Secret Meeting / तालिबानसोबतची गुप्त बैठक ट्रम्प यांनी ऐनवेळी केली रद्द; काबूलमधील स्फोटानंतर राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

तालिबान चर्चेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे झाल्माय खलिलझाद व ट्रम्प यांचे हे प्रातिनिधिक छायाचित्र. तालिबान चर्चेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे झाल्माय खलिलझाद व ट्रम्प यांचे हे प्रातिनिधिक छायाचित्र.

भूमिका स्पष्ट करावी, निर्णयावर आता तरी ठाम राहावे  : डेमोक्रॅट

वृत्तसंस्था

Sep 09,2019 09:15:00 AM IST

वॉशिंग्टन - काबूलमध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटामुळे भडकलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानच्या म्होरक्या आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासोबतची प्रस्तावित गुप्त बैठक रद्द केली आहे. ट्रम्प यांनी शनिवारी उशिरा रात्री ट्विट करून ही घोषणा केली.


अफगाणिस्तानचे राष्ट्रपती व तालिबानच्या म्होरक्यांसोबत रविवारी कॅम्प डेव्हिड येथे स्वतंत्र गुप्त बैठक घेण्याची तयारी केली होती. परंतु आता ही बैठक रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अफगाणचे राष्ट्रपती घनी यांनी १३ सदस्यीय शिष्टमंडळासह शुक्रवारचा अमेरिकी दौरा टाळला होता. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार शिष्टमंडळ शनिवारी सायंकाळी अमेरिकेला पोहोचणे अपेक्षित होते. ट्रम्प यांनी या प्रकरणी जोर दिला. तालिबानने काबूलमध्ये हल्ला केला, हे दुर्दैवी आहे. त्यात आमच्या एका सैनिकासह इतर १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मी चर्चा रद्द केली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.


काबूलमध्ये गुरुवारी झालेल्या कार बाॅम्बस्फोटात अमेरिकेच्या सैनिकांसह १२ जणांचा मृत्यू झाला हाेता. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. ट्रम्प यांच्या या निर्णयाची अफगाणिस्तानने प्रशंसा केली. राष्ट्रपती अशरफ घनी म्हणाले, शांतीसंबंधी अफगाण सरकार, आपल्या मित्रराष्ट्राच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करते.


शांततेसाठी अफगाणिस्तान अमेरिका व इतर देशांसोबत काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षीच तालिबान व अफगाणिस्तान यांच्यातील शांतता चर्चेला सुरुवात केली होती.


पुढील वर्षी ५ हजार सैन्य मायदेशी
पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमध्ये तैनात ५ हजार सैनिकांना पुढील वर्षी मायदेशी बोलावण्यात येणार आहे. अफगाणिस्तानच्या पाच तळांवर अमेरिकेचे सुमारे १३ हजार सैनिक आहेत. १९७८ मध्ये कॅम्प डेव्हिड येथे इस्रायल व इजिप्त यांच्यातील शांतता चर्चा झाली होती. त्यात अमेरिका मध्यस्थी करत होते. आता तालिबान व अफगाणिस्तान यांच्यातील शांतता निर्णायक चर्चेसाठीदेखील कॅम्प डेव्हिडची निवड झाली होती. त्यामुळे ऐतिहासिक चर्चेला उजाळा मिळाला.


तालिबानने केली ६ अफगाणी पत्रकारांची सुटका
तालिबानने अफगाणिस्तानच्या अपहृत ६ पत्रकारांची रविवारी सकाळी सुटका केली, अशी माहिती अफगाणिस्तानच्या पोलिस प्रवक्त्यांनी दिली. अफगाणिस्तान सरकारसोबत काम करत असल्याचा आरोप करून तालिबानने या पत्रकारांचे अपहरण केले होते.

भूमिका स्पष्ट करावी, निर्णयावर आता तरी ठाम राहावे : डेमोक्रॅट

गुरुवारी काबूलमध्ये तालिबानींनी हल्ला केला. एकीकडे शांतता चर्चा सुरू आहे. तिकडे तालिबानी संघटनेचा हिंसाचार थांबलेला नाही. म्हणूनच ट्रम्प यांनी देशाची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तूर्त तरी ही चर्चा थांबवली हे चांगले झाले. या निर्णयावर ट्रम्प यांनी ठाम राहिले पाहिजे, अशी अपेक्षा काँग्रेसमन टॉम मालिनोवस्की यांनी व्यक्त केली आहे. ते डेमोक्रॅटचे सदस्य आहेत.

X
तालिबान चर्चेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे झाल्माय खलिलझाद व ट्रम्प यांचे हे प्रातिनिधिक छायाचित्र.तालिबान चर्चेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे झाल्माय खलिलझाद व ट्रम्प यांचे हे प्रातिनिधिक छायाचित्र.
COMMENT