळे दर रविवारी सुभाष मुलाला भेटण्यासाठी जात असत. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुभाष मुलाला भेटण्यासाठी निघाले. मात्र नियतीने बाप-लेकाची भेट अधुरी ठेवली.