आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकचालकाने रागाच्या भरात ओम्नीचालकास चिरडले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - एका ट्रकचालकाने ओम्नी कारचालकास हूल दिली. याचा राग आल्याने ओम्नी कारचालकाने ओव्हरटेक करून ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात ट्रकचालकाने त्या ओम्नीचालकास ट्रकखाली चिरडल्याची दुर्दैवी घटना पानस फाट्यावर शनिवारी दुपारी ३.३० वाजता घडली. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत दिवसभर मात्र उलटसुलट चर्चा सुरू होती. फरार झालेल्या ट्रकचालकास सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पकडून अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपी ट्रकचालकास अटक केली आहे. रात्री या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या अपघातात ठार झालेल्या ओम्नी कारचालकाचे नाव शेख अब्दुल अजीज शेख रहेमान (५१, रा. भोकरदन, हल्ली मुक्काम पालोद) असे आहे, तर अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव नवनाथ भागाजी साखडे (रा. लिहाखेडी, ह. मु. फुलंब्री) असे आहे. शनिवारी दुपारी ओम्नी कार (एमएच ०६  एएस ३६४२) ही अजिंठा येथून  सिल्लोडकडे जात होती. पाठीमागून आलेल्या  ट्रक (एमएच १६ एई ९८९७) ने त्यास बाळापूरजवळील व्ह्यू पॉइंट ढाब्याजवळ हूल दिली. याचा राग आल्याने कारचालकाने त्या ट्रकचा पाठलाग करून पानस फाट्यावर कार रस्त्याच्या कडेला लावून हातात दगड घेऊन ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला व शिवीगाळ केली. याचा राग आल्याने ट्रकचालकाने त्याच्या अंगावर ट्रक घातला. यात कारचालक जागीच ठार झाला. ही घटना झाल्यावर ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला होता. त्या ट्रकचालकास सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पकडून अजिंठा पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक किरण आहेर, हेमराज मिरी, सांडू जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रकचालकास ताब्यात घेतले. कारचालकाचे शवविच्छेदन अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

घातपात झाल्याचा संशय...?
ट्रकचालकाने हूल दिल्यावर कारचालकाने पुढे जाऊन ट्रक थांबवला. हातात दगड घेऊन तो ट्रकवर चढला व ट्रकचालकास त्याने दगड  मारण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ होऊन दोघात बाचाबाची झाली. ट्रकचालकाने त्याच्या डोक्यात टॉमी मारून त्याचा खून केल्याची चर्चा दिवसभर होती. मृताचे नातेवाईक खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत होते. यामुळे आता काय गुन्हा दाखल करावा असा प्रश्न पोलिसांसमोर पडला होता.  यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा घातपात नसून अपघाताचाच प्रकार आहे.

बातम्या आणखी आहेत...