ट्रम्प यांचे माजी / ट्रम्प यांचे माजी वकील कोहेन आणि प्रचारप्रमुख मानफोर्ट दोषी, प्रचारादरम्‍यान केली बँकांची फसवणूक

वृत्तसंस्था

Aug 23,2018 12:48:00 AM IST

मॅनहटन/ न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी वकील मायकल कोहेन यांनी स्वत:वरील आरोपांची कबुली दिली आहे. वर्ष २०१६ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन महिलांना पैसा देण्यास आपल्याला ट्रम्प यांनी सांगितले होते, असे ५१ वर्षीय कोहेन यांनी कबूल केले आहे. ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांविषयी पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल या महिलेला व आणखी एका महिलेला गप्प राहण्यासाठी ही लाच देण्यात आली होती. यासाठी २ लाख ८० हजार अमेरिकी डॉलर्स खर्च केले होते. कोहेन यांनी निवडणूक अभियानासाठीच्या वित्तीय कायद्याचे उल्लंघन केल्याचेही कबूल केले आहे. यासाठीही ट्रम्प यांनीच आदेश दिले होते, असे कोहेन म्हणाले.


मॅनहटन येथील जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी कोहेन यांनी न्या. विल्यम पॉले यांच्या न्यायपीठासमोर गुन्ह्याची कबुली दिली. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठीही काही जणांना लाच देण्यात आली होती. मी त्यातही सामील होतो. करचुकवेगिरी, बँकांना खोटी कागदपत्रे सादर करणे, ट्रम्प यांच्या आदेशावरून निवडणूक प्रचार मोहीम आर्थिक कायद्याचे उल्लंघन असे आरोप मायकल कोहेन यांच्यावर होते. विविध कलमांखाली त्यांच्याविरुद्ध ८ खटले होते. यात ते दोषी ठरले आहेत. कोहेन यांच्या खटल्याची पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी आहे.

रॉबर्ट मुलर यांच्यावरील दबाव संपुष्टात
२०१६ च्या निवडणूक प्रचार अभियानात रशियाचा हस्तक्षेप असल्याच्या प्रकरणात विशेष वकील रॉबर्ट मुलर यांनी चौकशी करून आरोप निश्चित केले होते. मानफोर्ट आणि कोहेन दोघेही दोषी आढळल्याने रॉबर्ट मुलर यांच्यावरील दबाव तूर्तास संपला आहे. हे मुलर यांचे अभूतपूर्व यश मानले जात आहे. ट्रम्प समर्थकांनी मुलर यांच्यावर विखारी टीका केली. ‘मुलर म्हणजे ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीवरचे भूत आहे, ’ या शब्दांत टीका झाली आहे.

पॉल मानफोर्टदेखील दोषी आढळल्याने ट्रम्प अडचणीत
२०१६ च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रचार अभियान प्रमुख असलेले लॉबीइस्ट आणि राजकीय सल्लागार पॉल मानफोर्ट हेदेेखील आर्थिक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले आहेत. त्यांच्याविरुद्ध कर घोटाळ्याचे ५ गुन्हे नोंदवण्यात आले होते. २ गुन्हे बँकेची फसवणूक केल्याचे तर परदेशी बँकेत खाते असल्याचा १ गुन्हा होता. परदेशी बँकेतील खात्यासंबंधी त्यांनी योग्य खुलासा करता आला नाही. याशिवाय विविध आर्थिक अपहाराचे १० आरोप मानफोर्टविरुद्ध होते. मात्र हे १० आरोपा सिद्ध करता आले नाहीत. साक्षीअभावी हे १० खटले रद्द ठरवले आहेत. युक्रेनमध्येही राजकीय सल्लागार म्हणून मानफोर्ट यांचा मुक्तसंचार राहिला होता. अमेरिकी महसूल विभागाकडे या उत्पन्नाची नोंदच नाही.

मानफोर्ट यांच्याविरुद्ध लागलेल्या निकालाचा माझ्याशी संबंध नाही : ट्रम्प
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, वैयक्तिक वकील, प्रचार अभियान प्रमुख, प्रचार अभियानाचे उपव्यवस्थापक, परराष्ट्र धोरण सल्लागार या पदांवरील सहकाऱ्यांविरुद्ध गंभीर गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीवर व निर्णयांवर कायदेशीर संकट आहे. मात्र मानफोर्ट यांच्याविरुद्धच्या खटल्याशी माझा काहीच संबंध नाही, असे चार्ल्स्टन येथे उतरल्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले. सध्या ट्रम्प पश्चिम व्हर्जिनियाच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. पॉल मानफोर्ट हा चांगला माणूस आहे, असेही ट्रम्प म्हणाले. मायकल कोहेनविषयी मात्र त्यांनी प्रतिक्रिया देणे नाकारले. त्यांचे वकील रुडॉल्फ गियोलियानी यांनी म्हटले की, कोहेन खटल्याशी राष्ट्राध्यक्षांचा संबंध नाही. कोहेन अप्रामाणिक व खोटारडे असल्याचे रुडॉल्फ म्हणाले.

X
COMMENT