वाॅशिंग्टन / इराणवरील हल्ल्यास १० मिनिटांचा अवधी असताना ट्रम्प यांनी आदेश फिरवला

हवाई दल, नाैसेनेने केली हाेती संपूर्ण तयारी

Sep 23,2019 09:00:00 AM IST

वाॅशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी २० जून राेजी दुपारी जेव्हा खासदारांशी चर्चा केली त्यापूर्वीच इराणवरील हल्ल्याचा निर्णय त्यांनी घेतला हाेता. अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्राेन विमान पाडल्याचा बदला घेण्यासाठी ट्रम्प यांनी हवाई हल्ला करण्याचे ठरवले हाेते. परंतु अवघ्या तीन तासांनंतर त्यांनी निर्णय मागे घेतला. हा निर्णय घेताना त्यांनी उपराष्ट्राध्यक्ष, विदेश सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भूमिकादेखील विचारात घेतली नव्हती. वायुसेना आणि नाैसेनेने लढाईची जय्यत तयारी केली हाेती, परंतु हल्ला सुरू करण्याच्या १० मिनिट अगाेदर त्यांनी पेंटागाॅनला युद्धभूमीवरून पाऊल मागे घेण्याची सूचना केली. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स आणि अन्य अधिकारी हा निर्णय ऐकून स्तब्ध झाले.


अमेरिकेने हल्ल्याचा निर्णय मागे घेतला याचाच अर्थ अमेरिकी नेत्यांमध्ये धमक राहिलेली नाही, अशी इराणची भूमिका बनली आहे, असा दावा आता ट्रम्प यांचेच सहकारी करीत हाेते. त्यामुळेच सप्टेंबरमध्ये साैदी अरेबियातील तेलविहिरींवर हल्ला करण्याचा इरादा बुलंद झाला. विदेशामध्ये आपल्या जवानांना न गमावण्याची आणि अब्जावधी डाॅलर्सचा खर्च न करण्याची संयमी भूमिका घेतल्याचा युक्तिवाद राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प करीत आहेत. मात्र साैदी अरेबियावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणचा बदला घेण्याच्या पर्यायावर ते विचार करीत आहेत.


९२५ काेटी रुपयांचे ग्लाेबल हाॅक ड्राेन पाडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जाॅन बाेल्टन यांच्या कार्यालयात माइक पॉम्पियाे, जाेसेफ डनफाेर्ड, पॅट्रिक शनाहन आणि मार्क एस्पर यांच्या युद्धाच्या काही पर्यायांवर चर्चा झाली. त्यानंतर ११ वाजता सर्व अधिकारी राष्ट्राध्यक्षांना भेटले, ताेपर्यंत ट्रम्प यांनी युद्धाचा निर्णय घेतलेला हाेता. वाॅशिंग्टनच्या प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता किंवा सूर्याेदयापूर्वीच अंधार असताना हल्ला करण्याचे निश्चित केले हाेते. बाेल्टन हल्ल्यास अनुकूल हाेते. इराणशी युद्ध पुकारायचे असेल तर दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष हाेण्याचा विचार करू नये, असा सल्ला कार्लसन यांनी ट्रम्प यांना दिला. त्यानंतर रिपब्लिकन आणि डेमाेक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांशी ट्रम्प यांनी चर्चा केली त्या वेळी या हल्ल्यामुळे अस्थिरता निर्माण हाेण्याची भीती डेमाेक्रॅटिक खासदारांनी व्यक्त केली. मात्र ट्रम्प यांनी आपल्या मनातले काेणालाच सांगितले नाही.


युद्धासाठी १० हजार सैनिक सज्ज
उत्तर अरब सागरातील हल्ल्यासाठी १० हजारपेक्षाही अधिक नाैसैनिक आणि वायुदलातील जवान सज्ज हाेते. नाैदलाच्या दाेन जहाजांतून टाॅमहाॅक क्रुज प्रक्षेपणास्त्र डागण्याची याेजना निश्चित करण्यात आली हाेती. युद्धनाैकेवरील लढाऊ विमाने केवळ सागरी परिसरात हल्ला हाेत असेल तरच प्रतिहल्ल्यासाठी झेपावतील, असेही ठरवण्यात आले हाेते.


अन‌् मागे हटण्याचे फर्मान आले
जनरल डनफाेर्ड यांनी टेम्पा, फ्लाेरिडामध्ये अमेरिकी मध्य कमांडचे प्रमुख जनरल केनेथ मॅकेंजी यांना हल्ला न करण्याची सूचना व्हाइट हाऊसने केली. त्यापाठाेपाठ तत्काळ टाॅमहाॅक प्रक्षेपणास्त्रे निष्क्रिय करण्यात आली. लढाऊ विमाने माघारी बाेलावण्यात आली. अॅडमिरल बाॅयल म्हणाले, आम्ही युद्धासाठी सर्वताेपरी सज्ज हाेताे, मात्र ऐनवेळी युद्ध न छेडण्याचे फर्मान पाेहाेचले.

X