आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकप्रतिनिधी कसा पाहिजे, तर तो उच्चशिक्षित, तरुण आणि चारित्र्यसंपन्न.. अशी जनतेची अपेक्षा असते. कारण शिक्षित, तरुण नेता असेल तर जनतेचे प्रश्न तो पटकन समजून घेऊ शकतो. ते सोडवण्यासाठी सरकारदरबारी आवाज उठवू शकतो. पाठपुरावा करू शकतो. तरुण तडफदार नेतृत्व असेल तर मतदारसंघातील जनतेला आणि देशाला विकासाची दिशा देऊ शकतो. त्यामुळे चांगल्या, शिक्षित तरुणांनी राजकारणात यावे, असे जाणकार नेहमी बोलत असतात. पण ‘ज्याच्या हाती ससा तोच पारधी’ अशी राजकारणाची गत झाली. त्यामुळे राजकारण हे भल्या माणसांचे काम नाही, अशी धारणा सामान्य माणसांची बनली. चांगली माणसे राजकारणात यायला तयार होत नव्हती. साम, दाम, दंड, भेद अशी नीती जो अवलंबेल त्यांचाच राजकारणात टिकाव लागत होता. लोकसभा असो की विधानसभा, तेच आमदार आणि तेच खासदार, असे देशाचे चित्र बनले होते. एकाच मतदारसंघात एकदा, दोनदा नाही तर पाच ते आठ वेळा एकच व्यक्ती निवडून येण्याचा इतिहास घडला आहे. आपण काहीही नाही केले तरी सहज निवडून येतो, अशी या लोकांची भावना झाली. राजकारणी झाले नसतील पण जनता, नवी पिढी ही शिक्षित झाली आहे. तेच ते निवडून येणाऱ्यांना याच नव्या पिढीने नाकारले.
जनतेचा हा बदललेला स्वभाव पक्षनेत्यांनी स्वीकारायची तयारी दाखवली. गेल्या दहा वर्षांत हा बदल प्रकर्षाने जाणवत आहे. भले त्यात घराणेशाही आहे, पण नव्या पिढीला चालणारा उमेदवार दिला जात आहे. याचा अर्थ असाही नाही की, संपूर्ण देशात हे चित्र बदलले अाहे. पण बदलाच्या दिशेने पावले पडताहेत, याची जाणीव कुठेतरी व्हायला लागली आहे. खान्देशचेच उदाहरण द्यायचे झाले तर धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रेशमा भोये हे सलग तीन वेळा निवडून गेले. दुसऱ्यांदा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा ते जाहीर भाषणात एकदा नव्हे तर अनेकदा म्हणाले होते की, इंदिराजींनी देशात टीव्ही आणला आणि घराघरावर ‘अर्जेंटिना’ दिसू लागले. त्यांना ‘अँटेना’ हा शब्द बोलताही येत नव्हता. त्यांची विरोधकांनी त्या वेळेस खिल्ली उडवली, पण पर्याय नसल्याने तेच निवडून आले. अर्थात, असे रेशमा भोये केवळ धुळ्यातच होते असे नाही तर देशातील ५४३ खासदारांत त्यांची संख्या निम्म्यापेक्षा अधिक असेल. कारण त्या वेळेस असेही म्हटले जायचे की, काँग्रेसने दगडही उभा केला तरी तो निवडून यायचा. पण आता चित्र बदलले आहे. काँग्रेसच नाही तर भाजपसह सर्वच पक्ष उमेदवार देताना काळजी घेत अाहेत. सत्ताधारी, प्रबळ विरोधी पक्ष गोपनीय सर्व्हे करून उमेदवारांचे नाव निश्चित करतात.
खान्देशातील अर्जेंटिना आणि अँटेनातील फरक न कळणाऱ्या मतदारसंघात भाजपने डॉ. सुभाष भामरेंच्या रूपात कॅन्सरतज्ज्ञ, चारित्र्यसंपन्न उमेदवार दिला. लोकांनी त्यांना निवडून दिले. त्यांचे वय झाले असले तरी उच्चशिक्षित म्हणून भाजपने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात काँग्रेसनेही उच्चशिक्षित म्हणजे अभियंता असलेला तरुण आणि राजकीय वारसा, विधिमंडळाचा पाच वर्षांचा अनुभव असलेला उमेदवार कुणाल रोहिदास पाटील यांच्या रूपात दिला आहे. काँग्रेसने ऐनवेळेस घेतलेला हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडू शकतो, असे लोकांना वाटू लागले आहे. धुळ्यासारखीच स्थिती नंदुरबार मतदारसंघाची आहे. तेथे डॉ. हीना गावित या उच्चशिक्षित आदिवासी तरुणीला उमेदवारी देऊन काँग्रेसचा गड भाजपने हिरावून घेतला होता. या मतदारसंघात दहावीही न झालेले माणिकराव गावित अाठ वेळा निवडून आले होते. आता काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा राखण्यासाठी अॅड. के. सी. पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. के. सी. पाडवी तरुण नसले तरी उच्चशिक्षित आणि अनुभवी राजकारणी आहेत.
जळगाव मतदारसंघात भाजपने उमेेदवार बदलवून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्या पदवीधर आहेत. विद्यार्थी चळवळीपासून त्यांचा सामाजिक आणि राजकीय जीवनप्रवास सुरू झाला आहे. एक महिला म्हणून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीनेही माजी आमदार गुलाबराव देवकर यांना उतरवले आहे. तेही वाणिज्य पदवीधर आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्या एकनाथ खडसे यांच्या सून असल्या तरी स्वत: बीएस्सी संगणकशास्त्राच्या पदवीधर आहेत. त्यांच्याविरोधातील उमेदवार निश्चित नसला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी तोडीस तोड उमेदवार देतील असे चित्र आहे. एकंदरीत देशाच्या सभागृहात उच्चशिक्षित, तरुण आणि चारित्र्यसंपन्न खासदारांची संख्या वाढणार आहे, हे लोकशाही मजबूत हाेण्याचे संकेत आहेत.
त्र्यंबक कापडे
निवासी संपादक, जळगाव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.